Friday 26 April 2024

Lords - The revenge

                Lords - the revenge 

           तब्बल 2 महिने बाईक चालवून मी लंडन ला पोहचलो. 2 दिवस स्थिरस्थावर झाल्यावर मी लगेचच लॉर्ड क्रिकेट मैदानाला भेट द्यायला गेलो. हेच ते लॉर्डस मैदान ज्याला क्रिकेट ची पंढरी मानले जाते. जिथून क्रिकेट च जन्म झाला म्हणू शकतो तेच हे ऐतिहासिक लॉर्डस चे मैदान. 


           पण याही पेक्षा माझ्या आयुष्यात लॉर्डस चे महत्व वेगळ्याच कारणासाठी होते ते म्हणजे भारतीय क्रिकेट ला अग्रेसिव करण्याची पायाभरणी करणाऱ्या एका घटनेमुळे. आपला लाडका दादा उर्फ सौरव गांगुली त्याने इंग्लंड संघाला लॉर्डस वर अस्मान दाखवलेलं च पण Englishman Flintoff च्या उन्मादी वृत्तीला त्याच्याच भाषेत टीशर्ट काढून उत्तर दिलेले त्या लॉर्डस च्या ऐतिासिक गॅलरी ला मला भेट द्यायची होती. त्या गॅलरी मध्ये मला माझे riding jacket फिरवायचे होते आणि तिथं एक मस्त फोटो काढायचा होता मग सोबत एक मैत्रिणीला घेऊन लॉर्डस ला गेलो. 



चला तर त्या मागची कहाणी पाहूया..... 

        दादाची दादागिरी ( सौरव गांगुली) 

        साल 1999 भारतीय क्रिकेट मधील एक काळा कार्यकाळ. अझहर सारखं यशस्वी कप्तान मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी सापडतो सोबतच अजुन काही स्टार खेळाडू ही दोषी आढळतात आणि मग भारतीय क्रिकेट ला एक प्रकारचं ग्रहण लागू पाहत होते. संघ बिखरला, कप्तान वर बंदी, जगभरात झालेली भारतीय क्रिकेट ची बदनामी. अशा स्थितीत नुकत्याच संघात स्थिरस्थावर होत असलेल्या दादाच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडली. सर्व अनुभवी खेळाडूंनी अंगावरील पाल झटकावी तशी कर्णधार पद झटकवलेले. आणि अशात च त्या काटेरी सिंहासनावर दादा म्हणजेच ९० किड्स वाल्यांचा लाडका खेळाडू सौरव गांगुली विराजमान झाला. खरंतर बळीचा बकरा बनवण्यासाठी दिलेल्या त्या कॅप्टन पदाचे दादाने अक्षरशः सोने केले. 

           संघाची पुनर्बांधणी केली. U19 मधील युवराज, भज्जी, झहीर, सेहवाग, कैफ अशी नवी फळी तयार केली नवख्या पोरांना घेऊन अल्पावधीत च गांगुलीने संघ जिंकू शकतो ही अशा निर्माण केली. 2001-2002 या काळात तब्बल 7 icc इव्हेंट मध्ये फायनल गाठली पण दादाच्या दुर्दैवाने म्हणा किंवा प्रेशर मध्ये भारतीय संघ नेमका कच खात असल्याने अजून तरी फायनल नावावर पडली नव्हती. Hero cup, Pepsi cup, tvs triangular series etc मध्ये जोरदार कामगिरी करून दादाने भारतीय क्रिकेट ला पुन्हा ते वैभव मिळवून दिलेलं. 


          अशातच एकदा जानेवारी 2002 मध्ये इंग्लंड चा संघ भारत दौऱ्यावर आलेला. मी 6 वी मध्ये होतो नुकताच घरी BW TV आलेला त्यामुळे स्वतःच्या घरात बसून मॅच बघण्याचे स्वर्गसुख मिळणार होते. 3 कसोटी आणि 6 एकदिवसीय सामन्यांचा भरगच्च कार्यक्रम होता. गांगुलीच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका भारताने 1-0 ने जिंकली. आम्ही तेव्हा मारझोड तोडफोड फटकेबाजी अशा क्रिकेट ला प्राधान्य देणारे असल्याने कसोटीवर खास लक्ष नव्हते पण ODI ची मोठी उत्सुकता लागलेली. पहिला सामना भारताने जिंकला. दुसरा इंग्लंड ने जिंकला मालिका बरोबरीत आलेली. 3 फेब 2002 ला वानखेडे ला फायनल येईपर्यंत भारत 3-2 ने आघाडीवर होता आता फायनल मारून ब्रिटिशांना हात हलवत परत पाठवायचे असं आम्हा मित्रांनी ठरवून ही टाकलेलं. 

           3 फेब वानखेडे वर शेवटची अटीतटीची मॅच सुरू झाली. इंग्लिश कर्णधार नासिर हुसेन ने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा स्वीकारली इंग्लिश सलामीवीर कोणीतरी त्याने 95 धावा केल्या पण बाकी संघ भज्जी ने 5 विकेट घेऊन 255 मध्ये गुंडाळला. भज्जी 5 विकेट गांगुली 2 विकेट सचिन 2 विकेट घेऊन सामन्यावर मजबूत पकड मिळवलेली. भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला सलामीची स्पोटक जोडी (सचिन सेहवाग) ची स्वस्तात परतली गांगुलीने धुरा सांभाळत 155-3 अशा मजबूत स्थित संघ नेऊन ठेवला. 205 वर 5 वी विकेट दादाची पडली तडाखेबंद 80 धावांची खेळी करून गांगुली विजयाची मेख ठोकून पविलयन मध्ये परतलेला आता फक्त 50 धावा हव्या होत्या पण उरलेला संघ खेळपट्टीवर हजेरी लावून परतू लागल्यावर दादा खूप च भावनिक झालेला दिसू लागला. 

         शेवटी 12 बॉल 18 धावा. कुंबळे आणि हमांग बडानी खेळपट्टीवर उभे.49 वी ओवर आणि फक्त 7 धावा निघाल्या. आता 6 बॉल 11 आणि नासिर हुसेन ने सामना वाचवण्याची जबाबदारी अँड्रु Flintoff कडे दिली. सामना इंग्लंड कडे झुकला कारण सेट फलंदाज बदानी नॉन striker वर होता समोरील पडझड पाहण्याशिवाय त्याकडे काहीही उरले नव्हते. तरीही कुंबळे आणि बदनी यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू होताच त्यात कुंबळे runout. मग श्रीनाथ ने पहिल्याच बॉल वर त्रिफळाचित होऊन ब्रिटिशांना जल्लोष करण्यास मैदान मोकळे करून दिले. कर्णधाराने टाकलेलं विश्वास सार्थ ठरल्याने Flintoff च्या उन्मदाला सीमा उरली नव्हती, भावाने टीशर्ट काढून मैदानात सैरावैरा पळत सुटला. Flintoff चा हा उन्मादी जल्लोष सर्वानाच खटकला आमचा सौरवदादा अतिशय हळवा मैदानात बेंगोल रॉयल टायगर सारखं वर्तन असलं तरी अशा भावनिक क्षणी दादाच्या चेहऱ्यावर ते दुःख वेदना हतबलता कधी लपून राहत नव्हती. Flintoff चा तो मजूर्डेपणा बघून दादा रडवेला चेहरा करून आत पवेलियनमध्ये गेला. सामना गेला उडत आमच्या दादाच्या तोंडावर साफ साफ दिसलेलं रडू बघून आमचा बांध फुटला. खरेतर तिथं जाऊन Flintoff ला थोबाडविण्याची ईच्छा झालेली. कदाचित गांगुली ची पण तिच ईच्छा असल्याचे दिसतही होते पण कप्तान असल्याने तो काही करू शकत नव्हता आणि इकडे मी घटनास्थळापासून 350 km दूर B/W टीव्ही समोर असल्याने काही करू शकत नव्हतो. मालिका 3-3 अशी बरोबरीत सुटली. 2-4 दिवस बातम्यांमध्ये हार जित आणि Flintoff चे वागणे यावर लेख पडत गेले आणि सर्वजण विसरून ही गेले. पण दादाच्या काळजात खोलवर झालेला तो घाव दादा विसरला नव्हता दादा संधीची वाट च पाहत होता.



           आणि दादाला ती संधी दिसू लागली अगदी नजरेच्या टप्प्यात. NatWest series - IND - ENG - SL त्रिकोणी मालिका. जून- जुलै 2002 भारतीय संघ सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंड ला रवाना झाला दादाने बांधणी केलेला तसा नवखाच पण पूर्ण जोशिले पोरांनी भरलेला संघ परदेशात कमी अनुभवी असला तरी त्यांचा नेता सर्वांना लीड करण्यास खंबीर होता. इंग्लंड आणि भारताच्या झंझावाती खेलापुढे श्रीलंका संघ बाहेर पडला आणि दोन तुल्यबळ संघ आता फायनल मध्ये एकमेकांना अंगावर घेणार होते. 

     स्थळ लॉर्डस क्रिकेट ग्राउंड. 

    दिनांक - 13 जुलै 2002. 

              नाणेफेक जिंकून इंग्लिश कप्तान नासिर हुसेन ने फलंदाजी घेतली झहीर ने नेहमीप्रमाणे पहिली विकेट लवकर घेतली पण तो आनंद जास्त काळ टिकला नाही कारण नासिर हुसेन आणि मार्कस या दोघांनी भारतीय गोलंदाजी ची पिसे काढत स्कोअर 227 वर नेला दोघांनी शकते ठोकली कॅप्टन नासिर हुसेन ने तर पत्रकारांना पाठीवर बोट दाखवत कुत्सितपणे जर्सी no. 3 दाखवला. इंग्लंड 227-2 अशा मजबूत स्थितीत होता. त्यानंतर 3 री विकेट थेट 307 वर पडली तरी अखेरच्या 4 overs मध्ये फक्त 25 धावा देणे हेच भारतीय गोलंदाजी चे मोठे यश म्हणले गेले. इंग्लंड ने 325 चे टार्गेट दिले. भारतीय तंबूत सन्नाटा. त्याकाळात 280-300 स्कोअर चेस करणे अशक्य मानले जाई. त्यात चोकर्स म्हणून टीम इंडिया बदनाम झालेली. lords मैदानात मॅच म्हणजे जगाचे लक्ष लागलेले प्रचंड प्रेशर. त्यात 326 धावांचे अवढव्य लक्ष्य. जवळपास हार सर्वांनीच मानलेली. 

           दादा सेहवाग ला घेऊन मैदानात उतरला आणि तुफान सुरुवात करून दादा आज bat नाहीतर तलवार च घेऊन उतरला आहे की काय असा त्याचा आवेश होता. फास्टर चा मारा बोथट करत 106 वर धावसंख्या गेली आणि दादा out झाला. त्यानंतर पुन्हा तेच सर्व दिग्गज हजेरी लावून परतले 106-1 ते 146-5 अशी नाजूक परिस्थिती दिसू लागली 5 वी विकेट Tendulkar ची पडली आणि सामना पुन्हा इंग्लंडकडे फिरला. कारण इंग्लिश बॉलर्स चा सामना करण्यास कोणी उरले च नाही असा सर्वांचा समज झालेला मैदानात कैफ उतरला नवखा खेळाडू कोणाच्याच अपेक्षा नव्हत्या नासिर हुसेन तर कैफ ला बस ड्रायव्हर म्हणून चिडवत होता. युवराज आणि कैफ यांनी अनपेक्षित रित्या 131 धावांची अतिशय महत्त्वपूर्ण अशी partnership केली आणि बघता बघता सामना पुन्हा इंग्लंड च्या हातून हिसकावून घेत भारतीय तंबूत आणला खरा पण लगेचच कॉलिंगवूडने युवराज ला बाद केले आणि पुन्हा पारडे इंग्लंड कडे झुकले कारण हा शेवटचा फलंदाज. आता भज्जी कुंबळे जहीर नेहरा हे उरलेले आणि अजुन ही तब्बल 70 धावांची गरज होती. कैफ ने सूत्रे हातात घेत धावसंख्या वाढवत नेली भज्जी ने 15 धावा करत कैफ ला साथ दिली. 18 बॉल 14 धावा असे समीकरण झालेलं मॅच जिंकणे अजूनही भारतासाठी अशक्य होते कारण 48 वी ओवर ला बॉल Flintoff च्या हातात. यातून सुटले तर पुन्हा 50 व्या ओवर ला Flintoff च येणार हे नक्की होत. 

             नियतीची खेळी पाहा 6 च महिन्यात तीच परिस्थिती सेम वानखेडे मॅच सारखी. सेट फलंदाज कैफ nonstiker end ला. सर्वांना धाकधूक. आणि Flintoff ने मॅच फिरवलीच.! 3 धावा आणि 2 विकेट भज्जी आणि कुंबळे out. आता झहीर खान आला कसाबसा एक बॉल खेळला. 49 व्या ओवर चा शेवटचा बॉल कैफ strike वर होता. कशीबशी एक रन काढून लास्ट ओवर मध्ये strike वर राहण्यासाठी कैफ ने अंधाधुंद bat फिरवली आणि bat ची कड लागून थर्ड man ला चौकार. हा चौकार कोणीही एन्जॉय नव्हता केला कारण आता strike वर झहीर खान आणि बॉल Flintoff च्या हातात. अजुन ही काय होईल कोणालाच अंदाज येत नव्हता. तब्बल 324-8 अशा धावा भारताकडून तेही लॉर्डस वर आणि इंग्लंड ला चेस करताना स्वप्नवत वाटणारी परिस्थिती निर्माण झालेली. लॉर्डस च्या गॅलरी मध्ये दादा गळ्यातील लॉकेट मुठीत पकडुन जणू जीव् मुठीत घेऊन बसलेला. पहिला बॉल डॉट. इंग्लिश फिल्डर नी अकारण जोरदार अपील करून झहीर वर दबातंत्राचा वापर करू लागले. दुसरा बॉल झहीर टोलवत एक रन साठी धावतो. throw miss होतो दोघे पुन्हा एक रन काढतात आणि थेट पविलयन धावत सुटतात. सामना भारताने जिंकला. 326 असा प्रचंड मोठा स्कोअर चेस केला गेला. Flintoff पीच वर मान खाली घालून बसलेला उठलाच नव्हता. 

            तिकडे लॉर्डस च्या गॅलरी मध्ये एक वेगळेच नाट्य घडले. सर्वांना अनपेक्षित असे दृश्य - सौरव गांगली टीशर्ट काढून गोल गोल फिरवत होता. हा लढाऊ पणा, आक्रमकपणा दादाने भारतीय संघात भरलेला. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, विंडीज यांची क्रिकेटवर असलेली मक्तेदामक्तेदारी काढत भारताची दादागिरी सुरू झालेली. आमच्यासारख्या असंख्य लहान मुलांच्या आयुष्यात सौरव गांगुलीने अनदांचे क्षण भरले त्याला सचिन सेहवाग युवी झहीर कैफ द्रविड यांची साथ लाभत गेली. त्या काळी tv मोबाईल internet कार्टून चॅनल्स असले प्रकार आमच्या आयुष्यात नसल्याने खेळ हाच एकमेव करमणुकीचे आणि आनंदाचे साधन. त्यामुळं त्या घटनेकडे खेळ म्हणून कमी आणि भानविक म्हणून आम्ही जास्त जोडले गेलेलो. 90s generation हे समजू शकते.




               त्या गॅलरी ला भेट देण्यासाठी मला तब्बल २१ वर्षे लागली. पण अनंद् हा होता की मी मुंबईतून बाईक वरून इंग्लंड आणि लॉर्डस ला गेलेलो. दादा उर्फ सौरव गांगुलीने सहाच महिन्यात बदला घेतला असला तरी मला २१ वर्षे लागलेली. लॉर्डस मैदानाच्या visit दरम्यान मी क्रिकेट संबंधी अनेक गोष्टी तिथे पहिल्या. एक अतिशय बोलका हजरजबाबी गाईड त्या मैदानाची सैर घडवत होता. त्याने अतिशय माहितीपूर्ण ती सैर घडवली संपूर्ण स्टेडियम फिरून पाहिले सर्व रूम पवेलियनस पाहिले. तिथे museum मध्ये गांगुलीची ती जर्सी पहिली, 1983 ला कपिल सरांनी उंचावलेला World Cup पहिला. लॉर्डस चे ते प्रसिद्ध मीडिया सेंटर पाहिले. हाडाचा क्रिकेट प्रेमी असाल तर आयुष्यात एकदा तरी लॉर्डस सफर करावीच. Flintoff च्या एका अँक्शन ला दादाने लॉर्डस वर उत्तर दिले त्या संपूर्ण मैदान सफरीत Flintoff चे नाव एकदाही त्या गाईड च्या तोंडातून आले नाही, पण गेले २१ वर्षे दिवसातून २ वेळा त्याला सांगावं लागतं की हा इंडियन कॅप्टन सौरव गांगुलीचा टीशर्ट आहे. आणि या गॅलरी मध्ये तो ऐतिहासिक प्रसंग घडलेला. आणि तिथे कोणीही टीशर्ट काढून नये बंदी आहे. अशा प्रकारे सौरव गांगुलीने लॉर्डस गाजवलेले. 


एक अविस्मरणीय दिवस सार्थकी लावून मी सायंकाळी सुवर्णदुर्ग कॅस्टल हे आपल्या कोकणातील सुवर्णदुर्ग किल्ल्याशी संबंधित असलेल्या वस्तूकडे बाईक स्टार्ट करून निघालो. 

समाप्त: 

योगेश आलेकरी.



2 comments:

  1. व्वा..फारच सुंदर. त्या ऐतिहासिक मॅचचा highlights पाहतोय असच वाटलं. सर लिखाण कायम चालू राहील पाहिजे आणि हा तुमचा मोटासायकल प्रवास, ही तुमची जग भ्रमंती आम्हाला पुस्तकरुपी लवकरच वाचायला मिळो हीच इच्छा.🙏💐

    ReplyDelete
  2. खुप छान, नेहमी प्रमाणे प्रसंग डोळ्या समोर उभा करतोस तु तुझ्या लिखाणातून, लिहित जा

    ReplyDelete

Lords - The revenge

                Lords - the revenge             तब्बल 2 महिने बाईक चालवून मी लंडन ला पोहचलो. 2 दिवस स्थिरस्थावर झाल्यावर मी लगेचच लॉर्ड क्रि...