Tuesday, 6 September 2016

दुर्गमदुर्गवनदुर्ग किल्ले गुमतारा

दुर्गमदुर्गवनदुर्ग किल्ले गुमतारा  

   जुलै मधील  एक रविवार, बाहेर मुसळधार पाऊस चालूय, गाडी काढून कुठेतरी नवीन ठिकाणी जाण्याचे वेध लागलेत. साम्याने उत्तर कोकणातील एक मजबूत किल्ला सुचवला , उत्तर कोकणात जायचे तर प्रचंड रहदारीचा सामना व त्यामध्ये पाऊस तर आणखी मंद गतीचा प्रवास. इति- योगेश आलेकरी.
 पश्चिम-मध्य महाराष्ट्राकडे माझा कल. अखेर सरतेसमयी सम्याच्या म्हणण्याप्रमाणं उत्तर पश्चिम किनारपट्टीवर लक्ष ठेऊन असलेला एक भक्कम डोंगरी किल्ला निश्चित झाला व आम्ही निवांत पणे गाडी हाकत निघालो नवी मुंबई - ठाणे - घोडबंदर - संजय गांधी अभयारण्यातून पलीकडे पश्चिम द्रुतगती मार्गावर आलो.
      एका प्रतिष्ठित लेखकाचे पुस्तक सोबतीला होते त्यातील चुकीच्या नकाशानुसार चुकीच्या फाट्यावर गेलो. स्थानिकांकडून योग्य माहिती मिळाली किल्ल्याकडे जाण्यासाठी, पण तोपर्यंत ४० किमी विनाकारणच भरकटणे झालेले. पुस्तकात दिलेला रस्ते मार्ग चुकीचा निघाला पण ट्रेन ने जाण्यासाठी दिलेला योग्य ,जो कि आमच्या कामाचा नव्हता.शोधमोहिमेत या पाऊसामुळे वैतागलो होतोच . शिरसाट फाट्यावर उभे होतो बाजूलाच एक हॉटेलवाला मस्त कांदा भजी काढत होता नाही चेतावतच होता म्हणा ! एव्हाना त्या किल्ल्याचा नाद सोडलाच होता आम्ही, घड्याळात दिड वाजलेले (बाकी कुठे वाजणार म्हणा ;) )समोरील कांदा भजी संपायच्या आतच बाजूच्या बोर्ड वरील "वज्रेश्वरी १६ किमी " वाचत च प्लॅन B तयार झाला हि व ताबडतोब गाडी वज्रेश्वरी च्या दिशेने फेकली (अर्थात हॉटेलवाल्याचं बिल देऊन :D ) 
सुंदर रस्ता

    आता रस्ता फारच सुंदर लागला होता. उजवीकडे बुटके डोंगर पण खुरट्या झाडांनी पूर्णपणे आच्छादलेले डावीकडे तानसा नदी आधी मधी दूरवर दर्शन देई, तर चहुबाजूनी भाताची खाचरे गढुळच पाणी भरून संथ पहुडलेली. स्वच्छ सुंदर रास्ता अगदी रिकामाच जणू आमच्या साठीच पायघड्या टाकलेत ! कधी तर एखादी सुसाट गाडी अथवा बायकर्स जायचे बाजूने आम्ही निवांत मजा घेत वज्रेश्वरीत दाखल झालो 
      नदीकाठावरील एका टेकडीवर असलेले वज्रेश्वरी देवीचे मंदिर पूर्वाभिमुख असून त्याभोवती मोठा कोट आहे. पेशवाईचा उदयापर्यंत येथील मंदिर खूपच लहान होते. वसई स्वारीनंतर चिमाजी आप्पांनी स्वतःच्या देखरेखीखाली हे मंदिर बांधून घेतले असे सांगितले जाते. सभामंडपाचा भाग बडोद्याचे श्रीमंत खंडेराव महाराज गायकवाड यांनी, तर पायऱ्या व दीपमाळ नासिकचे प्रसिद्ध सावकार नानासाहेब चांदवडकर यांनी बांधली. सभामंडप व दोन गाभारे असे मंदिराचे तीन भाग पडतात . प्रमुख गाभाऱ्यात पाच मूर्ती . त्यांत मध्यभागी वज्रेश्वरी, तिच्या उजव्या बाजूला सावित्री-सरस्वती आणि डाव्या बाजूला लक्ष्मी-भार्गव यांच्या मूर्ती . दुसऱ्या गाभऱ्यात गणपती, वेताळ, कालभैरव इत्यादींच्या मूर्ती आहेत. चैत्र महिन्यात येथे मोठी यात्रा भरते. १८७० मधील इंग्रज-मराठा चकमक वज्रेश्वरीजवळच झाली होती असेही सांगितले जाते. (माहिती साभार -आंतरजाल )
मंदिर


ज्रेश्वरी गावाच्या परिसरात, नदीतीरावर ६.४ किमी. अंतरापर्यंत गरम पाण्याची अनेक कुंडे दिसून येतात . हे पाणी आरोग्यदायक असून त्वचारोगावर गुणकारी समजले जाते. या कुंडांना अग्निकुंड, सूर्यकुंड, चंद्रकुंड, वायुकुंड, रामकुंड, लक्ष्मणकुंड व सीताकुंड अशी नावे दिलेली आहेत; स्नानासाठी मोठ्या संख्येने येथे लोक येत असतात. व पावसाळ्यात हुल्लडबाजी करतात. 
अशा प्रकारे हुल्लडबाजी चालली असते पावसाळ्यात. वाईट

वज्रेश्वरीजवळील अकलोली आणि गणेशपुरी येथे अनुक्रमे गरम पाण्याची कुंडे, आरोग्यधाम, जलोपचार केंद्र आणि नित्यानंद स्वामींची समाधी असून भाविकांची समाधीच्या दर्शनासाठी गर्दी असते पण इकडे जरा शिस्त दिसून येते
 
नित्यानंद महाराज मठातील कुंडात जरा शिस्तीत लोक असल्याने असे गरम पाण्यात पाय सोडून बसता आले
आता इथून भिवंडी वरून कल्याणचा दुर्गाडी किल्ला मग वाशीचे वावखळेश्वर मंदिर असा प्लॅन B करून वज्रेश्वरीमधून बाहेर पड्तोयच तोच एका झाडावर एक पाटी दिसली - 'किल्ले गुमतारा' घोटवड. 
गाडी थांबली. मागे अली. एका गावकऱ्याशी विचारणा झाली, त्यांनाच माहिती नव्हती मग घोटवड गाव विचारलं. मिळालं. प्लॅन C तयार.. !!! किल्ले गुमतारा उर्फ दुगाडगड उर्फ घोटवड चा किल्ला. !
            वेळ सायंकाळचीची, पावसाने जोर धरला. रस्ता म्हाळुंगे फाट्यावरून उजवीकडे घोटवड कडे जातो तर सरळ पुढे भिवंडी. उजवे वळण घेऊन अजून एक उजवे घेतले कि आपण घोटवड गावातच. त्या वळणारच थांबावं लागल कारण वरूणराजे वरून भडकलेले. धो धो कोसळू लागले किल्ला पाहू देतोय कि नाही शंका वाटायला लागली, जरासं कमी झालं तस गावात पोहचलो  
तुफान पावसामुळे पायउतार व्हावं लागलं 
पावसामुळे गावात सामसूम होती, एका गृहस्थाला किल्ल्याबद्दल विचारणा केली आमच्या काळजीपोटी त्यांनी न जाण्याचा सल्ला दिला, कारण किल्ला चढायलाच अडीच तास लागतात व आत्ता ४:१५ मिनिट झालेत आणि भरीस भर म्हणजे किल्ल्याचा रास्ता सापडला तर पाहिजे या परिस्थतीत. मनात प्रश्न चिन्ह निर्माण झालं, पण आमचे इरादे पक्के होते. आणखी पुढे गेल्यावर गावातील एका उत्साही तरुणाशी गाठ पडली त्याने पुरवलेली माहिती अशी- 
  "आत्ता साडे चार होतायत इथून २ किमी ब्राम्हण पाडा, तिथून पुढे आदिवासी पाड्यावर गाडी जाणार नाही चिखलामुळे ते चालत जावे लागेल,तिथून भात खाचरांतून वाट काढत २ ओढे पार करणार तेव्हा दिशादर्शक खुणा दिसणार. न ते नाहीच सापडल तर ??? आणि आत्ता  विचारायला काळं कुत्रं देखील नसणार वाटेवर, एकंदरीत तुम्ही जाऊच नका."  निष्कर्ष !!!!
पण आमचे इरादे पक्के !! गुमतारा पाहून च गावातून पाय काढायचा यावर ठाम ! खरं तर खूप मोठीं रिस्क घेत होतो पुढे पुढे जाऊन. पण डोळसपणे. 
 
पाड्याकडे

 सांगितल्याप्रमाणे घोटवड मधून पुढे २ किमी वरील ब्राह्मण पाड्यावर(असं नाव का उत्तर मिळालं नाही ) आलो. दोन्ही बाजूनी भात शेती पाण्यात होती. ७/८ घरांची वस्ती ती. रास्ता विचारला. उजवीकडे चढणारी वाट दाखविण्यात आली, गाडी जाणार नाही याकडे समीररावांनी दुर्लक्ष्य करून गाडी घुसवली कुठे कुठे मला उतरवून गाडी पिळपाड्यावर दाखल झाली. ४/५विस्कळीत  घरांची आदिवासी वस्ती शाईन गावात बघून चकित झाले, अर्थात २ च स्री पात्रे दिसली तिथे, त्यांनीही ५ वाजलेत सांगून अशक्यता वर्तवली. तरीही आमच्या हट्टापुढे जाऊन त्यांनी उत्तरेकडे हात करून त्या टेकडीच्या पलीकडे वाट आहे सांगितले. 
        मग काय धावतच निघालो पाण्यातून शेतीतून वाट काढत ती टेकडी चढून आलो. पलीकडे एक घर दिसले काकांना बाहेर बोलावले त्यांनी मात्र चांगले काम केले. वेळ व आमच्या उत्साह पाहून त्यांनी अचूक मार्गदर्शन केले, त्याबरहुकूम चालू पडलो, भाजीपाल्याची सुंदर शेती पार करून २ मोठे ओढे दुथडी गढुळाचं पाणी भरून वाहत होते,  पार करून मुख्य चढणीला लागलो. 
भाजीपाल्याची शेती व ते घर


टेकडीवर जाणारी वाट


ओढा पार करताना समीर शिर्के


दुसरा ओढा पार करताना सदरहू ब्लॉगचे स्वयंघोषित लेखक ;)
सह्याद्री प्रतिष्ठान या संस्थेने खुणा करून रास्ता दाखवला आहे प्रत्येक २० फुटावर (अंदाजे {नाहीतर काही वाद घालू मंडळी टेप घेऊन उभी राहतील मला खोटं ठरवतील }) बाणाच्या खुणा दिसू लागल्याने वेग वाढवला. अत्यंत वेगात चढाई सुरु झाली पाऊस थांबलेला जणू आमच्याचसाठी. 
बाणाच्या खुणा (याशिवाय किल्ला सापडणे अशक्य )आता एक डोंगरसोंड चढून काटकोनात डावीकडे वळलो. घनदाट पण पानझडी जंगल सर्वत्र. काहीच वेळात एक पठार आले हि पहिली माची म्हणता येईल. उजवीकडे उकसान धरण तर डावीकडे सर्वत्र तळी  साचलेली बाकी धुक्याचंच साम्राज्य. ५:३०झालेले. पलीकडील गावातील दोन जण चिंबोरीसाठी आलेले. अजून एक तास लागेल बोलले. 


पहिली माची
दुसरी माची 
    तसा वेग आणखी वाढवला अगदी सुसाट, धापा टाकत एका सरळ उभ्या खडकापाशी थांबलो. एक वाट उजवीकडे जराशी खालच्या दिशेने तर एक सरळ वरती. १० मिनिटात तेथील काही अवघड निसरडे टप्पे पार करून एकदाचे गडमाथ्यावर पोहचलो न हुश्श केले !! वेळ ६:११ मिनिट २:३० तसाची चढाई आम्ही केवळ ७० मिनिटात केलेली पाऊस सुरु झाला तरी घाम जात नव्हता. जाम थकलेलो बिस्कीट न पाणी आत ढकलला. नेमका पाऊस सुरु झाला ५/७ मिनिट सैरावैरा केली इकडे तिकडे शोधाशोध पण निष्फळ.  
शिखर गाठल्याचा आनंद


अवघड टप्पा


हेल्मेटधारी समीर
गुमतारा किल्ला हा वनदुर्ग आहे घनदाट जंगलात वसलेला १९४९ फुट उंच. या किल्ल्यावर नीरनिराळ्या प्रकारच्या अनेक औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात .किल्ल्यावर दगडात कोरलेले ७ टाक्या आहेत त्याचीतील एका टाकीची साधारण खोली हि ५ ते ६ फुट आहेत.इतर टाक्या बुजल्या आहेत. तसाच पुढे खालच्या बुरजाजवळ  दोन मोठ्या दगडांच्या मधोमध बारा महिने गोड पाण्याच्या नैसर्गिक झरा आहे. 
आता वेळ दवडून चालणार नव्हता उजेडाबरोबर उतरयाच  होत.
  • जरासं किल्ल्याच्या इतिहासाबद्दल-
किल्ला फारच दुर्लक्षित,त्यामुळे खचितच एखादा भटका एखादा फिरकतो .हा किल्ला टकमक किल्ल्याच्या पंधरा मैल दक्षिणेस दुगाड गावा जवळ आहे.किल्याला तसा इतिहासही आहे.ऐतिहासिक संदर्भातील नोंदणी प्रमाणे २४ मार्च १७३७ गुरुवारी मराठ्यांची टोळी माहुली किल्ल्याच्या रानातून बाहेर निघाली व पहाटे घोटवडाच्या अर्थातच गुमतारा दुगाडच्या रानात आली तो सबंध दिवस त्यांनी रानातच घालवला.दिवस उन्हाचे होते व प्रदेश अतिशय गर्मीचा होता त्यामुळे त्या रानात पाण्याचा टिपूसही मिळण्याची मारामार होती.त्यामुळे पाण्यावाचून हैराण होऊन दोन चार लोक ही मेली.
शिवकालीन संदर्भां पासून ते पेशवेकाळातील संदर्भात गुमतारा किल्ला  बरेच वेळा बेवसाऊ झाल्याची नोंद आहे.सध्या गडावर राबता न राहिल्याने वाटा सापडणे कठीणच किल्ल्यावर दुर्ग यात्रींचा फारसा सहवास नसल्याने हा किल्ला दुर्लक्षित आहे किल्यावरील दुर्ग अवशेष नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.१८१८ मध्ये किल्ल्यावर काही बांधकाम झाल्याचे संदर्भ ठाणे ग्याझेट मध्ये उपलब्ध आहेत.

 (माहिती साभार - णेश रघुवीर यांच्या संकलनातून )
दुसऱ्या माची वरील वाट उतरताना
                  उतरून त्या फाट्यापाशी  आलो खाली जाणाऱ्या रस्तावर दौड सुरु केली बरेच आत गेलो बालेकिल्ल्याला वळसा घालून वाट मागून वरती जाते किल्ल्याचे बरेच अवशेष या वाटेनेहि पाहता येतात. जास्त वेळ गेलेला आता मागे फिरलो, अगदी धावतच. समीर न मी असे दोघेच त्या निबिड अरण्यात, काळोख सुरु व्हायला लागला. यात मनात एक विचार आला याक्षणी चकवा लागला तर गेलोच आपण.
 सम्याची प्रतिक्रिया - नावही काढू नको त्याच. 
पटापट उतरण चालू होती आडवे यणारे वेली, फांद्याआपोआप दूर फेकल्या जायच्या, रान डुकरांचे कळप रान कापत जावे तसेच चालले होते.तशातच "बालपणीच्या कारामतींनी गावात मांडलेला उच्छाद" याविषयावरील परिसंवाद रंगवत दोन्ही माच्या उतरलेल्याही कळलं नाही. गप्पा चांगल्याच रंगात आल्या असताना एके ठिकाणी अचानक थबकलो. तीन वाटा फुटलेल्या आता बाणाच्या खुणेची आठवण झाली.खुणा कुठेच दिसत नव्हत्या. वेळ ६:५० ची. 


समीर या वाटेवर गेला तर मी दुसऱ्या
उजवीकडील वाटेवर समीर गेला मी सरळ पुढे जाणाऱ्या वाटेवर गेलो  थोडा चाचपणीचा केविलवाणा प्रयत्न. एकमेकांना आवाज देत संपर्कात राहत शोधाशोध चाललेली. आमचं अंतर वाढलं प्रतिसाद मिळेना एकमेकांचा, अशा वेळी एकेकटे संपर्काबाहेर भटकणे म्हणजे भरकटनेच होते. मागे फिरलो समीर च्या दिशेने. त्यालाही काही सकारात्मक सापडले नाही न मलाही. पुरते वाट चुकलोय हे एव्हाना अधिकृतरित्या घोषित केलं होतच. 
          एकत्र आलो व खाली जाणाऱ्या वाटेवर जाईल तिकडे जायचं ठरल. वेळ कमी असल्याने इथं या घनदाट अरण्यात शेम्बडात माशी गुरफ़टावी तसे गुरफटत होतो. लवकर वाट मिळवणे गरजेचे होते. खाली उतरणाऱ्या वाटेवर वेगात दौडलो. जात जात फ्लॅश बॅक चालू केला. सर्व च  नवीन दिसत होतं, धबधब्यचा एक आवाज पुसटसा साथ देत होता हे आठवला, वाट,वळणे, झाडे, चढण, डोंगर सारेच नवीन वाटायला लागलं. अचानक थांबलो एका सागाच्या पानं झडलेल्या झाडावर सरसर चढलो. सर्वत्र दूरवर धुकच धुकं. काळोख होत होता त्यामुळे परिसर ओळखू येत नव्हता. उजवीकडे दूरवर नजर गेली न एक मोठ्ठ कोडं उलगडलं !!!
                      जिथं गाडी लावली होती ती वस्ती पुसटशी दिसत होती पण खात्री होती तीच ती. पण त्यामध्ये न माझ्यामध्ये आत्ता एक डोंगरसोंड आडवी होती जी कि गावात रास्ता दाखवला गेला तेव्हा मध्ये असं पार करून काहीच जायचं नव्हत. म्हणजे आम्ही त्या सोंडेवर जायचं सोडून पुढे खाली आलो होतो हि सर्व निरीक्षणे अत्यंत वेगात चालली होती त्याच वेगात तसेच त्या डोंगराच्या दिशेने धावलो झाडा झुडुपातून उतारावरून चाललो तर खरं पण जवळ जाताच एक कडा आडवा लागला आता समोर वाट तर दिसतेय पण जाता येईना ! पर्याय नव्हता. आता पुन्हा वरती चढायला सुरु केला उजवीकडे खुणा दिसत नाहीत तोपर्यंत चढाई चालू ठेवायचे ठरले तेही धावतच. आणि खूण  दिसली वेळ सायंकाळची ७:२२ ची. तब्बल ३० मिनिटं आमचं जहाज भरकटला होतं. या गडावर सहसा कोणी जात च नसल्याने वाटा पार पालापाचोळ्यात बुजलेल्या अंधार झाला न खुणा दिसल्या नसत्या तर रात्रभर फरफट झाली असती तस जीव घेणं नसतं  काही पण मच्छरांनी झोपू दिलं नसतं कि नीट बसू दिल नसतं. उपरमार झाली असती ती वेगळीच !! असो अनुभव व शारीरिक क्षमतेच्या जोरावर वाट मिळवण्यात यश आलं. 
              अजून बरंच बाकी होत उतरायचं. कधी दगडांत देव दिसला नाही पण आज खूण असलेल्या दगडांत मात्र देव दिसत होता. धावत पळत उतरलो आता ते दुथडी भरून वाहणारे ओढे, पाणी कमी झालेलं अंधारातच वाट काढत पार केले आता भाताच्या खाचरांत आलो बांधावर पाणी वाहत होते, चिखलतून वाट काढत ७:५५ ला गाडी पाशी पोहचलो एक टास्क पूर्ण झाला . 
त्या पाड्यावरून घोडवड गावात आलो काही गावकऱ्यांनी अगदी लक्षात ठेऊन आमचा वृत्तांत घेतला व वेगाची दाद दिली :D 
         आता म्हाळुंगे फाट्यावरून उजवीकडे ३ किमी आंबाडी फाट्यावर समोर एवढा मोठा फ्लाय ओव्हर  दिसल्यावर तोंडात बोटे गेली. 'ये कहा  आ गाये हम' असं आपसूकच बाहेर पडले!!! समोर ४ लेन रास्ता -भिवंडी वाडा-जव्हार आता सुसाट पणे समीर ने गाडी वाशीच्या दिशेने फेकली, वारेत-असनोली- पालखाने-धोंडावडवली- महापोली अशी बरीच गवे मागे टाकून भिवंडीचे गच्च ट्राफिक चे रान पार करून कल्याण मग शिळफाट्यानंतर तुरळक जंगल जे कि नामशेषीच्या मार्गावर आहे त्यातून पुढे नवी मुंबईत दाखल व एक सफल दौरा संपन्न. 

इथपर्यंत वाचणाऱ्याला धन्यवाद __/\__

No comments:

Post a Comment