भारत आणि चीन या दोन बलाढ्य राष्ट्रांमध्ये आपले इवलेसे सांस्कृतिक व भोगोलिक अस्तित्व टिकवून असलेला एक सार्वभौम देश
भूटान. स्थानिक लोक भूतान ला '
द्रुक युल' संबोधतात म्हणजे ड्रॅगनचे घर. देशाचा जवळपास सर्वच भूभाग हा डोंगराळ प्रदेश त्यामुळे नीसर्गिक साधनसंपत्तीची नुसती रेलचेल. हिमालयाच्या दक्षिण उतारावरीती मध्यम उंचीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या या नितांत सुंदर देशाला भेट देण्याचा योग नुकताच जुळून आला तो मेघालय ते मुंबई या आमच्या दुचाकी प्रवासाच्या निमित्ताने भुटानचीही भटकंती होऊन गेली . मेघालयातील वृक्षराजीतून लपंडाव खेळत खासी टेकड्या उतरत जाणाऱ्या रस्त्याने आम्हाला आसामच्या सपाट मैदानी प्रदेशात आणून सोडले. मी व महेश आणि आमची बुलेट आता भुटानच्या दिशेने धावू लागली. ब्रम्हपुत्रा नदीचे विशाल पात्र डाव्या बाजूला तर उतुंग हिमालय उजव्या बाजूने क्षितिजावर करवती प्रमाणे आपली गिरिशिखरे आकाशात खुपसून बसला होता. या निसर्गरम्य वातावरणात कधी फूंटशोलींग आले कळलेच नाही.
|
ब्रह्मपुत्रेवरील विशाल पूल |
फुंटशोलींग-भूतान चे प्रवेशद्वार. भारतातील पश्चिम बंगाल मधील जयगाव ला अगदी खेटून वसलेले हे भूतानचे एक महत्वाचे शहर. भूतान प्रवेशाचे सर्व सोपस्कर म्हणजेच व्यक्तिगत व वाहन परवाना पत्र इ. बाबी पूर्ण करण्याचे एकमेव ठिकाण फुंटशॉलिंग. भूतान च्या हद्दीत प्रवेश करताच आपण हिमालयाच्या डोंगररांगा चढू लागतो.
पारो ,थिंपू व पुनाखा हि भुतान मधिंल महत्वाची ठिकाणे, तर
थिंपू हे राजधानीचे शहर. आमचा पहिला मुक्काम पारो येथे.
पारो चु व वांग चु (चु म्हणजे नदी ) या दोन नद्यांच्या संगमावर व चहुबाजूनी पर्वतांनी वेढल्यानें झालेल्या दरीत वसलेले हे एक सुंदर शहर. भूतान मधील एकमेव विमानतळ याच शहरात. भूतानची ओळख असलेली
ताकसांग मोनेस्टरी अर्थात सुप्रसिद्ध 'टायगर नेस्ट मोनेस्टरी' पारो पासून १२ किमी अंतरावर आहे. इथे जाण्यासाठी पायथ्याच्या ताकसांग गावात जायचे मग तेथून ३ ते ४ तासाचा ट्रेक करून मोनेस्टरी पर्यंत पोहचायचं.
|
टाकसान्ग मोनेस्टरी किंवा टायगर नेस्ट |
पण हे सोप्प नाही कारण ही मोनेस्टरी स.स. ३१२० मीटर वर उंच पर्वतावर एका कड्यात अत्यंत कल्पकतेने बांधलेली आहे. इथे गावातून खेचरे आपल्याला बक्कळ मोबदला घेऊन न्यायला तयार असतात पण ती फक्त पहिल्या टप्प्यापर्यतच साथ देतात जिथे एक कॅफेटेरिया आहे. इथून पुढील २ टप्पे मात्र आपले ट्रेकिंग चे कसाब पणाला लावायला लावतात. सायप्रस वृक्षांच्या दाटीवाटीतून वर वर चढणारी वाट चांगलीच दमवते कारण अतिउंची मुळे विरळ हवा, थंडी व खडी चढण. शेवटच्या टप्प्यात आपल्याला समोर मोनेस्टरी दिसत राहते मात्र ती पलीकडील डोंगरावरील कड्यात असल्याने इथून बऱ्याच पायऱ्या उतरून एक धबधबा पार करून तितक्याच पायऱ्या पुन्हा चढाव्या लागतात. हि चढाई उतराई न झेपल्याने बरेच पर्यटक इथूनच मागे जातात. इथून समोर पारो घळी चा सुंदर नजारा तर डावीकडे कड्याला बिलगलेली ताकसांग मोनेस्टरी असा विहंगम देखावा पाहूनच मन हरकून जातं. हा कष्टप्रद चढ उतार पार करून जेव्हा आपण मोनेस्टरी मध्ये आत जातो तेव्हा मात्र इथे आल्याचं चीज झाल्याचं समाधान मिळत. शांतता इतकी कि डोळे मिटताक्षणी ध्यान लागावे. '
मंत्रमुग्ध' या शब्दाचा अर्थ इथल्या शांततेत सापडतोम्हटल्यास वावगे ठरणार नाही.
|
टकसंग च्या जंगलातील निवांत पणा |
या मंदिराबद्दल काही आख्यायिका आहेत,
पद्मसंभवा वाघावर स्वार होऊन इथे आले व ३ वर्षे, ३महिने, ३ दिवस, ३ तास खडतर तपश्चर्या केली. मूळ मॉनेस्टरी इ. स. १६०० मधे बांधली गेली. तरीही वेगवेगळ्या काळात बांधकामे झाल्याचे दिसून येथे. भूतानी जनतेसाठी हे एक श्रद्धेचे स्थान आहे व ते एकदातरी इथे येऊन जातातच. आता आल्या पावली मागे जाऊन ६ किमी वरील '
द्रुकगेल मोनेस्टरी' आवर्जून पाहावी, एक भव्य किल्ला वाटावा अशी हि मोनेस्टरी चहुबाजूनी बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेली असल्याने फारच विलोभनीय वाटते.
|
द्रुकगेल किल्ला |
यांनतर शहरातील
पारो झोन्ग, संग्रहालय,
झुरी झोन्ग,
आर्चरी ग्राउंड इत्यादी वास्तू पाहून ६० किमी वरील थिंपू ला जातो. पारो सारखंच हे हि शिस्तबद्ध शहर. थिंपू नदीच्या खोऱ्यात वसलेल्या भूतान च्या या राजधानीत अलीकडच्या काळात पब व थिएटर्स शहरात उभे राहिलेत. ट्राफिक सिग्नल नसलेले जगातील एकमेव शहर अशी बिरुदावली थिंपू अभिमानाने मिरवते.
भूतानी नागरिक कमालीचे शिस्तप्रिय. अनावश्यक हॉर्न कोणीही वाजवणार नाही, पादचारी फुटपाथचाच वापर करणार, क्रॉसिंग झेब्रा क्रॉसिंग वरच होणार व वाहन चालकही त्यांना प्राधान्य देताना दिसतात अगदी पाहणाऱ्याने पाहतच राहावे एवढी नागरिकांची शिस्त मला भूतान मध्ये दिसून आली स्वच्छता तर एवढी कि संपूर्ण शहरच एखादा पार्क वाटावा तर अशा या शहरात विराजमान आहे ५१.१ मीटर उंचीचा ब्राँझचा बुद्ध पुतळा. स्थानिक भाषेत या जागेला
'कुएनसेल फोडरंग' म्हणतात. इथून रात्रीचा थिंपू शहराचा नजारा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. त्याच बरोबर आणखी एक विशेष म्हणजे '
ताकिन' नावाचा एक दुर्मिळ प्राणी इथे पाहायला मिळतो. जो कि भूतान च राष्ट्रीय प्राणी आहे.मेंढी सारखा दिसणारा हा प्राणी फक्त भूतान, नेपाळ, चीन आणि बर्मा येथेच सापडतो.
देचेन फोडरांग, नॅशनल लायब्ररी,
तशीचो झोन्ग,
फॉल्क हेरिटेज म्युसिअम इत्यादी ठिकाणी आपण थिंपू मध्ये पाहू शकतो
|
हाच तो ताकीन |
यांनतर भूतान मधील ३रे महत्वाचे शहर पुनाखा कडे वळू. थिंपू ते पुनाखा हा रास्ता म्हणजे निसर्गप्रेमींना एक पर्वणीच जणू. सायप्रस वृक्षांच्या गर्द झाडीतून जाणारा नागमोडी वळणाचा रास्ता, एका बाजूला गिरी शिखरे तर एकीकडे खोलखोल दऱ्या व त्यातून वाहत जाणाऱ्या शुभ्र नद्या कॅमेराला बंद होऊच देत नाहीत. भूतान हा देश संपूर्ण डोंगराळ असल्याने नागरी वस्ती व रस्ते बांधणी साठी नदी चे खोरे हीच योग्य जागा ठरते.त्यामुळे बहुतांशी रस्ते नदीपात्राशी लगड करत जाताना दिसतात. भूतान चे सर्व रस्ते हे आपल्या
'बी.आर.ओ' कडून बांधले जातात हे ऐकून आपली छाती अभिमानाने फुलल्याशिवाय राहत नाही तो भाग पुढील लेखात पाहणारच आहोत.
दोचु ला हि ३१०० मीटर उंचीवरील खिंड पार करून आपण पुनाखा खोऱ्यात प्रवेश करतो. 'फो चु' व 'मो चु' म्हणजे 'पिता नदी' व 'माता नदी' यांच्या संगमावर वसलेले हे एक भूतान मधील एक प्राचीन शहर. या २ नद्यांच्या संगमानंतर 'त्सांग नदी' म्हणून ती पुढे वाहते व भारतात पश्चिम बंगाल व आसाम च्या सीमेवरून वाहत जाऊन भारत बांगलादेश सीमेवर धुब्री येथे ब्रह्मपुत्रेला जाऊन मिळते. पुनाखा झोन्ग हे येथील मुख्य आकर्षण. हि वास्तू भूतान मधील सर्वात जुनी म्हणून हि ओळखली जाते सुरक्षेच्या दृष्टीने मोक्याच्या जागी बांधलेली हि झोन्ग आज पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. भूताननरेश 'जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक' व भारतात शिकलेली 'जेटसन पेमा' यांचा विवाह याच झोन्ग मध्ये झाला होता.
भूतान सरकार फक्त सात दिवसाचा परवाना आपल्याला देते ७ दिवसांनंतरही भूतान मध्ये वास्तव्य करायचे असल्यास योग्य कारण देऊन आपण आपली मुदत थिम्पू येथील कार्यालयातून वाढूं घेऊ शकतो. पर्यटनाबाबत भूतान सरकार ने विदेशी लोकांना काही नियम खालून दिलेत यामध्ये दक्षिण आशियायी देशाव्यतिरिक्त येणाऱ्या नागरिकांना २५० डॉलर प्रतिदिन खर्च करण्याची सक्ती आहे. भारतीय मात्र विना पारपत्र फक्त मतदान कार्ड दाखवून व्हिसा मिळवू शकतात. तसेच उत्तरेकडील भागात कित्येक हिमशिखरे अजूनही unexplored आहेत त्याच कारण हे कि भूतान सरकार ५९९९ मीटर वरील कोणत्याही शिखरावर चढाई करण्यास परवानगी देत नाही देशाचं प्राकृतिक सौंदर्य टिकून राहावं हा त्यामागचा उद्देश. निसर्गा प्रति असलेला आदर व निसर्ग संवर्धन यासाठी विदेशी पर्यटकांच्या संख्येवर भूतान कडून नियंत्रण ठेवले जाते.
अलीकडे लोकशाही स्वीकारलेल्या या देशात समांतररित्या राजेशाही व्यवस्था पण चालू आहे व राजाचे सर्व विभागावर बारीक लक्ष असते. भूतान च्या नैसर्गिक संप्पत्तीबद्दल राजघराणे खूप जागरूक असल्याचे दिसून येते.
लेखनसीमा असल्याने या लेखात आपण फक्त 'भूतान चे पर्यटन' या विषयी माहिती घेतली पुढील लेखात आपण भूतानच्या राजकीय, धार्मिक व सामाजिक व्यवस्थेबद्दल माहिती घेऊ.
(शंका. कुशंका, सुधारणा असल्यास निसंकोच दिलेल्या नं. वर संपर्क साधू शकता )
- योगेश आलेकरी
९७०२५२५४३५
काही निवडक छायाचित्रं -
|
कड्यातील मंदिर |
|
दादगिरी गावात आम्हला राहायला खायला देणारी छेत्री फॅमिली (यांचा उल्लेख ब्लॉग मध्ये नाही केला मुद्दाम ) |
|
ब्लॉग लेखकाची एक दुर्मिळ पाठमोरी छबी |
|
भुतानकरांचा आवडता खेळ तिरकमान |
|
हे आहे भूतान चे प्रवेशद्वार |
|
भूतान चा पैका |
|
आपले काही मराठी बांधव सैन्यात आहेत त्यांना शिवप्रतिमा भेट |
|
वाटेत भेटलेल्या विद्यार्थ्यांना गिफ्ट्स देताना जमवलेले क्षण |
|
आमचा फेसबुक मित्र सोनम वांगडी |
|
जयगाव येथे भेटलेले कमांडर पारेकर |
|
इंडो-भूतान सीमा मार्किंग |
|
थिंफू शहराचे प्रवेशद्वार |
झालं !!
आभारी आहे
आणि हो जरा महत्वाचं
- भटकंती सुरु करण्याच्या आधी वरील चिन्हे व संदेश आपल्या चित्तात, मनात, अंतःकरणात रुजावा.
- निसर्ग नियमांचे भान असुद्या, प्राणिमात्रांच्या आदर राखा.
- सुशिक्षित वागा (नसले तरीही दिखावा करा )
मजा आ गया...जिवंत लिखाण, मुद्देसूद एकदम...आवडया 😃😃
ReplyDeleteDhanyawad... :D
Deleteहे सगळ पाहिलेलं आसुन सुद्धा नव्यान पहातोय आस वाटलं इतक सुंदर लिखाण आहे
ReplyDelete