Monday, 6 February 2017

माझे पहिले पर्यटन (शैक्षणिक सहल )

माझे पहिले पर्यटन (शैक्षणिक सहल )

         आजमितीस जी काही फिरण्याची माझी आवड जोपासलीय त्याची पाळे मुळे अगदी थेट शालेय जीवनात जातात, प्रवासाचं भाग्य तस खूप लहानपणापासूनच लाभलेलं मला. कारण हि तसच, आपले लाड जिथे सर्वाधीक पुरवले जातात असे नातेवाईक  मामा व आत्यांची गावे ७० किमी च्या परिघाच्या बाहेर. त्यामुळे लांबचा (त्यावेळी हा लांबचाच ) प्रवास पप्पांसोबत घडायचाच. पाहत गेलो. शिकत गेलो.
खेडे गावातील पार्श्वभूमी असली तरी आमच्या गावाला डोंगराचं भाग्य लाभला  नव्हतं ती कसूर भरून काढली ती जवळील च ३ किमी वरील तुकाई देवी डोंगराने. प्राथमिक शाळेत असताना तुकाई देवीच मंदिर व डोंगर आणि त्या डोंगरात असणारी गुहा हे उत्सुकतेचे विषय असत.
        हे झालं कौटुंबिक. पण माझा पहिला विनाकौटुंबिक प्रवास घडला तो इ. ५ वी मध्ये. शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने. तर आपण आपण आत्ता त्या दिवसाचा धावता आढावा तब्बल १७ वर्षांनंतर घेणार आहोत.
आमची शाळा श्री मुकुंदराज विद्यालय शाळगांव 

       तर झाले असे कि, इ.४ थी पास झाल्यानंतर समोर दुसरा कोणताही पर्याय नसल्यान परंपरेला अनुसरून मला इ. ५ वी मध्ये घालण्यात आले. गावात जि.प. शाळा ४ थी पर्यंत असल्याने पंचक्रोशीतील तब्बल ३ किमी अंतरावरील एकमेव विद्यालय असे श्री. मुकुंदराज विद्यालय शाळगाव येथे आम्ही उत्साहाने जाऊ लागलो.
संक्रमणाचा काळ होता तो. साल इ. स. २०००. विसाव्या शतकातून एकविसाव्या शतकात जग प्रवेशत होत. एका बाजूला तिकडे दूरदेशी अमेरिकेत ४२ वे अध्यक्ष डेमोक्रेटिक पक्षाचे बिल क्लिंटन यांचेकडून ४३ वे अध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाचे जॉर्ज डब्लू बुश यांच्याकडे सूत्रे आलेली तर इकडे केंद्रात मोठा सत्ताबदल झालेला. नुकतेच १३ वे पंतप्रधान म्हणून अटलजीनी NDA तर्फे  ११वे पंतप्रधान इंद्रकुमार गुजराल UPA यांच्याकडून सत्ता हातात घेतलेली, तर महाराष्ट्रात उलट झालेलं, नुकतीच जन्माला आलेल्या NCP ने स्थिर स्थावर होत INC सोबत आघाडी करत महाराष्ट्रात युती कडून सत्ता हिसकावून घेतलेली.
                  तिकडे सचिन  तेंडुलकर कडून क्रिकेट टीम चे नेतृत्व सौरव गांगुलीकडे सरकलेले तर ऑस्ट्रेलीयामध्ये मार्क टेलर कडून स्टीव्ह वॉ कडे नेतृत्व बदल होत होता, संगणक सर्वसमावेशक होण्याकडे एक एक पाऊल पुढे सरकत होता आणि दुसऱ्या बाजूला या बदलाचा भाग होत आमच्या शाळेतील मा. घाडगे सरांनी तब्बल १० वर्षांनंतर शाळेतून सहल काढण्याचा घाट घातलेला. व तो यशस्वी करूनही दाखवला. वर्गात नोटीस येताच घरच्या गृहीत  धरून नावनोंदणी केली हि, व अपेक्षेप्रमाणे घरून मंजुरीही मिळाली लहान गटास ७५ रुपये प्रत्येकी व १५० रुपये मोठा गट असे विवरण होते. तत्कालीन परिस्थितीत सहलीसाठी खर्च हा अनावश्यक गटात मोडत असल्याने, व पालकांची मानसिकताही सहलीयोग्य नसल्याने, सहलीचे प्रयोजन बारगरळे  जायचे पण आम्ही नशीबवान ठरलो न यंदा इरादा पक्का झाला. !! ठिकाणे ठरली चाफळ - वाई - पाचगणी - महाबळेश्वर - प्रतापगड. सगळंच नवीन होत चाफळ वगळता, कारण आईसोबत संक्रातीला चाफळ च्या राममंदिरला बरेचदा जाणे झालेले.
                          उत्साह शिगेला पोहचलेला बालमित्रांसोबत पहिल्यांदाच प्रवासास निघत होतो. घरातील मंडळी झाडून तयारीला लागलेली, आईने खाऊ बनविला, ताईने कपडे इस्त्री करून ठेवली, पप्पानी ५० रुपये खर्चाला दिले जी कि खूप मोठी रक्कम होती. पोरगं सहलीला चाललंय कोडकौतुक झालं!
प्रातिनिधिक चित्र 

                     दिवस ठरला १६ डिसेम्बर २०००. वार शनिवार भल्या पहाटे बोचऱ्या थंडीत, शाळेतील मैदानात पप्पानी सायकल वरून आणून सोडल. १० शिक्षक, १०० विद्यार्थी, २ बस असा आमचा लवाजमा कदम सर व घाडगे सरांच्या नेतृत्वाखाली पहाटे ५:३०वा. चाफळ च्या दिशेने सरकला.तांबडं फुटायला आम्ही चाफळ ला पोहचलो . मांड व तारळी नदीच्या खोऱ्यात वसलेल्या चाफळ गावात थंडीचा जोर आणखीच जाणवत होता. मुख्य द्वाराने प्रवेशते झालो, मुख्य मंदिरात श्रीराम, लक्ष्मण व सीता व समोर नम्र भावे दास मारुती आहे  जे समर्थ रामदासांनी शके १५६९ (सन १६४८ )स्थापन केलेले आहे. त्यानंतर इतिहासात चाफळ हे समर्थ संप्रदायचे मुख्य मठ म्हणून नावारूपास आले.  असं म्हणतात १९६७ च्या भूकंपातही या  मंदिरांना  धक्का लागला नाही कि तडा गेला नाही.
                      दर्शन घेऊन प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झालो अन मला माझी कानटोपी हरवल्याचा साक्षात्कार झाला मग ती शोधण्याच्या नादात ४/५ प्रदिक्षिणेसह संपूर्ण कॅम्पस फिरून  झाला आणि शेवटी किश्यात खोचलेली आढळली अशी झाली गम्मत....आनंद च एवढा होता कि भान हरपून मजा घेत होतो ना !
                    झालं !! न्याहारी होतेय तोच कदम सरांची शिट्टी कानी पडली आणि गाडी सुटली ती थेट पाचगणी
च्या टेबल लँड पठारावरच  थांबली
     पाचगणी.
.कोवळी ऊन्ह अंगावर  घेत सर्वजण गाडीतून उतरली.  त्या विस्तीर्ण पठारावर काय पाहायला न का आलोय हे  त्यावेळी तरी  उमगलं नव्हत. १०० जणांमध्ये एका कडे कोणाकडे तरी कॅमेरा होता असा पुसटसं आठवतंय. त्यामुळे फोटोसाठी जो आत्ता वेळ वाया जातो तो आम्ही मस्त मित्रांनी गृप करून टंगळमंगळ करण्यात जायचा, खोड्या काढणे, टपली मारणे याची जागा पुढे जाऊन सेल्फी घेणार होती, म्हणून ती मज्जा आम्ही त्यावेळीच करून घेतली .. टेबल लॅन्ड वर थंड हवेत एक फेरफटका मारला  तोच शिट्टी वाजली. एव्हाना १० वाजत आले होते. आता वाईचा भला मोठा गणपती खुणावत होता. पाचगणीवरून फार दूर नव्हता वाई लगेचच वाई मध्ये दाखल झालो, घाईतच गणेश दर्शन झालं,बाजूच्या काशी विश्वेश्वराचेह.  दर्शन घेऊन  संथ वाहणाऱ्या कृष्णामाईचे लांबूनच आशीर्वाद घेतले.  घाटावरील तो मंदिरसमूह पाहून वेगातच प्रतापगडच्या दिशेने गाडी निघाली. १२ वाजत होते. महाबळेश्वर च्या घाटात मध्येच एक झरा पाहून गाडी थांबली गेली, सर्वजण उतरले इथे जेवणाचा कार्यक्रम पार पडायचा होता. खळखळत्या पाण्याच्या मंजुळ आवाजासोबत निसर्गात तो जो जेवणाचा आनंद होता तो निव्वाळ अविस्मरणीय!!
                 शिट्टी वाजली. गाडी सुटली ! १० वी मधील काही पोरांनी एक टेपरेकॉर्डर आणला होता मागच्या सीट वरील गोंधळात मीपण सामील झालो, धडकन, ढाई अक्षर प्यार के, बिच्चू या सिनेमांतील त्यावेळी बस मध्ये ऐकलेली गाणी आजही कानात गुंजतात.त्यापैकी 'dulhe का सेहरा... ' अक्सर इस दुनियामे अनजाने मिलते हे' हि गाणी खूपच भाव खाऊन गेलेली. मीही कधी गोंधळात सामील झालो कळलंच नाही ....
आला प्रतापगड आला !
                   आयुष्यात पहिल्यांदा कोणत्या तरी गडावर भटकणार होतो, योगच नव्हता त्याआधी, तसं पप्पानी एकदा बस मधून सदाशिवगड दाखवलेला इतकीच काय ती गडाशी ओळख. गाडी थांबली, उतरताच समोर अजस्र तटबंदीने वेढलेल्या किल्ल्याचे दर्शन झाले. अफजल खान इथेच फाडला होता कसा फाडला असेल ? कुठे ते युद्ध झाले असेल ? अशी प्रश्ने मनात घर करून होती उत्तरे आज मिळणार होती.
कदम सरानी काही शिस्तीच्या सूचना केल्या आणि आम्ही त्यांच्या मागे चालते झालो. वीसेक मिनिटात मुख्य द्वारापाशी आलो द्वाराची गोमुखी पद्धतीची रचना इतिहासाच्या सरानी समजावून सांगितली आणि पुढे आम्ही ध्वज स्तंभाच्या बुरुजावर गेलो. तिथून समोर कोयनेचे खोरे आणि अभयारण्याच्या घनदाट जंगलाचा परिसर पाहून उरात धडकी भरली आणि असली जंगले भविष्यात तुडवून काढायची उर्मी पेटू लागली ती आजतागातायत जिवंत आहे.
                          आता बालेकिल्ल्याकडे जाऊन शिवछत्रपतींची अश्वारूढ मूर्ती पाहून सारेच अवाक झाले पुस्तकात शिकलेला इतिहास डोळ्यासमोर तरळू लागल, ती मूर्ती पाहून चौथीत शिकलेल्या शिवरायांपेक्षा शिवराय कितीतरी पटीने भव्यदिव्य आहेत असे वाटू लागले , पलीकडेच कोकणकड्यावरून खाली खाली खोलवर दिसणारे कोकण पाहून प्रतापगडाची उंची मनात घर करून गेली. नंतर भवानीदेवी मंदिर पहिले, शिवरानी स्वतः याची स्थापना केलेली हे जेव्हा घाडगे सरांकडून  तिथे ऐकलं तेव्हा हे मंदिर नव्हे तर साक्षात इतिहासच पुढे उभा आहे असा भास त्या सरांच्या बोलण्यातून हाऊ लागला होता. पुढे नगार खाण्यात गेलो एका गाईड काढून आम्ही प्रतापगडच्या संग्राम ऐकला आणि इतिहासाबद्दलची  गोडी वाढत गेली.
वेळ झाला होता अजून अफलखानाची कबर पाहायची होती, शिट्टी वाजली सर्वजण एकत्र झालो सरांच्या मागे मागे खाली उतरलो, कंबर पहिली तो शामियाना इथेच कुठेतरी उभारला असेल.
                    गडदर्शन झालं. जेमतेम २ तासाच्या त्या गड भेटीत खूप काही मिळवलं होत. एक प्रेरणा मिळाली होती, एक आवड मिळाली होती मला.
                         आता गाडी पुन्हा महाबळेश्वर च्या दिशेने निघाली होती, ४:३० च्या दरम्यान महाबळेश्वर ला पोहचलो. गांधीजींची तीन माकडे म्हणून त्या गाईड ने दाखवलेली आठवतंय, आरडा ओरडा करूंन आवाज परत ऐकायचा एक पॉईंट पहिला, Echo point म्हणतात त्याला ते आटा समजल. घास दुखेस्तोवर ओरडलो परत आवाज आला कि मज्जा यायची, काही १० वी च्या पोरांनी मुलींना दिलेली टोपण नावे घेऊन वातावरण तापवून सोडलं होता :D सकाळ पासून त्यांच्यात असल्याने असली राजकारणे कळायला लागली होती ;) त्यांची मजा वेगळी आम्ही फक्त हसण्याचा भूमिका पार पडायचो :D
                            पुढे कुठून तरी त्या गाईड भाऊ ने  राजा हिंदुस्थानी अमीर खान चा बंगला दाखवला असं काहीतरी आठवतंय .
नन्तर सनसेट पॉईंट ला गेलो २० मिनिटे बसलो सूर्य वरच्या वरच नाहीसा झाला असा सूर्यस्त पहिल्यांदाच पहिला होता नाहीतरी तोपर्यंत सूर्य डोंगराआड च जायचा. जास्त कौतुक नाही वाटलं काही, लायनीत मागे येऊन बस मध्ये बसलो अंधार झाला आता देव देव बाकी. श्री क्षेत्र महाबळेश्वर गाठलं, या कहाण्या ऐकल्या सप्त नद्यांचा संगम पहिला ते मात्र अजूनही लक्ख आठवतंय. कारण तो कोणती नदी ५ वार्ष्णीं येते तर कोणती १२ वर्षांनी येते असा काहीतरी फास्ट फास्ट सांगत हता आणि मी पुन्हा पुन्हा तेच विचारून त्याला भंडावून सोडत होतो तरीही अजूनही मला ते गणित कळलं नाही :D
झालं. हेही पाहून झालं
                      .आता बस महाबळेश्वर स्टॅन्ड मध्ये आली आणि सर्व जण जेवायला हॉटेल मध्ये गेले, मला भूक नव्हती मी बस  ठरवलं. झोप काही लागेना म्हणूनखाली उतरलो. बाजूला स्टॅन्ड मध्ये tv वर हाथी मेरे साठी सिनेमा चालू होता, बसलो बघत. अर्ध्या तासाने झोप यायला लागल्यावर उठलो व बस मध्ये जाऊन झोपलो जागेवर, काहीवेळात लक्षात आले बस मध्ये जी थोडीफार लोक आहेत ते अनोळखी आहेत आणि आपल्या बॅगा पण नाहीत इथे, कळालं चुकीच्या बस मध्ये बसलोय, ती महाड ला जाणारी बस होती. उतरलो.  बस शोधायला लागलो, सारख्याच बस दिसत होत्या सर्व , घाबरल्या मुळे आणखीच गोंधळलो होतो, रडूच यायचं बाकी होत इतक्यात दुरून शिट्टीचा आवाज आला धावत तिकडे गेलो एक कोणीतरी कमी आहे म्हणून मोजामोजी चालू होती मी धावत आलेलो दिसतात कदम सरानी एकाएकी माझ्यावर हल्ला चढवला पण आपले लव्हली घाडगे सर मदतीस धावून आले व वेळीच हस्तक्षेप करून माझा पार्श्वभाग लाल होण्यापासून वाचवला :D
                                    १० वाजण्याच्या दरम्यान बस निघाली सर्वजण गपगार झोपले होतो. त्या घटनेमुळे झोप गेलीच होती. पुन्हा एकदा सर्व दिवस आठवला (त्या रिवाइंड मुळेच आज १७ वर्षांनी पण सहज सर्व आठवतंय ) का दिवसात खूप काही पाहून शिकून निघालो होतो. नन्तर च्या सर्व सहलीला पहिले नाव द्यायचेच या इराद्यानेच. पहाटे ३ च्या दरम्यान शाळगाव च्या वेशीवर बस आली, १२ ला येणार म्हणून सर्व पालक मंडळी ३ तास वाट पाहत बसली होती, आपापली पोरं उचलली व चालू पडले.
        खूप आनांदात न उत्साहात झाला होता कार्यक्र्म त्यांनतर च्या वर्षी पुणे दर्शन ची सहलीत केलेल्या प्रतापाने मला वर्गाचा सहल मंत्री पद आपोआप मिळत जायलं लागलं ;)
प्रतापगड । प्रातिनिधिक चित्र 

हा आता जरा कामाचं ..


  • भटकंती सुरु करण्याच्या आधी वरील  चिन्हे व संदेश आपल्या चित्तात, मनात, अंतःकरणात रुजावा.
  • निसर्ग नियमांचे भान असुद्या, प्राणिमात्रांच्या आदर राखा. 
  • सुशिक्षित वागा (नसले तरीही  दिखावा करा )

समाप्त :


3 comments:

  1. सुरेख लिखान.. जून्या आठवनिनी मनात परत एक घरट बाँधल बघ..
    लयच भारी☺️👌🏻🙏🏻🙏🏻

    ReplyDelete