Monday, 26 March 2018

विहीर

विहीर

विहीर म्हंटल कि आठवतं  गावाकडे उन्हाळ्याच्या सुट्टीत मित्रांसोबत केलेली धम्माल, येथेच्छ जलतरण निवांत दुपार ! परवा night ट्रेक ला भीमाशंकरच्या जंगलात रात्रभर भुतांचे विषय झाल्यांनतर सर्वजण  झोपी गेले. मी मात्र जागा होतो .   कोणत्या तरी अपशकुनी आठवणीच्या खोल गर्तेत उतरत होतो खूप वर्षांपूर्वीच्या गोष्टीत हरवून गेलेलो - 
       - लहानपण माझे तसे गावीच गेलेलं. गेली कित्येक वर्षे दुष्काळछायेचे चटके सोसून आत्ता कुठे स्थिरस्थावर होणारं पश्चिम महाराष्ट्रातील कडेगाव तालुक्यातील एक गाव. गाव कसल ओढ्या कडी वसलेली एक वस्तीच! ७० घरे जेमतेम.. कडक उन्हाळा, मध्यम हिवाळा आणि अत्यल्प पावसाळा असे वातावरण. 
मे महिना चालू होता, गावात सर्व निवांत सुरु असायचा या काळात. गावकरी कुठेतरी पारावर किवा पिंपळाच्या झाडाखाली पहुडलेले असायचे, तर काही ओसरीवर दुपारच्या वेळी पथारी पसरायचे. आम्ही शाळकरी पोर्र मात्र दुपारचा वेळ हा कुठेतरी पाण्यात डुंबण्यात घालवायचो. मे सुरु होईल तसे गावातील सर्वच विहिरीनी तळ गाठलेला असायचा. मग आम्हाला मात्र गावच्या दक्षिणेला असलेल्या रंगाअप्पांच्या विहिरीवर जायला लागायचे. तिकडे जाताना म्हातारी माणसे विनाकारणच हटकायची आम्हला पण विरोध स्वौम्य असल्याने आम्ही दुर्लक्षच करयचो.
                         रंगाआप्पांची हि विहीर सर्वात जुनी आणि खूपच खोल. त्यामुळे अगदी कडक उन्हाळ्यातही भरपूर पाणीसाठा असायचाच. वर्षभर कधीही तिकडे न फिरकणारे आम्ही मे मध्ये मात्र खोल पाणी मिळत म्हणून जावे लागे.
 त्या दिवशी हि असेच आम्ही पोहायला गेलेलो. १२ वाजलेले सर्व मित्र जमलो. मी सोन्या, दिग्या, सुरश्या, महिप्या आणि बरेच. ! उन डोक्यावर आलेले. काही मोजक्याच शेतात ऊस असे तोही तुटून गेल्याने पाचटजाळून राख वाऱ्यावर उडत होती. बाकी उरलेली शिवारात  जोंधळे कापून झाल्यामुळे नुसते सड उरलेलं. बांधावरून चालत विहिरीवर आलो. बाजूला भलं मोठ आंब्याच झाड मध्येच वाऱ्याच्या झुळूकीनिशी सळसळ आवाज करत होते. दूरवर माळरान पसरलेलं. बाजूच्या ओढ्यालगत जराशी कुठे झाडांची हिरवळ! बाकी भकास. 
पोरानी पटापट उड्या टाकल्या. उन्हाने लाही लाही झालेलं देह थंड पाण्यात जलक्रीडेत मग्न झालेले त्यातच सोन्याला हुक्की आली तळाचा गाळ घेऊन यायची. याला आम्ही तळखडा काढणे म्हणत असू.  म्हणजे विहिरीच्या मध्यभागी जाऊन तिथून थेट तळाला जाऊन मुठीतून गाळ,खडे, जे काही हाती लागेल ते घेऊन येणे. 
सोन्या अर्ध्यातून वरती आला. विहीर खूप खोल. एवढ्या खोलवर जाऊन पुन्हा वरती येणे सोप्पे नव्हे. एवढा वेळ श्वास रोखता आला पाहिजे ना ! मग काय झाली स्पर्धा सुरू बघू कोण येतेय तळखडा घेऊन ??? 
बरेच असफल प्रयत्न झाल्यावर सुरश्या मात्र थेट तळाला जाऊन पोहचला होता. आला ! गाळ घेऊन आला. प्रचंड दमलेला , डोळे लालेलाल. धापा टाकत बाहेर पडला ते थेट अंग पुसायला घेतल. त्यापाठोपाठ सर्वांनीच वरचा रस्ता धरला. मनसोक्त पोहून झालेलंच. भिजलेल्या अंगावर उन्हं घ्यायला मज्जा येत होती , अन तोच सुरश्या कोसळला! चक्कर आली त्याला.
                      पोर कावरी बावरी झाली, तसाच उचलला आणि थेट घराकडे धावते झालो. तसेच अर्धवट घातलेली कपडे, ओल्या चड्ड्या तशाच हातात घेवून सर्वजण सुरश्याच्या घरी आलो, त्याचे वडील नव्हते घरात. आई आणि म्हातारीने पाणी पाजलं वारा घातला हळू हळू सुरश्या डोळे उघडायला लागला. रक्तासारखे लाल डोळे आता सुजू लागलेले, ताप पण चढू लागला तशी लगेचच त्याला गावात डॉक्टर कडे हलवलं. गर्दी जमलेली. शेजारचे बापूअण्णा बोलेले विहिरीवर परडी सोडा होईल बरा...  नाही जास्त. घोळक्याने लक्ष नाही दिले. 

रात्री घरी आणले पार सुकेलेला चेहरा. १ दिवस गेला, २ दिवस गेला, ताप कमी होईना रोज एक डॉक्टर येऊन सुई मारून जायचा. फरक एक रुपयाचा नव्हता दिसत. 
आतातर सुरश्याने खाणे पिणे पण सोडलं म्हतारी बाजूला बसलेली असायचीच वारा घालत पोराला. 
आई पदरात तोंड खुपसून रडतेय, बाजूला ढिम्म चेहरा करून गुंडाभाऊ बसलेत.
 गुंडाभाऊ - सुरष्याचे वडील.
आम्ही कधी मधी जाऊन बघून याय्चोच. पोरगं खात पीत नाही म्हंटल्यावर काळजी वाटायला लागली शेजारचे बापू अण्णा पण आलेले. 
पोराची अवस्था बघून  बापू अण्णा खवळलेच ! "गपगुमान हिरीवर जा आणि दामटा ठेव आणि परडी कर पोराच्या नावाने " 
"अण्णा अस करू मी शिक्षक आहे मी. मीच अस वागलो तर लोकांना अंधाश्रद्धेबद्दल काय शिकवणार मी " ? इती- गुंडाभाऊ. 
"ते तिकडे होउद्या काय बी तुमच्या शाळेचे अण्णा म्हणतेत तर करून बघूया की, पोराचं हाल बघवणा झालय".  सुरश्याची आई. 
"अर्र  गुंड्या लेका तुला नाही काही माहिती त्या हिरीची, मामला साधासुधा नाही ह्यो" - अण्णा. 

ताप चढायला लागला तसं गुंडाभाऊंनी सुरश्याला घाईनेच तालुक्याला नेला. उपचाराला साथ मिळत नव्हती. रात्रभर काय काय झाले देव आणि ते डॉक्टर जाने . सकाळचा  सूर्य उगवला तोच वाईट बातमी घेऊन. गावात सकाळी सकाळीच आमच्या सुरश्याचा निस्तेज देह आलेला. आमचा हुरहुन्नरी सुरश्या मध्यरात्रीच केव्हातरी आम्हाला सोडून खूप दूरवर गेलेला तो पुन्हा कधीही न येण्यासाठीच !! 
 हा सर्वांनाच फार मोठा धक्का होता. पण बापूअण्णा आणि त्यांच्या काही समवयस्क जुन्या खोडांना मात्र यात नवल वाटलं नव्हत. त्यांना याची चाहूल लागलेलीच फक्त थेट बोलून दाखवले नव्हते एवढचं. २ दिवसांनी असाच सुरश्याच्या घरी सार्वजन बसलेले ओट्यावर दुखाचं सांत्वन जो तो परोपरीने करता झाला.
 आणि कुणीतरी विषय छेडलाच. "अण्णा सांगा की काय झाल असेल. तुम्ही काहीतरी परवा बोलत होतात " - सुरश्याच्या काकीचा आवाज आला. 
अण्णांनी संपतनानाकडे पहिले. - संपतनाना - रंगाअप्पांचे ज्येष्ठ चिरंजीव रंगाअप्पानंतर तेच पाहतात शेतीवाडी. 
नानांनी मूक संमती दिली- 
अण्णा बोलते झाले - 
        १९७२  साल ते. सगळीकडे प्रच्चंड दुष्काळ जाणवत होता ४ वरीस  पाऊस नवता झाला . गावात माणसांचे हालहाल चाललेल, शेती नाही पाणी नाही, गुरांचे लांबच, माणसाना पिण्याचे पाणी मिळणे जिकिरीच झालेले. उपाय दिसत नवता. तेव्हा रंगाअप्पांनी एक धाडस केले विहीर खोदण्याच. पाणी लागल की नाही शाश्वती नाय पण कायतरी केलं पाहिजे होत. काम सुरु केले तिकडे कर्नाटकातून मजूर आलेले कामावर, कैक दिस काम चाललेलं खोली  वाढत होती पण पाणी लागत नवतं. आणि एक दिवशी ओलावा दिसला बघता बघता झरे फुटू लागले पाणी साचू लागला गावात आनंदीआनंद झाला ओढ्यापलीकडे भैरोबाला / बंधाबंधवरच्या म्हसोबाला पाण्याने न्हाऊ घातले गेले, निवद दिला आणि सांच्याला मात्र सर्व गार पडलं. 
 अपशकून झाला. गाळ उपसणाऱ्या यारीचा दोर तुटला आणि दगडधोंड्यांनी भरलेला डब्बा दाणकन खाली काम करणाऱ्यांच्या डोक्यात आदळला. एक नवरा बायको मजूर जोडपं  जागीच ठार झाल. देवभोळी लोक सर्व घाबरून गेली लागलेल्या पाण्याला नावे ठेऊ लागली पण अप्पांनी निर्णय घेतला अर्ध्या तासात दोघांची प्रेत वरती काढून बाजूलाच पुरली, तीही एकत्र आणि त्यावर एक आंब्याच झाड लावलं .  गावकरी  कोणीच काही बोललं नाही. का बोलेल कोण  ? केस होऊन काम थांबल तर अजून किती लोक पाणी पाणी करून मारतील ? त्यापेक्षा २ ठीकच ! गावकर्यांनी निष्ठुर होत मूक अनुमोदन दिलेलं, थोडक्यात बळीच घातला समजून पुढील काम अजून वेगाने सुरु झाले. विहीर पूर्ण झाली. मोठ्या उत्साहात पूजा पाठ झाले आनंदी झाला लोक त्या दोघांना विसरून हि गेले. आणि कदाचित हीच गोष्ठ त्या जोडप्याच्या आत्म्याला मान्य नसावी. 

  तिसऱ्याच वर्षी एका पोरीने जीव दिला त्या विहिरीत. २ दिवसांनी फुगून आली वर तेव्हा कळलं नाहीतर वाटलं माहेरीच गेलीय.  काहीच कारण दिसत नवतं. घरी सुख आहे नवरा गुजराच्या दुकानात कामाला होता, सुखाने २ घास खात होते.  ना भांडण ना तंटा. पण एका घराने सून गमावली. आणि सुरु झाला एक खेळ दृश्य आणि अदृश्य शक्तीमधील सामना. या खेळात दरवर्षी त्या परिसरात एक एक बळी जाऊ लागला. यात कोवळ्या वयातील जीव जास्तच गेले. आम्ही पामरं नुसतं बघण्यापलीकडे काहीच करू नाय शकलो. वर्सा दोन वर्साला अशा घटना नेहमीच्याच. शेवटची घटना तर पार काळजाला गर पडतील अशीच!!! वरल्या मळ्यातलं आबा - नातवाला पवायला शिकवायला घेऊन गेले दोघाही बुडाली प्रेत वरती काढली तर पोरगं माकडाच्या पिल्लावाणी गळ्याला मिठी मारलेल तस्सच्या तसं हुत. बघवत नवते ते दृश्य यातील काहीना आठवत हि असेलच की व्हाय की नाय गुंडा ? तू हुतास न तवा पंचनाम्याला हिरीवर आलेला ? गुंडाभाऊंनी खाली बघून फक्त मान डोलावली ! 
त्यांतर मात्र १० - १२ वर्स अघटीत नवतं घडलं. पण परवा मातर पोराची अवस्था बघून मला भ्या वाटलच.

"पोरानु तुम्ही बसलेल्या गांजण्या उठवलेत बघा. सावध असा". -अण्णा केविलवाणा चेहरा करत आमच्याकडे बघत म्हणले. 
आम्ही किलकिल्या डोळ्यांनी आपापसात पाहिलं. आतून भीती दाटून आली. 

                      सर्वाना कळून चुकलं नेमकं काय झालं असाव याचे अंदाज बांधले जाऊ लागले. बायाबापुड्या उठून जाऊ लागल्या तसं आम्हाला बी बोलावणे आले. त्या रात्री झोप तर लागलीच नाही. रात्र सर्व घटना डोळ्यासमोर तराळू लागल्या. मी परवा तसा त्या विहिरीवर जाऊन पण आलेलो पण घाबरून पळत सुटलो मागे. माझे सायकल च्या चावीचे किचेन त्या गोंधळात त्यादिवशी तिथेच कुठतरी पडलेलं. शोधायला गेलेलो धाडस नाही झाल आलो पळत. आता सर्वाना घरून सक्त ताकीद दिलेली "तिकडे फिरकलात तर दांडक्याने चोपून काढलं जाईल" . 
              त्या नंतर ४ दिवसाची गोष्ट- मी अकरा साडेअकराला नेहमीसारख रानात गेलो गुरांना वैरण टाकायचं काम माझ्याकडे असायचं. आमच्या शेतात जिथ गुरांचा गोठा आहे तिथून ती विहीर अगदी नजरेच्या टप्प्यात आहे. माझे काम झालेले सूर्य डोक्यावर आलेला. टळटळीत दुपार झालेली. सूर्य आग ओकत होता. मला माझ्या किचेन ची आठवण झाली, परिसर निर्मनुष्य होता त्यामुळे मला हटकणारेही कोणी नव्हते. आणि आता किमान २ वर्षे तरी काही अघटीत घडणार नाही अस अण्णाच्या बोलण्यात आलेल असल्याने भीती ओसरलेलीच. 
दोन चार बांध ओलांडून मी विहरीजवळ पोहचलो. वाळलेलं गवात फड पेटवला तेव्हाच जाळून गेलेलं. त्यामुळे त्याचे अर्धवट जळलेले सड कड कड आवाज करत पायाखाली चुरडत होते तितकाच काहीसा आवाज बाकी भयाण शांतता! पाठीमागे ते भलेमोठे आंब्याचे झाड तर बाजूला ती गूढ पाण्याची विहीर, आणि मी माझ्या कामात गर्क!!. मी विहिरीवर आलो तरी होतो पण तो निर्णय खरच माझा होता ? माहिती नाही. 

                इकडे तिकडे शोधाशोध केली पण व्यर्थ ! इतका वेळ मी मुद्दामहून विहिरीत डोकावण्याचे टाळत होतो मनात होतीच एक अनामिक भीती. पण आता मातर राहवलं नाही आणि मी पायरीवर गेलो. सुरश्याच्या आठवणीने व्याकूळ होत होतोच तोच तहान लागली आणि मी हळुवार पणे  पायऱ्या उतरत विहिरीत उतरू लागलो. कदाचित हाही निर्णय माझा नव्हताच. नसतं प्यायला पाणी तरी बिघडणार नव्हत पण मी कोणाच्या तरी सांगण्यावरून खाली उतरतोय अस मात्र एका मनाला वाटत होत. पण दुसर मान मात्र मला अगदी पाण्याच्या पातळीपर्यंत घेऊन गेलेच. शांत , गहिरे पाणी बघून जरा भीतीच वाटली पण माझ माझ्यावर नियंत्रणच रहिलं नव्हत. अगदी मनसोक्त एकटाच पोहत रहावं...   तासानतास!!!!! इथपर्यंत मोहाने पातळी गाठलेली आणखी काही वेळ थांब्लो असतो तर नक्कीच स्वतःला पाण्यात झोकून दिल असते ते कायमचच ! 

मनात काहूर माजलेलं विहीर वरून झाकली जातेय आणि मी एखाद्या पिंजऱ्यात अलगद अडकतोय. घटपर्नीच्या पानाच्या कोनात एखादा किडा पडावा आणि त्या वनस्पतीने कोण बंद करून त्या किड्याचे अगदी चोथा करावा अस माझ पुढच्याच क्षणाला  होणारं आहे,  हे हि कळतय मनाला. पण मन काहीच ऐकत आता नाहीये.आता मी खाली वाकतोय डोळे झाकून ओंजळीने घटाघट पाणी पीतोय मन तृप्त झालं आणि मी डोळे उघडतोय आणि माझी माझी पाचावर धारण बसतेय. ताडकन मी झटका लागल्यासारखं भानावर येतोय. -भरलेल्या ओंजळीत चक्क मला सुरेश चा केविलवाणा, निस्तेज चेहरा दिसतोय. चेहऱ्यावरील भाव सांगतायत योग्या पळ इथून, निघ आत्ताच्या आत्ता नाहीतर तुझ खरं  नाय . सरकन शरीरातून वीज आरपार व्हावी तशी लहर गेली आणि झटक्यात मी भानावर आलो ते थेट पळतच वरती आलो. आणि काय आश्चर्य सर्व समसूम जैसेथे जणू काही घडलेच नाही. अगदी माझ मन ही क्षणात स्थिर व्हावं, आणि मला पुन्हा विहिरीवर घुटमळत राहावं वाटणं हे सर्व अनैसर्गीकच ! 'मी न माझा राहिलो ' या ओळीचा अर्थ कदाचित तो असावा. 
आता नजर खाली पडलेल्या एका आंब्यावर पडली. एक वर्षाआड फळ धरणारे हे झाड यंदा तुरळक च फळे होती त्याचीही उतारी झालेली. पुढे सरकून ते फळ हातात घेतले. मऊ लागलं पाडाचा आंबा होता. पाडाचा आंबा खाण्याचा मोह टाळणारा क्वचितच ! मी मोहाला बळी पडलो. तो आंबा खाऊन हि झाला. आता नजर झाडावर चुकारीचे पाड(पाडाचे आंबे ) शोधू लागली. ४ ५ दिसले तसे मी सरसर झाडावर  चढलो. ज्या फांदीवर एक आंबा दिसला तो खूपच टोकाला होता पुढे पुढे सरकू लागलो तशी खाली विहिरीचं पाणी दिसू लागलं मला ते अजिबात आवडल नाही पाणी दिसणे. मी मागे फिरलो आणि दुसरे शोधू लागलो. कदाचित माझं मागे फिरणे हे कोणालातरी आवडल नसावं . आता मी फांदी बदलली झाडाच्या बऱ्यापैकी  उंचीवर पोहोचलोय. दोन तीन आंबे तोडून कंबरेला बांधलेल्या टावेल मध्ये बांधलेही. अजून एक पिवळा धम्मक झालेला आंबा दिसतोय म्हणून मी बाजूच्या फांदीवर अगदीच लवचिकपणे स्थिरावलो अन तो आंबा तोडायला पुढे सरकणार तोच नजर जराश्या खालच्या पण विरुद्ध दिशेच्या फांदीवर गेली आणि मी चमकलोच. पोटात भीती गोळा आला. डोळ्यात भीतीअश्रू दाटले, कंठ दाटून आला. का न यावा ? त्या फांदीवर मी काय पाहतोय ? सांगू ? आहे तयारी ऐकायची ? 

                        त्या फांदीवर मला सुरश्या दिसतोय अगदी तसाच दीनवाना, निस्तेज, आजारी वाटावा असा. हातात एक आंबा घेऊन मला खुणावतोय "हा पण घे आंबा मस्त पिकलाय, आवडेल तुला" ! 
माझं एक एक गात्र बधीर होतंय आता, संयम सुटतोय, मदतीसाठी जोरजोरात ओरडतोय पण कंठातून कसलाही आवाज बाहेर येत नाहीये. बर्यापैकी उंचीवर असल्याने पटकन उतरणे शक्य नव्हते आणि हीच संधी त्या अज्ञात शक्तीने साधली ! मी लोंबकळून खालच्या फांदीवर आलो. आता मात्र आणखी एक धक्का बसला कोणीतरी आसपास वावरतंय असा भास झाला. पुढच्याच क्षणी जाणवतंय की तो भास नाही जाणीव होतेय मला. आता माझे पाय लटपटू लागलेत. डोकं गरगरल्यासारखं होतंय. बाजूच्या फांदीवर अजूनही सुरेशभाऊ दिसतायातच. माझे लक्ष मात्र तिकडे केंद्रित आहे पण नजर चोरतोय मी. तिकडे पहायचही धाडस नाहीये माझ्यात. आजूबाजूच्या फांदीवरून मला तिकडे विहिरीकडे ढकलले जातंय असं जाणवतंय, काहीही करून मला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठीचे ते अनामिक प्रयत्न माझ्या बधीर झालेल्या संवेदनांना जाणवू लागलेत. आजूबाजूला अदृश्य असणारे कोणीतरी मला कोणत्याही क्षणी उचलून विहिरीत फेकून देईल याची भीती माझे प्राण कंठाशी आणतेय. 
हे सर्व खेळ हे माझ्यापासून काही हात अंतर राखून असल्याने मला अगदीच किरकोळ सुरक्षित वाटतंय. हळूहळू मन बाहेर पडू पाहतंय तसचं हे हि कळतंय की विहिरीपासून जेवढा मी दूर तेवढा मी सुरक्षित वाटतय! त्यामुळे मी उतरण्यासाठी खोडाकडे जाने टाळून जमिनीकडे झुकलेल्या फांदीकडे सरकतोय. थरथरणारे अंग अलगद खालच्या फांदीवर उतरवलं तोच एक अनपेक्षित स्पर्श जाणवला, जक्ख म्हातारी झालेली रुक्ष त्वचा असल्याचे जाणवले. हाडकाना चिकटलेली कातडी वाटावी तशी आणि मी दचकलो हात पाय गळून च गेले. आणि याच गोंधळात हात सुटले ,सरसर करत छोट्या मोठ्या फांद्या अंगाला ओरबाडत कोसळलो, हाताला लागलेलं लोंबकळनारे बांडगुळ तेही तुटलं आणि मी धप्पकन आदळलो. आता मात्र पूर्ण शुद्धीवर आलो होतो. काय झाले ते कळण्यापलीकडे होते. बुडक्याला काढलेली चप्पल उचलली आणि घराकडे धावत सुटलो. मध्ये च कधीतरी थांबून ती पायात घातलेली आठवतेय. धापा टाकत थेट बापूअण्णाच्या घरी आलो. सखूआज्जी वाकाळ शिवत निवांत गुंग झालेली. तिची तंद्री तोडत विचारलं अण्णा कुठेत ? 
"ते ह्या येळेला घरी असत्यात व्हय?" जा वस्तीवर असतील बैलांना कुटण घालत असतील" - साखुअज्जी 
डाव्या चपलीचा निघालेला पना अंगठ्याने दाबून बसवून खाली टाकत तसाच पाय घातला आणि पळत सुटलो ते सरळ वस्तीवर गेलो. सरळवाटेने न जाता ढेकळातून वाट काढत सपरापाशी पोहोचलो. 
पिंपर्णीची २ झाडे, एक छप्पर, एक बाजूला बाज व आजूबाजूला रवंथ करणारी गुरे.
"काय र का उन्हातान्हाचा आबाद्तोयस"
बैलांची वशिंड गोंजारत आबा  उद्गारले. 
मी आधी मठातील पाणी घटाघटा पीत म्हंटल "परवा सांगितलेलं तुम्ही सर्व खरं आहे ?
 "पटल तर घे नाहीतर सोडून दे तुम्हा पोरांना नाही पटत काही आम्ही काय आपले सांगायचे काम करतो "
अण्णांना तोडत बोललो "हिरीवर गेल्तो "
"कशाला ?"  अण्णांचा तिथून च प्रश्न 
मी निशब्द ....... 
"अस एकटा दुकटा जात जाव नगस नाहीतर सुरश्याची गाठ पडल" असा एक केविलवाणा विनोद करून अण्णा विस्कटलेल्या आपल्या पांढऱ्या मिशीत हसले. 
"हो पडली गाठ!" "वाचलो"!! "म्हणूनच आलोय तुमच्याकडे"  -मी 
 अण्णा जरा सावध झाले. बैल सोडून आता माझ्याकडे आले . बाजेवर मी बसलेलो अण्णा जवळ आले 
गंभीर भावमुद्रेत अण्णांचे  प्रश्न "काय झालं ?" बोल का घामाघूम झालयस ? काय दिसलं ? बरा हायस नव्ह ? 
मी म्हंटल 'मला सुरश्या २ वेळा दिसला'. 
अरे दोस्त होताना तुझा म्हणून भास होत असेल तुला तिकडे गेल्यावर. पण गेलतास काहून तिकडं ? 
मला नव्हत जायचं. पण कसे गेलो कळलं नाही आणि लै काय काय घडलं ... 
आणि मी मग रडत रडत एक एक प्रसंग सांगितलं जसाच्या तसा.

अण्णा अधिकच गंभीर झाले. म्हंटले ते झाड तरी कुठं सुटलंय यातून त्या दोघं नवरा बायकोच्या हाडामासाचा खात खाऊन मोठं झालंय त्या शरीराचे अंश या झाडात का नसतील व्हय ? आता शरीर सोडून आत्मा जाईल कुठं ? आणि त्यात हे जिवंत झाड मिळालं तर सोडील व्हय ते ? हे सर्व मला डोक्यावरून होत. 
अण्णा सांगत राहिले 
-त्या आंब्याच्या झाडाने पण दोघेजण खाल्लीत. आंबे उतरताना वादळ आले आणि वरून पडल्याचं निमित्त ! 
ती जागाच वाईट आहे पोरानु नगा रं  तिकडे जात जाऊ . 
बरीच जन  दगावलीत तिथं. सुरश्याला फक्त तू तुझ्या हयातीत पाहिलास ना म्हणून तोच दिसला तुला! बाकीचे चेहेरे  तू पहिलेच नाहीस कधी तर दिसणार तशी कशी ? नाहीतर सर्व च्या सर्व जणांनी यारबडुन टाकलं असता तुला .
"पोरांच्या डोक्यात भ्या शिरू नये म्हणून म्हातारी माणसं टाळतात ह्यो इशय पण तुम्ही काढताय मेलेली मढी उकरून" अण्णा स्वतःशीच पुटपुटले 
"आता काहीतरी केले पाहिजे, असं सुरु झाले तर कवळी कवळी पोरं रोज एक खाईल  त्यो.! "
"जा घरी आणि  यातून पुन्हा असं फिरत नग  जाऊस."  "जरा घरात बसत जा आय बापाला घोर लावून उनाडक्या करताय. काय सोसावं लागतंय त्यांना ते सुरश्याच्या बापाला  इचार" अण्णांनी मला दमात घेतला तास मी गुमान घाटी गेलो. 

 चार दिवसांनी अमावस्येला काही मोजकी मंडळी मिळून विहिरीवर पूजा, परडी, कोंबडं असा बेत झालेला पुसटसं आठवतंय. 
नंतर मात्र कोणती घटना कानावर नाही अली ती आजतागायत !

टीप - पूर्वीचीच (मागच्या ब्लॉगची )

©योगेश आलेकरी

4 comments:

 1. ☺️ कारे घाबरावतोय! मस्त लिहीलेय! शेवटपर्यंत एका दमात वाचले जातेय! 👍👍

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद.. :)


   वाचताना लिंक तुटू न देणे हीच काय ती कसरत अशी काल्पनिक गोष्ट उतरवताना ;)

   Delete
 2. लय भारी !...बऱ्याच हिरी,झाडं आठवली ...आणि काही प्रसंग पण ...वेगळ्या मितीमधले अनुभव देणारे.

  ReplyDelete
 3. Aaichya gaavat.. kamaaaaallll.. shevat paryant proper guntavnar likhan..

  ReplyDelete