Monday, 20 July 2020

बदलाचे वारे

बदलाचे वारे. 

वयाच्या 19 व्या वर्षी, मी 2009 ला मुंबई ला गेलो, कॉलेज, जॉब, बिजनेस हे सर्व सेट करण्यात 10 वर्षे कशी गेली कळलं ही नाही. या काळात चार दोन महिन्यांनी मी गावी यायचो पण गडबडीत असायचं सर्व. 4 दिवसांत परत जोखड खांद्यावर घ्यायला मुंबई ला रवाना. 

आता 4 महिने गावी आहे. कोरोनामुळे सर्व जग ठप्प आहे, कोरोनाने सर्वांची वाट लावलीय. सर्वांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालंय. मी पर्यटन व्यवसायात, आमच्या फिल्ड चे तर सर्वात जास्त आणि दूरगामी नुकसान झालेलं आहे. लाखोंचं नुकसान भोगून ही कोरोनामूळे मला 4 महिने निवांत जगता आले म्हणून कोरोना ला मनाच्या एका कोपऱ्यातून थँक्स म्हणणारा मीच असेल. कोणीही ठरवून असे 4 (किंवा 5 6 ही) महिने सर्व व्याप सोडून  आयुष्यात कधीच थांबणार नव्हता. निवांतपणा अनुभवणार नव्हता. कोरोना ने सक्ती ने ते दिलंय. वाईटातून चांगले.


       
या 4 महिन्यात मी खूप निरीक्षण केले, गावाचे, गावातील लोकांचे, समाजातील बदलाचे, निसर्गाचे, त्यांच्यातील बदलाचे, पशुपक्षी यांचे. शेती चे.
तर मी आज शेती मधील बदल अनुभवलेले आणि निसर्गचक्र कसं बिघडले त्यावर केलेलं निरीक्षण लिहत आहे. 

 सर्वात मोठा बदल म्हणजे पक्षांची रोडवलेली संख्या. 
मागच्या 10 वर्षात आमच्या भागात पाण्याच्या मुबलक सोयी झाल्या, त्यामुळे शेतीत आमूलाग्र बदल झाले कोरडवाहू वाटणारा भाग आज बागायत झालेला आहे,  जमिनीचा कोपरा न कोपरा लागवडीखाली आणण्याची धडपड सुरू झाली.  उसामुळे एका एका सरीचे, फूटभर जागेचे ही महत्व वाढले. परिणामी बांधावर असणारी भली मोठी झाडे अडचण ठरू लागली. उत्पन्नात बाधा आणणारे घटक हटवू जाऊ लागले त्यात प्रामुख्याने बांधावरील बाभूळ, निंब, करंज, काटेरी झुडपे, पिंपळ, वड, चिंच, शेवरी हे झाडे मोठ्या प्रमाणात तोडली गेली. बाभूळ तर आज भागात दुर्मिळ झालीय. बाभूळ यावर एक वेगळा लेख लिहावा लागेल.
आता उत्पन्न तर वाढू लागलंय पण इतर अदृश्य नुकसान होत आहेत. उदा. झाडे तोडल्याने वादळे सरळ गावात घुसत आहेत.  पाऊस अनिश्चित झालेला आहे. पक्षी जवळपास दिसेनासे च  झालेले आहेत. 

पक्षी कमी झाल्याने पिकांवरील कीड वाढू लागली आहे, 
10 वर्षांपूर्वी नसलेल्या किडी आज पिकांवर आहेत. पक्षी हंगामी पिकावरील कीड खाऊन ती नियंत्रणात ठेवत असतात पण आज कोणत्याही पिकांवर औषध फवर्णिशिवाय पर्याय नाही.  आता जी काही पक्षी शिल्लक होते ते फवारणी केलेली किडे खाऊन मरू लागलेत. 
कोरडवाहु शेती होती तेव्हा शाळू, ज्वारी, बाजरी असली पिके असत पक्षी आपली गुजराण त्यावर करत असत. पक्ष्यांचे थवे च्या थवे शेतांत बागडताना चे दृष्य दुर्मिळ झाले. 

पूर्वी मका, बाजरी, ज्वारी यांचे कणीस घरात पडवीला, गुरांच्या गोट्यात टांगून ठेवले जात होते, पीक काढल्यानंतर पक्षांना काही काळ तरी खाद्य मिळावे हा उदात्त हेतू त्यामागे असे. आता आपण फक्त आपले पोट बघतोय इतर जीवांना कवडीमोल करून टाकले आहे. 

कोंबड्या पाळणे कमी झाले आहे, कोंबड्या सर्व उकिरड्यावर फिरुन किडे खात असतात, हुमनी या किडीने तर शेतकऱ्यांना जेरीस आणले आहे ही हुमनी कीड खतांतून जमिनीत जाते. पक्षी उकिरड्यावर दिसणारी सर्व कीड खात असत, पायांनी उकरून हुमनी खात असत आता पक्षी नाहीत, कोंबड्या नाहीत तिकडे हुमनी वाढलेली दिसून यतेय. 
सायंकाळी आम्ही शाळेतून घरी येत असताना आकाशात असंख्य पक्षी घरट्याकडे जाताना दिसत असत. आता चुकून एखादा पक्षी दिसतोय. 
मोठी झाडे तोडल्याने पक्षांना घरटी बांधण्यास जागा नाही, 
सर्वत्र खुरटी संकरित झाडे दिसतात आता. 
बैलाने शेती इतिहासजमा झाली, ट्रॅक्टर ला अडथळा नको म्हणून अजून झाडे तोडली गेली. 
रासायनिक खतांचे प्रमाण वाढले, संकरित बियाणे वाढले त्यामुळे कित्येक अपरिचित तणे शेतात दिसू लागलीयत. मग त्यावर आता तणनाशक फवारणी आली. अतिशय जहाल तणनाशके, कीटकनाशके फवारून आपण नैसर्गिकरीत्या कीड खाणारे सरडे, खार ई. सरीसृप संकटात टाकत आहोत.  
नैसर्गिकरित्या आलेली मोठं मोठी झाडे तोडली गेल्याने वांडरांनी गावावर आक्रमणे सुरू केली. वड, पिंपळ, निंब अशी झाडे तोडल्याने वनरांना खाद्य नाही. मानवास उपयुक्त नसणारी पण निसचक्रात मोलाचे योगदान देणारी ही झाडे, त्यांची फळे, फुले यावर वानर जगत असतात. आता ते खाद्याच्या शोधात गावात येतात कुंपणतील फळझाडे, फुलझाडे यावर ताव मारतात. हा एक प्रकारचा उपद्रव च आहे. 
अजून एक विषय म्हणजे जमीन वाढवण्याचा नादात भराव घातले गेले, पाण्याचे प्रवाह अरुंद केले. 
त्यामुळे पाण्याचा वेग वाढून अजून नुकसान, पूरस्थिती निर्माण होतेय.

सारख्या बऱ्याच छोट्याछोट्या गोष्टी  मागच्या 4 महिन्यात दिसून आल्या. शेतीतून उत्पन्न वाढलेच त्यात शंका नाही च पण आपल्या हातून नकळत निसर्गाचे खूप नुकसान होत आहे आणि ते टाळणे अशक्य आहे, अस मला वैयक्तिक वाटते.
आमच्या शेतीच्या बांधावरील ही खूप झाडे तोडली गेलीत यावर उपाय म्हणून मी तरी यंदा 140 नवीन झाडे लावून एक केविलवाणा प्रयत्न केला आहे. सर्वांनी असा प्रयत्न केल्यास बदल दिसू शकेल.
बाभूळ या विषयी लवकर एक पोस्ट करेल. 
तूर्तास धन्यवाद 🙏



(टीप- मी शेती विश्लेषक नाही माझ्या अल्पमतीस दिसलेली निरिक्षणे मी मांडली आहेत, काही ठिकाणी वेगळे ही असू शकेल) 


©योगेश आलेकरी

Lords - The revenge

                Lords - the revenge             तब्बल 2 महिने बाईक चालवून मी लंडन ला पोहचलो. 2 दिवस स्थिरस्थावर झाल्यावर मी लगेचच लॉर्ड क्रि...