Tuesday, 10 October 2017

सिक्कीम ची सैर

बकथान्ग धबधबा
सिक्कीम ची सैर
 खूप दिवसाची पूर्वांचल भटकंतीची इच्छा पूर्ण होणार होती, ऑगस्ट २०१६ कोलकाता येथून दुचाकीवरून सुरु झालेला प्रवास पश्चिम बंगाल, असम, मेघालय, त्रिपुरा, मिझो, अरुणाचलप्रदेश करून आता वेध लागलेले ते सिक्कीम या राज्याचे. भूतान देशाला वळसा घालून असम, बंगाल प्रांतातून प्रवास करून सिक्कीम जावे लागणार होते. प्रचंड वादळी वारा व पाऊस यामुळे प्रवासाचा १८ वा मुक्काम अनपेक्षितरित्या धुपगुडी येथे पडला. ७ सिस्टर्स गटात अलीकडेच समावेश झालेले हे एक छोटंसं पण नितांत सुंदर राज्य आता  माझ्यापासून फक्त १२८ किमी दूर होतं. १६४२ मध्ये फूंटसोंग नामग्यालने नवे राज्य स्थापन केले म्हणून मग याचे नाव नवे घर किंवा राजवाडा म्हणजेच सिक्कीम. सिक हिम अशी संस्कृत मध्ये संज्ञा. तर तिबेटी लोक या भूमीला भाताचे कोठार म्हणून ओळखतात.

            तब्बल ४५०० किमी प्रवासात सोबत केलेली होंडा शाईन आता हिमालयाच्या कुशीत वसलेल्या सिक्कीम साठी सज्ज झालेली. भल्या पहाटे धुपगुरी सोडल व मायनागुरीतुन गाडी उत्तरेला गोरूमारा अभयारण्यातून धावू लागली, हत्ती व बिबट्यांसाठी ओळखले जाणाऱ्या या जंगलात अनेकठिकाणी 'हत्ती रस्ता  क्रॉस करत आहेत गाडी सावकाश हाका' अशा आशयाचे बोर्ड वाचून मन अगदी हत्तीच्या कळपात कधी फिरून आलं कळलंच नाही. वेळ सकाळची होती, सूर्यनारायण आपली प्रभा वाढवून रवीकिरणांना जंगलात खोलवर पोहचण्यास प्रवृत्त करू लागलेले, ती तिरकस सोनेरी सूर्यकिरणे उंचच उंच वृक्षराजीतून वाट काढीत काळ्याकभिन्न रस्त्यावर गालिच्याप्रमाणे पसरलेलं दृश्य डोळ्यांत साठवत आता मी महानंदा अभयारण्यात प्रवेश करता झालेलो. विविध प्रकारच्या माकडांची परिचित असलेले हे जंगल पार करून थेट आता तिस्ता नदीच्या अवखळ पात्रासमोर जरा वेळ स्थिरावलो, हिमालयातल्या रांगांतून शुभ्र मातीचा गाळ सोबत घेऊन धावणारं या नदीचं   हे अरुंद पात्र इथे मात्र बंगालच्या सपाट मैदानी प्रदेशात येताच शांतपणे मैलों मैल  उभे आडवे पसरत सोबतचा  गाळ नदीकाठाला साठवत जातं.
गोरुमोरा  अभयारण्यातील एक सुंदर 

कॉरोनॅशन ब्रिज

तिस्ता नदी

             तिस्ता नदीवरील सेवोक येथील पुलाला कॉरोनॅशन ब्रिज असं नामकरण राणी एलेझबेथ च्या १९३७ साली  कॉरोनेशन कार्यक्रमामुळे दिले गेले आहे, हा पूल १९४१ ला बांधून पूर्ण झाला, येथील २ वाघाच्या पुतळ्यामुळे स्थानिक याला बाघ पूल पण म्हणतात. तर अशा या सेवोक पुलावरून आपण हिमालयत प्रवेश करतो ते या तिस्ता नदी काठाने नयन रम्य निसर्गाच्या कुशीतून, घनदाट जंगलातून जाणाऱ्या नागमोडी रस्त्याने. तिस्तानदी आपल्याला सांगताम इथपर्यंत साथ देते व नंतर या रस्त्यालाराणी खोला या नदीच्या काठावर सोडून उंत्तरेकडील पर्वतांत दिशेनाशी होते. आता रस्ता चढणीला लागतो व आपण हळूहळू गंगटोक च्या जवळ पोहचतो. उजव्या बाजू ला राणी खोला  नदी व तिच्यावर उभारलेले हायड्रोपॉवर स्टेशन्स व त्यांचे जलाशय परिसराची शोभा आणखीणच  वाढवतात. हे सर्व सृष्टी सौंदर्य मागे सोडून आता मी धुक्याची दुलई पांघरलेल्या व हलकेच झालेल्या रिमझिम पावसात न्हाऊन निघालेल्या गंगटोक या  गिरीशहरात दाखल झालो. १६०० मीटर्स उंचीवरील गंगटोक हे भारतातील एक अप्रतिम हिलस्टेशन. स्थानिक गान्तोक असाही उच्चार करतात. गंगटोक म्हणजे गिरीमाथा. तर अशा या शांत रम्य व व सुखद गारवा, स्वच्छ रस्ते व आल्हादायक हवेचा आनंद घेत तब्बल २ तास शोधाशोध करून MG रोड ला एक स्वस्त न मस्त हॉटेल मिळवलं व सामान टाकून गूगल ला सोबतीला घेऊन बाहेर पडलो.
 एक सहज सुंदर क्लिक

                     मुख्य चौकात एक नोटिस दिसलं "SSB जवानांच्या तुकडीच्या वाद्यवृंद पथकाचे संचलन १५ ऑगस्ट निमित्त सायंकाळी ६ वाजता होणार होते, आत्ता २च वाजलेले त्यामुळे ६ ला यायचे ठरवून मी ताशी विव्ह पॉईंट कडे रवाना झालो, वाटेत बकथान्ग नावाचा छोटासाच पण अतिशय सुंदर असा धबधबा पाहून पुढे ७ किमी वरील ताशी  पॉईंट व वरून दिसणारं जगातील उंचीने ३ ऱ्या क्रमांकावर असणारे कोन्गचेन्गडझोन्गा (कांचनगंगा ) तर बाजूचेच सिनिऑलचू या बर्फाच्छादित शिखरे ढगांशी लपंडाव खेळण्यात मग्न होते ते विहंगम दृश्य डोळ्यात साठवून पुन्हा MG रोड कडे परतलो. आता इथे ssb जवानांची मस्त संगीत मेहफिल रंगलेली, त्यांनंतर MG रोड मस्स्त फेरफटका झाला गंगटोक मधील हा एकमेव मोठा रस्ता. रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रकारची दुकाने आहेत  त्यामुळेच हा  रस्ता नेहमीच पर्यटकांनी  गजबजलेला असतो. याच्या खालच्या बाजूला लालबाजार नावाचा एक मोठा बाजार आहे इथे आपल्याला देशी विदेशी बनावटीच्या हर एक वस्तू पाहायला मिळतील.
       दुसऱ्या दिवशी सकाळी नाथु ला पास साठी परमिट बनवणे वगैरे सोपस्कर पार पाडून १० वाजता  खासगी वाहनाने नाथुला कडे निघालो. वाटेत त्सोम्गो लेक व बाबा मंदिर हि दोन महत्वाची आकर्षणे या तिन्ही ठिकाणांसाठी एक संपूर्ण दिवस हाताशी असावा. गाडीची पुरेशी कागदपत्रे जवळ नसल्याने मला खासगी वाहनाने जावे लागले एका सुमोत १० जण स्वतःला कोंबून घेऊन आम्ही १६०० मीटर्स वरून ४३१० मीटर्स वरील नाथू ला कडे कूच केली. हिमालयाच्या पर्वतरांगांमधून जाणारा रस्ता, खडी चढण, तीव्र वळणे अरुंद रस्ता, बर्फ वितळून  रस्त्यावर आलेले पाणी अशा भयानक परिस्तिथीतून गाडी चीन च्या दिशेने सरकत होती. एका बाजूला उंचच उंच पर्वत तर  एकीकडे खोलखोल दऱ्या दूरवर बर्फाच्छादित शिखरे असे डोळयांचे पारणे फेडणारे दृश्य तळे १६ मीटर्स खोल आहे या संपूर्ण प्रवासाचे सार्थक झाल्याचे सूचित करत होते. ऑगस्ट असल्याने सभोवताली बहरलेली  ऱ्होडोडेन्ड्रॉन, प्रिम्यूला पॉपीज वगैरे फुले वातावरण कसे रंगीबेरंगी करत होती. बदके, स्थलांतरित पक्षी तर कधी रेड पांडाहि त्या जंगलात दर्शन देऊ शकतात.
पांडा (कसं बघतंय )
आता बऱ्यापैकी उंची गाठलेली असते, जंगल रास्ता, हिरवळ मागे पडून अतिउंचीवरील ओसाडपणा दिसू लागतोय, लवकरच आपण त्सोम्गो तलावापाशी पोहचतोय. ३७८० मीटर्स उंची वरील त्सोम्गो किंवा छांगु लेक म्हणजे एखादा सुंदर असा कॅनव्हास च !!! १. ६१ किमी लांबीचे हे लंबगोलाकार सरोवर १६ मीटर्स खोल आहे. भुतिया भाषेत त्सोम्गो म्हणजे सरोवरांचा उगम.  कितीतरी वेळ नजरेला समांतर राहणारे हे तळे हिवाळयात मात्र संपूर्ण गोठलेले असते. सिक्कीमी जनता या सरोवराला पवित्र मानतात. काठावरच एक शिवमंदिर आहे. ऑगस्ट मध्ये वातावरण अत्यंत बेभरवशी. त्यामुळे कधी ऊन तर कधी पाऊस तर कधी दाट धुके त्यामुळे तलावाचं मनसोक्त असं दर्शन घेता नाही आलं. थोडं पुढे गेले कि स्टेथेन ताशी केव्ह नावाचं एक तीनमजली अप्रतिम असं लेणं आहे ते नक्की पाहावं सुमोवाले टाळाटाळ करतात पण आपण मात्र 'सारखं लावून धरायचं' !
नाथू  ला खिंडीतील हि  इमारत

सिक्कीम मधील सौंदर्य

    आता आपण आणखी उंची गाठतो ते थेट नाथूला खिंडीच्या पायथ्यालाच पोहचतो. ३९६५ मीटर्स वर टॅक्सिचं शेवटचा थांबा असल्याने इथून पुढे उरलेलं अंतर पायीच जावं लागते. हा प्रवास खूपच आनंददायी ठरतो कारण आजूबाजूचं वातावरण ! विविध प्रकारची छोटी छोटी फुले आजूबाजूला वाऱ्याचा झोतावर नृत्य करत असतात तर दूरवर फेसाळते धबधबे स्वतःला खोल खाईत झोकून देताना दिसतात उंची ४३१० मीटर्स त्यामुळे कड्कयची थंडी व बर्फ सततच. विरळ हवा ऑक्सिजन ची मात्र अत्यंत कमी त्यामुळे काहींना खात्रीने त्रास होऊ शकतोच.
आता पायरीचा मार्ग सुरु होतो वाटेत मध्येच डाव्या बाजूला  हुतात्मा जवानांचे एक स्मारक लागते. देशासाठी बलिदान दिलेल्या जवानांचे स्मरण करून शेवटचा टप्पा पार करायचं मग येतो आपण थेट चिनी सैन्यांच्या समोरासमोर इथे भारत व चीन यांच्या समोरासमोर एक एक इमारती आहेत दोन्हीच्या मध्ये तारेचे कुंपण आहे. इथे फोटो काढायला पार बंदी आहे. डावीकडे बंद केलेले एक गेट दिसते त्यातून चीन मध्ये रस्ते मार्गे जाता येते. भारत चीन यांच्यातील व्यापार वाढीसाठी या मार्गावर सरकारतर्फे भर देण्यात आला आहे चीनची वाहने १६  किमी आत भारतात येऊन सूचित केलेला ठरावीक माळ भरून पुन्हा चीन मध्ये जातात तस या जागेबद्दल लिहायचं तर एक स्वतंत्र लेख च होऊ  शकेल. सिल्क रूट वरील हि अत्यन्त महत्वाची खिंड पाहून आम्ही परत फिरलो ते बाबामंदिर पाहण्यासाठी.
     एका सैनिकाच्या स्मृतीसाठी बांधलेले हे एक मंदिर. पंजाबातील एक खेड्यातील हरभजनसिंह नावाचा युवक १९६६ ला लष्करात दाखल होतो व भारत चीन सीमेवर ४ ऑक्टोबर १९६८ ला एका चकमकीदरम्यान  शत्रूला पिटाळून लावत असताना मृत्यूस कवटाळले. यांचा मृतदेह पाण्यातून वाहून गेला प्रचंड शोधाशोध करून हि सापडत नाही. शेवटी साथीदाराच्या स्वप्नात जाऊन हे आपल्या मृतदेहाच्या जागेबद्दल अचूक मार्गदर्शन करतात आश्चर्यकारक रित्या मृतदेह सापडतो. त्यानंतर त्यांची समाधी बांधली जाते व हरभजनसिंह यांचे बाबाहरभजनसिंह असे सैन्यांस स्पुर्ती देणारे दैवत बनून राहतात. आजही बबहरभजनसिंह जिवंत आहेत असे मानून त्यांची सुट्टी, कपडे, बैठक खोली ची व्यवस्था भारतीय सैन्याकडून लावली जाते. नाथू ला खिंडीत बाबाहरभजनसिंह तर तिकडे अरुणाचलप्रदेशातील चीन सीमेनजीक बूम ला खिंडीच्या रस्त्यावर जसवंतसिंह हे आज हि भारतीय सैन्यास प्रेरणास्थान म्हणून मानले जातात.
बाबा हरभजन सिंग मंदिराबाहेरील माहिती फलक

बाबा हरभजन सिंग

                    आता पार्टीच्या मार्गवर आलेलो, तीव्र उतारावरून अत्यंत कौशल्याने चालकाने गंगटोक मध्ये पोहचवलं. दरम्यान च्या काळात मी राजभवनाशी इमेलच्या माध्यमातून संपर्क साधला होताच तिकडून सकारत्मक प्रतिसाद आलेला आणि पुढच्याच दिवशी माझी सिक्कीम चे राज्यपाल मा. श्री. श्रीनिवास पाटीलसाहेब यांच्याशी भेटण्याची इच्छा पूर्ण होणार होती. इरफान सय्यद या त्यांच्या स्वीयसहाय्यकाशी फोन वर बोलणे झाल्यावर त्यांनी थेट राजभवतील विश्रामगृहात माझी राहण्याची व्यवस्था केली व राज्यपाल साहेबांनीही अत्यंत आपुलकीने विचारपूस केली राज्याच्या सर्वोच्च पदावरील व्यक्ती महाराष्ट्रातून येणाऱ्यांचे अगत्याने पाहुणचार करून मनमोकळेगप्पा मारताना पाहून मा. पाटील साहेबांचे आभाळाएवढे विशाल मन व मातीशी जोडलेली नाळ दिसून येते.तदनंतर मी दिवस भर येथेच्छ दुचाकीवरून भटकून रात्री राजभवनच्या विश्रामगृहात मुक्कमी.
सिक्कीम चे महामहिम राज्यपाल श्री. श्रीनिवास पाटील

राजभवन परिसरातील सेल्फी

    रुमटेक मोनेस्टरी गंगटोक पासून २४ किमी पूर्वेला असलेली एक सुंदर मोनेस्टरी. गंगटोकची टेकडी उतरून एक नदी पार करून पुन्हा एका उंच डोंगरावर चढाव लागते रस्ता फार मजेशीर वाटतो,  घनदाट जंगलातून जाणाऱ्या वळणावळणाचा रस्त्यावर गाडी चालवताना भलतीच मजा येत राहते. १तासाच्या प्रवसांनंतर आपण रुमटेक ला पोहचतो. धर्मचक्रकेंद्र असेही ता मंदिराला म्हणतात लामा साठी बौद्ध धर्म व तिबेटी भाषा यांचे शिक्षण देणारी शाळाही येथे आहे. याच्या समोरील एका छोट्या सभागृहात ग्रेट गोल्डन स्तूप हि आहे यावर विविध रत्ने जडवलेली दिसून येतात. इथून बाहेर पडलो कि परतीच्या मार्गावर १ किमी अंतरावर २००००  मीटर्स उंचीवर नेहरू बोटॅनिकल गार्डन आहे. वनस्पतीशास्त्रात रुची असणाऱ्यांसाठी हे गार्डन म्हणजे नंदनवनच. ! शेकडो विविध दुर्मिळ प्रजाती इथे जातं कारण ठेवलेल्या दिसतात. तर अर्चिड चे कित्येक प्रकार फुललेलं असतात. इथून आता मी पुन्हा गंगटोककडे रावांना होते थेट गणेशटोकडेच तसं पाहिलं तर कांचनगंगा शिखर सिक्कीम मधून कुठूनही सहज दिसतं पण भन्नाट फोटो काढायचे असतील तर गणेशटोकावरूनच शक्य. याच्या समोरच हिमालयीन झोलोजिकल पार्क आहे उत्तर पूर्व हिमालयातील अनेक हिंस्र प्राणी येथे मुक्त संचार करतात. एका भल्यामोठ्या टेकडीवर घनदाट जंगलात नैसर्गिकरित्या तयार केलेलं हे पाहिलं झू असावं.
संध्याकाळी पुन्हा एकदा बकथान्ग फॉल्स जवळ गाडी थांबवली. व मुक्कामी राजभन गाठलं. पुढच्या दिवशी भल्या पहाटे गंगटोक वरून दार्जिलिंग कडे गाडीने वेग घेतला व हळू हळू सिक्कीम मागे पडून मी पश्चिम बंगाल मध्ये प्रवेश करता झालो.
       तसं लिहायला खूप आहे पण लेखनसीमा. !!
-योगेश आलेकरी 
९७०२५२५४३५

अधिक ची छायाचित्रे 

रुमटेक मोनेस्टरी

महानंदा अभयारण्य

ब्लॉग लेखकाची कॉरोनेशन ब्रिज च्या पार्श्वभागावर एक कडक छबी

सदैव तय्यार होंडा शाईन

म. गां. मार्ग  गंगटोक

SSB चे वाद्यवृंद



ट्रेकिंग च्या मूड मध्ये ब्लॉग लेखक स्वतः

जंगल । रास्ता । दुचाकी । एकांत

घनदाट एकांत

नाथू ला पास

जवानांसंगे

चीन चे व्यापारी वाहन

रस्त्याची देखरेख करतानाची छबी

छांगु किंवा स्मोगो लेक

छांगु किंवा स्मोगो लेक

बोटॅनिकल गार्डनात

पोराना लिफ्ट
SSB

पाठीमागे नाथू ला


५००० किमी च्या पूर्वांचल प्रवासात साथ देणारी हीच ती

हा आता जरा कामाचं ..


  • भटकंती सुरु करण्याच्या आधी वरील  चिन्हे व संदेश आपल्या चित्तात, मनात, अंतःकरणात रुजावा.
  • निसर्ग नियमांचे भान असुद्या, प्राणिमात्रांच्या आदर राखा. 
  • सुशिक्षित वागा (नसले तरीही  दिखावा करा )
समाप्त :
(कड काढल्याबद्दल  धन्यवाद )

Monday, 9 October 2017

आनंदभूमी भूटान (भाग -१ )

                                                    
 आनंदभूमी भूटान (भाग -१ )

           भारत आणि चीन या दोन बलाढ्य राष्ट्रांमध्ये आपले इवलेसे सांस्कृतिक व भोगोलिक अस्तित्व टिकवून असलेला एक सार्वभौम देश भूटान. स्थानिक लोक भूतान ला 'द्रुक युल' संबोधतात म्हणजे ड्रॅगनचे घर. देशाचा जवळपास सर्वच भूभाग हा डोंगराळ प्रदेश त्यामुळे नीसर्गिक साधनसंपत्तीची नुसती रेलचेल. हिमालयाच्या दक्षिण उतारावरीती  मध्यम  उंचीच्या डोंगररांगांमध्ये वसलेल्या या नितांत सुंदर देशाला भेट देण्याचा योग नुकताच जुळून आला तो मेघालय ते मुंबई या आमच्या दुचाकी प्रवासाच्या निमित्ताने भुटानचीही भटकंती होऊन गेली . मेघालयातील वृक्षराजीतून लपंडाव खेळत खासी टेकड्या उतरत जाणाऱ्या रस्त्याने आम्हाला आसामच्या  सपाट मैदानी प्रदेशात आणून सोडले. मी व महेश आणि आमची बुलेट आता भुटानच्या दिशेने धावू लागली. ब्रम्हपुत्रा नदीचे विशाल  पात्र डाव्या बाजूला तर उतुंग हिमालय उजव्या बाजूने क्षितिजावर करवती प्रमाणे आपली गिरिशिखरे आकाशात खुपसून बसला होता. या निसर्गरम्य वातावरणात कधी फूंटशोलींग आले कळलेच नाही.
ब्रह्मपुत्रेवरील विशाल पूल 

                  फुंटशोलींग-भूतान चे प्रवेशद्वार. भारतातील पश्चिम बंगाल मधील जयगाव ला अगदी खेटून वसलेले हे भूतानचे एक महत्वाचे शहर.  भूतान प्रवेशाचे सर्व सोपस्कर म्हणजेच व्यक्तिगत व वाहन परवाना पत्र इ. बाबी पूर्ण करण्याचे एकमेव ठिकाण फुंटशॉलिंग. भूतान च्या हद्दीत प्रवेश करताच आपण हिमालयाच्या डोंगररांगा चढू लागतो.  पारो ,थिंपू व पुनाखा हि भुतान मधिंल महत्वाची ठिकाणे,  तर थिंपू हे राजधानीचे शहर.  आमचा पहिला मुक्काम पारो येथे. पारो चु  व वांग चु  (चु म्हणजे नदी ) या दोन नद्यांच्या संगमावर व चहुबाजूनी पर्वतांनी वेढल्यानें झालेल्या दरीत वसलेले हे एक सुंदर शहर. भूतान मधील एकमेव विमानतळ याच शहरात. भूतानची ओळख असलेली ताकसांग मोनेस्टरी अर्थात सुप्रसिद्ध 'टायगर नेस्ट मोनेस्टरी' पारो पासून १२ किमी अंतरावर आहे. इथे जाण्यासाठी पायथ्याच्या ताकसांग गावात जायचे मग तेथून ३ ते ४ तासाचा ट्रेक करून मोनेस्टरी पर्यंत पोहचायचं.



टाकसान्ग मोनेस्टरी किंवा टायगर नेस्ट
                    पण हे सोप्प नाही कारण ही मोनेस्टरी स.स. ३१२० मीटर वर उंच पर्वतावर एका कड्यात अत्यंत कल्पकतेने बांधलेली आहे. इथे गावातून खेचरे आपल्याला बक्कळ मोबदला घेऊन न्यायला तयार असतात पण ती फक्त पहिल्या टप्प्यापर्यतच साथ देतात जिथे एक कॅफेटेरिया आहे. इथून पुढील २ टप्पे मात्र आपले ट्रेकिंग चे कसाब पणाला लावायला लावतात. सायप्रस वृक्षांच्या दाटीवाटीतून वर वर चढणारी वाट चांगलीच दमवते कारण अतिउंची मुळे विरळ हवा, थंडी व खडी चढण. शेवटच्या टप्प्यात आपल्याला समोर मोनेस्टरी दिसत राहते मात्र ती पलीकडील डोंगरावरील कड्यात असल्याने इथून बऱ्याच पायऱ्या उतरून एक धबधबा पार करून तितक्याच पायऱ्या पुन्हा चढाव्या लागतात. हि चढाई उतराई न झेपल्याने बरेच पर्यटक इथूनच मागे जातात. इथून समोर पारो घळी चा सुंदर नजारा तर डावीकडे कड्याला बिलगलेली ताकसांग मोनेस्टरी असा विहंगम देखावा पाहूनच मन हरकून जातं. हा कष्टप्रद चढ उतार पार करून जेव्हा आपण मोनेस्टरी मध्ये आत जातो तेव्हा मात्र इथे आल्याचं चीज झाल्याचं समाधान मिळत. शांतता इतकी कि डोळे मिटताक्षणी ध्यान लागावे. 'मंत्रमुग्ध' या शब्दाचा अर्थ इथल्या शांततेत सापडतोम्हटल्यास वावगे ठरणार नाही.

टकसंग च्या जंगलातील निवांत पणा

                        या मंदिराबद्दल काही आख्यायिका आहेत, पद्मसंभवा वाघावर स्वार होऊन इथे आले व ३ वर्षे, ३महिने, ३ दिवस, ३ तास खडतर तपश्चर्या केली.  मूळ मॉनेस्टरी इ. स. १६०० मधे बांधली गेली. तरीही वेगवेगळ्या काळात बांधकामे झाल्याचे दिसून येथे. भूतानी जनतेसाठी हे एक श्रद्धेचे स्थान आहे व ते एकदातरी इथे येऊन जातातच. आता आल्या पावली मागे जाऊन ६ किमी वरील 'द्रुकगेल मोनेस्टरी' आवर्जून पाहावी, एक भव्य किल्ला वाटावा अशी हि मोनेस्टरी चहुबाजूनी बर्फाच्छादित शिखरांनी वेढलेली असल्याने फारच विलोभनीय वाटते.



द्रुकगेल किल्ला
                     यांनतर शहरातील पारो झोन्ग, संग्रहालय, झुरी झोन्ग, आर्चरी ग्राउंड इत्यादी वास्तू पाहून ६० किमी वरील थिंपू ला जातो. पारो सारखंच हे हि शिस्तबद्ध शहर. थिंपू नदीच्या खोऱ्यात वसलेल्या भूतान च्या  या राजधानीत अलीकडच्या काळात पब व थिएटर्स शहरात उभे राहिलेत. ट्राफिक सिग्नल नसलेले जगातील एकमेव शहर अशी बिरुदावली थिंपू अभिमानाने मिरवते. भूतानी नागरिक कमालीचे शिस्तप्रिय.  अनावश्यक हॉर्न कोणीही वाजवणार नाही, पादचारी फुटपाथचाच वापर करणार, क्रॉसिंग झेब्रा क्रॉसिंग वरच होणार व वाहन चालकही त्यांना प्राधान्य देताना दिसतात अगदी  पाहणाऱ्याने पाहतच राहावे एवढी नागरिकांची शिस्त मला भूतान मध्ये दिसून आली स्वच्छता तर एवढी कि संपूर्ण शहरच एखादा पार्क वाटावा तर अशा या शहरात विराजमान आहे ५१.१ मीटर उंचीचा ब्राँझचा बुद्ध पुतळा. स्थानिक भाषेत या जागेला 'कुएनसेल फोडरंग' म्हणतात. इथून रात्रीचा थिंपू शहराचा नजारा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे. त्याच बरोबर आणखी एक विशेष म्हणजे ' ताकिन' नावाचा एक दुर्मिळ प्राणी इथे पाहायला मिळतो. जो कि भूतान च राष्ट्रीय प्राणी आहे.मेंढी सारखा दिसणारा हा प्राणी फक्त भूतान, नेपाळ, चीन आणि बर्मा येथेच सापडतो. देचेन फोडरांग, नॅशनल लायब्ररी, तशीचो झोन्ग, फॉल्क हेरिटेज म्युसिअम इत्यादी ठिकाणी आपण थिंपू मध्ये पाहू शकतो

हाच तो ताकीन
             यांनतर भूतान मधील ३रे महत्वाचे शहर पुनाखा कडे वळू. थिंपू ते पुनाखा हा रास्ता म्हणजे निसर्गप्रेमींना एक पर्वणीच जणू. सायप्रस वृक्षांच्या गर्द झाडीतून जाणारा नागमोडी वळणाचा रास्ता, एका बाजूला गिरी शिखरे तर एकीकडे खोलखोल दऱ्या व त्यातून वाहत जाणाऱ्या शुभ्र नद्या कॅमेराला बंद होऊच देत नाहीत. भूतान हा देश संपूर्ण डोंगराळ असल्याने  नागरी वस्ती व रस्ते बांधणी साठी नदी चे खोरे हीच योग्य जागा ठरते.त्यामुळे बहुतांशी रस्ते नदीपात्राशी लगड करत जाताना दिसतात. भूतान चे सर्व रस्ते हे आपल्या 'बी.आर.ओ' कडून बांधले जातात हे ऐकून आपली छाती अभिमानाने फुलल्याशिवाय राहत नाही तो भाग पुढील लेखात पाहणारच आहोत. दोचु ला हि ३१०० मीटर उंचीवरील खिंड पार करून आपण पुनाखा खोऱ्यात प्रवेश करतो. 'फो चु' व 'मो चु' म्हणजे 'पिता नदी' व 'माता नदी' यांच्या संगमावर वसलेले हे एक भूतान मधील एक प्राचीन शहर. या २ नद्यांच्या संगमानंतर 'त्सांग नदी' म्हणून ती पुढे वाहते व भारतात पश्चिम बंगाल व आसाम च्या सीमेवरून वाहत जाऊन भारत बांगलादेश सीमेवर धुब्री येथे ब्रह्मपुत्रेला जाऊन मिळते. पुनाखा झोन्ग हे  येथील मुख्य आकर्षण. हि वास्तू भूतान मधील सर्वात जुनी म्हणून हि ओळखली जाते सुरक्षेच्या दृष्टीने मोक्याच्या जागी बांधलेली हि झोन्ग आज पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहे. भूताननरेश 'जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक' व भारतात शिकलेली 'जेटसन पेमा' यांचा विवाह याच झोन्ग मध्ये झाला होता.
       भूतान सरकार फक्त सात दिवसाचा परवाना आपल्याला देते ७ दिवसांनंतरही भूतान मध्ये वास्तव्य करायचे असल्यास योग्य कारण देऊन आपण आपली मुदत थिम्पू येथील कार्यालयातून वाढूं घेऊ शकतो. पर्यटनाबाबत भूतान सरकार ने विदेशी लोकांना काही नियम खालून दिलेत यामध्ये दक्षिण आशियायी देशाव्यतिरिक्त येणाऱ्या नागरिकांना २५० डॉलर प्रतिदिन खर्च करण्याची सक्ती आहे. भारतीय मात्र विना पारपत्र फक्त मतदान कार्ड दाखवून व्हिसा मिळवू शकतात. तसेच उत्तरेकडील भागात कित्येक हिमशिखरे अजूनही unexplored आहेत त्याच कारण हे कि भूतान सरकार ५९९९ मीटर वरील कोणत्याही शिखरावर चढाई करण्यास परवानगी देत नाही देशाचं प्राकृतिक सौंदर्य टिकून राहावं हा  त्यामागचा उद्देश. निसर्गा प्रति असलेला आदर व निसर्ग संवर्धन यासाठी विदेशी पर्यटकांच्या संख्येवर भूतान कडून नियंत्रण ठेवले जाते.
अलीकडे लोकशाही स्वीकारलेल्या या देशात समांतररित्या राजेशाही व्यवस्था  पण चालू आहे व राजाचे सर्व विभागावर बारीक लक्ष असते. भूतान च्या नैसर्गिक संप्पत्तीबद्दल राजघराणे खूप जागरूक असल्याचे दिसून येते.
लेखनसीमा असल्याने या लेखात आपण फक्त  'भूतान चे पर्यटन' या विषयी माहिती घेतली  पुढील लेखात आपण भूतानच्या राजकीय, धार्मिक व सामाजिक व्यवस्थेबद्दल माहिती घेऊ.
(शंका. कुशंका, सुधारणा असल्यास निसंकोच दिलेल्या नं. वर संपर्क साधू शकता )
                                                                                                               -  योगेश आलेकरी
                                                                                                                  ९७०२५२५४३५

काही निवडक छायाचित्रं -
कड्यातील मंदिर

दादगिरी गावात आम्हला राहायला खायला देणारी छेत्री फॅमिली (यांचा उल्लेख ब्लॉग मध्ये नाही केला मुद्दाम )

ब्लॉग लेखकाची एक दुर्मिळ पाठमोरी छबी

भुतानकरांचा आवडता खेळ तिरकमान

हे आहे भूतान चे प्रवेशद्वार

भूतान चा पैका

आपले काही मराठी बांधव सैन्यात आहेत त्यांना शिवप्रतिमा भेट

वाटेत भेटलेल्या विद्यार्थ्यांना गिफ्ट्स देताना जमवलेले क्षण

आमचा फेसबुक मित्र सोनम वांगडी

जयगाव येथे भेटलेले कमांडर पारेकर

इंडो-भूतान सीमा मार्किंग

थिंफू शहराचे प्रवेशद्वार
झालं !!
आभारी आहे

आणि हो जरा महत्वाचं 

  • भटकंती सुरु करण्याच्या आधी वरील  चिन्हे व संदेश आपल्या चित्तात, मनात, अंतःकरणात रुजावा.
  • निसर्ग नियमांचे भान असुद्या, प्राणिमात्रांच्या आदर राखा. 
  • सुशिक्षित वागा (नसले तरीही  दिखावा करा )

Thursday, 11 May 2017

शाळा- मंतरलेले दिवस

                                शाळा- मंतरलेले दिवस

स्वप्नवत विद्यालयाचे प्रवेशद्वार
                   शालेय जीवन म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक  हळवं पान असतं तर काहींच्या आयुष्यातील एक भळभळती जखम. स्वछंदी असे ते जीवन संपवून आपण कधी जबाबदार होऊन जातो कळतच नाही..असच २००६ मधील एप्रिल महिन्यात माझं बालपण संपत होतं. दहावीचा शेवटचा पेपर दिल्यावर मला अचानक भरून आलं शाळा संपली या जाणीवेनेच मी बैचैन झालो व ४ तास रानात वडाच्या झाडाखाली बसून गेल्या ५ वर्षात डोकावून पाहिलं.
एप्रिल महिना कडाक्याचा उन्हाळा चालूय, सर्वत्र भकास वातावरण, उन्हाच्या झळांनी दुपार अगदी न्हाऊन निघालीय, शाळू व खपली गव्हा ची शेते उरलेल्या पालापाचोळ्यासह निपचित पडून आहेत, दूर कुठेतरी कडबा भरून जाणाऱ्या  बैलगाडीच्या चाकाचा लयबद्ध आवाज कानी पडतोय, बाजूलाच गव्हाचं भुस्काट चघळत २ म्हशी संथपणे  रवंथ करण्यात मग्न आहेत. सावलीला जमलेल्या पाखरांची हलकीशी किलबिल सुरु असतेय मी मात्र स्वतःतच मग्न. !!आता आपले मित्र दुरावणार, सर्वजण वेगवेगळीकडे जाणार या विवंचनेत हायस्कुल ला प्रवेश घेतल्यापासून च्या एक एक घटना डोळ्यासमोरून सरकू लागल्या, डोळे घट्ट मिटून मनाला अगदी खोलवर घेऊन जात आठवणींच्या हिंदोळ्यावर झोके घेऊ लागलो -

             ____________________  -पाचवी ते सातवी -  __________________
 
             दिनांक १६ जून १९९९ इ पाचवी मध्ये गावापासून ३किमी दूर पंचक्रोशीत एकमेव असणाऱ्या श्री मुकुंदराज विद्यालय  शाळगाव येथे प्रवेश घेतला,गावापासून दूर माळरानावर २०-२५ एकरात पसरलेली ती भव्यदिव्य शाळा पाहून जॅम हरकून गेलो. २ भलीमोठी लाल मातीची  मैदाने, सभोवताली निलगिरी व पिंपर्णीच्या झाडांची गर्दी व मधोमध १४ खोल्यांची कौलारू टुमदार इमारत.

शाळेचा दर्शनी भाग
                           करांडेवाडीतून ४ मुले व ७ मुली पाचवीत प्रवेशती झाली, सर्व अनोळखी मुले आपापले गट करून ,  त्यामुळे न्यूनगंडात भरच.  पण हळू हळू वातावरण निवळलं  नवे मित्र झाले, विषयांत गोडी लागली, पाहता पाहता सत्र संपले द्वितीय सत्र सुरु झालं प्रगतीपुस्तकावर मार्कांच्या राशी पडू लागल्या त्यामुळे एकूणच मी त्या वातावरणात मिसळून गेलो, त्यातच सहलीच पत्रक आले. जाऊन हि आलो.  द्वितीय सत्र हि उत्तम मार्कानी पास झालो, पुढच्या वर्गात नव्या गमतीजमती सुरु. पुन्हा  तो पावसाळा, ते सायकल वरून रपेटी मारलेल्या, चिखलात ब्रेक दाबून सायकल फरफडत नेत केलेले स्टंट, तो सुरपाट्यांचा डाव, शाळेच्या कित्येक हेक्टर वर पसरलेल्या मैदानात पावसात खेळलेले फुटबॉल अशी मनात आठवणींची रेलचेल सुरु झाली.


 वरील  सर्व फोटो साभार - राम करांडे
                                एव्हाना वेगवेगळे विषय व त्यांचे सर यांची समीकरणे मनात पक्की होत गेली.  मराठीसाठी  मराठीची बोलीभाषेपासून वाङमयपर्यंत भाषेची उत्तम जाण असणाऱ्या सौं. घाडगे मॅडम,   विज्ञान  म्हंटलं  हलक्या फुलक्या भाषेत सजीव उदाहरणासह पण शेजारचे ४ वर्ग शिकून निघतील अशा खड्या आवाजात  शिकवणाऱ्या सौ शिंदे मॅडम. हिंदीला अभंग सर, इंग्रजीला हेरवाडे सर हे जरा जास्तच कडक व्यक्तिमत्व, इतिहास भूगोल या विषयात मात्र बऱ्याच सरानी प्रयत्न करूनही  विषयाला योग्य हाताळतील असे शिक्षक नव्हते मिळाले ती कसर मात्र नवखेच पोरसवदा असलेले कदम NV  यांनी भरून काढली,इतिहास भूगोल शिकविण्याची त्यांची पद्धत खूपच रंजक-परिणामी  इतिहासातील मगध साम्राज्याचा उदय, मौर्य, सातवाहन,  बिदूंसार, कनिष्क, कलिंग ची लढाई इ. प्रकरणे कायमची कोरली गेली.  त्याचबरोबर  भूगोलात कांगो नदीचे खोरे, टुंड्रा प्रदेश, नाईल चे खोरे इ शब्द त्यांच्याच आवाजात अजूनही कानात गुंजतत्.
                    तत्कालीन आमच्या दृष्ट्या मुख्याध्यापकांच्या दूरदृष्टीने शाळेत आलेल्या संगणकासाठी तसे पूर्णवेळ तद्न शिक्षक न लाभल्याने व नाविन्याची गोडी आधीपासूनचीच असलयाने स्वतःच विविध पुस्तके आणून अभ्यास सुरु झाला, परिणामी मी, धनंजय, जयवंत आमचं वजन आपसूकच वाढल व पुढे तद्न शिक्षक आल्यानंतर आम्ही बऱ्या पैकी टेकसॅव्ही झालो ते कायमचेच. विविध कारामतीत हेही वर्ष गेले आणि हो सहल !! पुणे देहू आळंदी भन्नाट झालेली हि पण अविस्मरणीय सहल !
                         ________________________________________________________ 

         सर्व कसे मजेत होते पण एक गोष्ट जरा विदारकच! तत्कालीन सामाजिक परिस्थीचा परिणाम म्हणा हवं तर पण शाळेत मुला -मुलींच्यात कमालीचं भेदभावाच वातावरण होतं. वर्गात मुलींशी बोलणे म्हणजे मोठा गुन्हाच तो . त्यातच वर च्या वर्गातील पोरांनी आधीच घाबरवून सोडलेलं मुलींशी बोलायचं नाही सरानी पाहिलं तर बेदम मार  मिळतो इ. सरांनीही कधी या आमच्या गैरसमजला दूर नाही केलं उलटपक्षी तो दृढ कसा होईल अशीच काहीशी धोरणं  असायची, अर्थात त्यामागे त्यांची कदाचित मुलींच्या सामाजिक सुरक्षेची भावनाही असेल पण मार्ग मात्र चुकीचा होता. आमच्या सारखा निरागस, खट्याळ पोरांवर दाखवलेला  अविश्वास वाटतो तो मला. परिणामी मुलांच्या दोन ओळी व मुलींच्या २ ओळी यामद्धे प्रचंड खुनशी वातावरणाने जागा घेतली. जिथं खेळी मेळीच वातावरण असावं तिथंच विरोधीपणाची भावना वाढीस लागलेली.
एक एक प्रसंग आठवतोय मला तुम्ही चकित व्हाल- एकदा एक मित्र धावत धावत एक बातमी घेऊन आला, क्षणाचाही विलंब न करता आम्ही बातमीची खातरजमा करायला १० अ या वर्गाकडे धावलो. बातमी अशी होती कि  १० वि तील एक आमच्या गावातील विद्यार्थी वर्गातील एका मुलीशी वर्गात खुलेआम गप्पा मारतोय! कदाचित मुलं कळती झाल्यामुळे वा एखाद्या सरांच्या विषयप्रगल्भतेमूळे थोडंसं तिकडील वातावरण निवळलं असेलही  पण आमच्या साठी मात्र तो प्रसंग दुर्मिळातील दुर्मिळ प्रसंगातील एक होता. अक्षरशः काहीतरी बेकायदेशीर कृत्य शाळेत चालू आहे या अविर्भावात अचंबित होऊन आम्ही त्या घटनेचे साक्षीदार झालो . असो अशी विषमता होती त्यावेळी पण मी मात्र माझ्या वयक्तिक पातळीवर हि विषमता दूर करण्यासाठी जोरदार प्रयत्न चालू ठेवलेलं. त्याच्याच एक भाग म्ह्णून मी इ. ७ वि पर्यंत वार्षिक एक प्रयत्न असे ३ प्रपोज पाठवलेले पण या प्रयत्नांना सपाटून अपयश आले. (नंतरच्या काळात  संबंधित व्यक्तीना  बालपणीच्या नाकारघंटेचा पश्चाताप झालाही असेल म्हणा ;) ) मुलींचा किल्लेकोट अगदीच भक्कम असल्याने मला ती तटबंदी भेदता  आली नाही आणि दरी आणखी वाढत गेली.
        असो, याच वर्षात गणिताला तिवले सर नवीन रुजू झालेले सडपातळ बांधा, सदैव उत्साही मनुष्य, हसरा चेहरा, आपल्या वेगळ्या शैलीत अगदी सोप्पे करून शिकवणारी गणिताची पद्धत यामुळे अचानक माझा गणिताचा ग्राफ उंचावला. दरम्यानच्या काळात जाधव AD सर चित्रकलेला आले, माझ्या काही चित्रांचा आखिवरेखीवपणा पाहून जरा प्रोत्साहन देताच लहान गटात मला प्रथम पारितोषिक मिळाले ते सालाबादप्रमाणे इ.९वी  पर्यंत सोडले नाही आणि मला सूर गवसला.(१० वित असले चांगले उद्योग करणे बंद केलेले मी )
याच काळात गांगुली च्या संघाने २००३ च्या विश्वचषक स्पर्धेत चांगलाच धुमाकूळ घातल्याचे पडसाद आमच्याही भागात उमटले परिणामी आम्ही सदैव कुठेतरी माळावर बॅट बॉल घेऊन दिसू लागलं. तेव्हा जर IPL असते ना तर आमचा MSB अर्थात Mukundraj Super Blasters नावाचा एखादा तरी संघ असताच :D

               _______________________-आठवी ते नववी- __________________
 
 हेही वर्ष संपले मोठे होऊ  लागलो.  
२००४ चा उत्तरार्ध दुष्काळ घेऊनच आला. किरकोळ परीक्षा शुल्क भरतानेही पालकांची चाललेली घालमेल अनुभवली, १०-२० रुपये सुद्धा संकट वाटू लागलेले... नोकरदारांना पगार फिक्स असतोच त्यांचं जगणं  सुसह्य होते मात्र शेतकऱ्यांचे हाल पाहवत नव्हते. अचानक समज आली.पैशाची किंमत कळली. जबाबदारी अंगावर आली. सर्वत्र रान कोरडे पडलेलं, पाऊसकाळ कमी, गुरांसाठी शाळेच्या माळावर चारा छावण्या  लागल्या. दुपारच्या सुट्टीत गुरांसाठी शासनाकडून येणारा ऊस खाणे हा आमचा टायम पास! टँकर आला की  रंगलेला क्रिकेट चा डाव सोडून जमेल तितका ४   दिवस पुरेल एवढे पाणीसाठा करून घेण्यासाठी धावाधाव करायला लागायची.
८वी साठी  दुष्काळ हीच एक आठवण
इ. ९वी teenagers मधील एका महत्वाच्या टप्प्यावर होतो अभ्यासातील प्रगतीही उत्तम होती, विविध उपक्रमात सहभाग चालूच होता (अप्रत्यक्षरीत्या पोरींना प्रभावित करण्याची कोणतीच संधी सोडली  जायची  नाही ;) )
सेप्टेंबर महिना आला कि वेध लागायचे ते विविध स्पर्धांचे निमित्त कर्मवीर जयंती रयत च्या सर्व संस्थामधील मानाचा उत्सव. यावर्षी रांगोळी स्पर्धेत भाग घेऊन काही मुली खूपच हवेत गेल्या होत्या साहजिकच  त्यांना खाली आणण्याची जबाबदारी उरावर घेऊन रांगोळी स्पर्धेत भाग घेतला. गालिचा, मोर, ठिपक्यांची कासवं-बिसवं याना फाटा देत कृष्णाला प्रेम पत्र लिहणारी राधिका चितारली व रांगोळीचे रंग भरले. चित्रकलेच्या राज्यस्तरीय स्पर्धा केलेल्या असल्याने बारकाव्याचा भारी अभ्यास!  सोबत अचूक रंगसंगती, शृगांरिक भाव व घट्ट असे मापकच कपडे यामुळे खूपच आकर्षक रांगोळी झाली होती. नंबर पक्काच !पण आमच्या परीक्षकांना या रांगोळीतील किंवा चित्रातील आखीव रेखीवपणा, गोलाई (curves ) हे  माझे वय लक्षात घेता रुचला नाही व तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. चालायचे !
हेच  चित्र  जे आखीवरेखीव रांगोळी म्हणून काढलं होतं मी

                यावर्षीची सहल जरा खास च ठरली कारणेही तशीच, महत्वाचे म्हणजे आम्ही जाणते(???) झालेलो. मुक्कामी सहल, खट्याळ बुद्धी. आणि अतिमहत्वाचं म्हणजे स्वतःचा कॅमेरा घेऊन त्या काळी सहलीला जाणारा पहिला विद्यार्थी.नशीबवान होतो सहलीसाठी कपडे खरेदीला गेलो असता एके ठिकाणी सेल होता विविध सरप्राईझ गिफ्ट होते माझं लक्ष कॅमेरावर होत आणि 'मेरी सून ली ' कॅमेरा लागला रोल वाला.(आत्ताच्या हवा करणाऱ्या पोरांना कोण सांगणार कि मोबाइलपण नव्हते तेव्हा योगेश आलेकरी कॅमेरा वापरत होता ) (मनोमन म्हटलं या या कॅमेराच्या भांडवलावर ३-४ तरी लायनी क्लिअर होणार ;) )पुढे त्या कॅमेराने मोठं रामायण रचलंच.
   सहलीवरून आल्यावर एक रोल बाकी होता कोडॅक चा होता वाया नव्हता घालवयचा म्हणून मग आम्ही NCC च्या ड्रेस वर आमच्या ग्रुप चे फोटो काढायचे संमत झाले. एव्हाना माझ्या प्रयत्नांना थोडंफार यश येऊन दरी कमी झालेलीच त्यामुळे काही मुलींनी पण फोटोसेशन साठी विचारणा केली आणि आम्हीही  निर्णयाचं स्वागत करत सामील करून घेतलं (आम्हालाही तेच हवं होत म्हणा ).
                                झालं तारीख ठरली २६जानेवारी २००५ प्रजासत्ताक दिन आटोपून आम्ही, आम्ही संगोपन केलेल्या पेरूच्या बागेत आमचं छायाचित्रण चालू असतानाच जाधव सर व भोसले सर यांनी धाड टाकली आणि एकेकाला चोप दिला अचानक झालेल्या हमल्याने गांगरून गेलो. कर्णधार या नात्याने मलाच पाहिलं धरला आणि तुडवून काढलं आणि माझ्यातील एका उभारी घेणाऱ्या फोटोग्राफरला अक्षरशः तुडवून मारला रे !
नंतर स्टाफ रूम मध्ये उलगडा झाला कि का मारला एवढं, कारण कि,  मुलींचे फोटो काढणे गुन्हा आहे.फोटो एडीट करून काहीही करता येऊ शकत असे बेबुनियाद आरोप लावले गेले पण आमच्या मुख्याध्यापकांच्या सहिष्णू वृत्त्तीमुळे त्यांनी आमची बाजू घेतल्याने दिलासा मिळाला.... !!!                                         
                   वर्ष संपलं पुन्हा तेच दुपारचे पेपर, विहिरीवर येथेच्छ डुंबणे, कैऱ्या, पेरू, काकड्या चोरणे आणि क्रिकेट.
                            __________________  -दहावी -________________
               
                        आता अभ्यासाच ओझं वाढलं  बघता बघता दहावीत आलो, समज वाढली सकाळी ८ वाजता अभ्यासिकेला शाळेत सर्वजण जमू लागलो. गप्पांच्या फडात अभ्यास पेक्षा लैगिक विषय जास्त या चर्चा होऊ लागल्या. हाच काय तो आमचा माहितीचा स्रोत.
काळ शारीरिक संक्रमणाचा होता. भिन्नलिंगबद्दल आकर्षण, मानसिक शारीरिक बदल जाणवू लागलेले एका बाजूला अभ्यास तर एका बाजूला हे मानसिक हलकल्लोळ सांभाळणे कठीण जात होते. प्रश्न  होते उत्तर मिळत नसत. स्वतःची सतसतविवेकबुद्धी  वापरून बऱ्याच प्रश्नाची उकल हि  व्हायची पण खात्रीशीर उत्तर नसायचे. भावना नुसत्याच चाळवल्या जायच्या. आजच्या सारखं गूगल नव्हते त्यावेळी कि लगेच हातात सर्व. संगत चांगली राहिल्याने तसल्या फिल्म हि खूप च उशिरा पाहण्याचा योग आला. 'जेवढे दूर तेवढी उत्कंठा जास्त' या नैसर्गिक नियमानुसार या साऱ्याच गोष्टींची उत्कंठा जास्त होती, होणारच कारण आमच्याकडे मुलींशी बोलणेही वर्ज्य होते.  अशा फावल्या वेळात गाप्पान्चे फड रंगायच पोरं स्वतःच जोड्या लावायचे 'हि' माझी,  'ती'  ह्याची वगैरे वगैरे.  कधी एखादा मनोराजा उगीचच एखादी सोबतच्या घालवलेल्या वेळेच्या  सुरस कथा सांगायचा. आम्हीही आपले कान देऊन ऐकायचो कधीतरी एखाद्याची सत्य घटना असली तरी बाकी ९९%  थापाच असायच्या त्याही आम्ही मजा घेत ऐकायचो... मग प्रत्येकाला वाटायचं आपली पण एक मस्त लव्हस्टोरी असावी यातून मग एकेक काल्पनिक कथा  स्वताची म्हणून घोळक्यात मारली जायची, ज्याच्या त्याच्या बुद्धीवर कथेचा दर्जा ठरला जायचा काहींची कथा फारच सुमार असायची सुरवात होता क्षणीच आम्ही त्याला वेड्यात काढायचो. पण काहींनी मात्र जान ओतलेले असायची आह्ह काय ती कल्पना .... काय ते वर्णन ... काय ते टाईमिंग जुळलेलं ..देखावाच डोळ्यासमोर उभा राहायचा ... !
तिकडे मात्र ती  स्वप्नसुंदरी  धुनी-भांडी केरकचरा काढण्यात एवढी गर्क असायची कि आपण कुणाचे आणि आपला कोण राजकुमार? व  आपल्यासोबतच्या शृगांरिक कथांच्या रंगलेल्या महफिलीचा तिला  तिळमात्र गंध नसायचा.अभ्यासाच्या सोबतीला हा सिल्याबस बाहेरचा अभ्यासही  आला होता. खरी मजा तर तेव्हा आली जेव्हा लैंगिक शिक्षण द्यायला  बाहेरचे शिक्षक आले व ज्यादाचे तास घेतले गेले. मुला-मुलींना वेगवेगळ्या वर्गात बसवून दहावीच्या वर्गाला  लैगिक शिक्षण देण्याचा घाट घातलेला आणि त्याची गरज हि होतीच. समोर मानवी शरीर त्याची रचना, गुप्तांग, त्यामधील बदल, समस्या, काळजी वगैरे समोर दाखवले जात होत पण आम्हला चिंता कशाची ? हेच तिकडे मुलींच्या रूम मध्ये पण दाखवला गेले असेल तर मुलींची काय रिअक्शन असेल ? पुढे वाढलेलं राहिलं बाजूला आम्ही या विवंचनेत कि तिकडे अमकी अमकी फारच निरागस  आणि लहान, तिच्या बालमनावर काय विपरीत परिणाम होईल ही  चित्रे पाहून, तिची काय अवस्था होईल हे पाहून या नुसत्या विचारानेच आमच्या काळजात चर्रर्र व्हायचं !का न व्हावं ? काळजीच तेवढी होती.
"मुलांना आपण जेवढे लहान समजतो किंवा ठेवतो तेवढी ती लहान नसतात" 
दहावी 'ब' २००६ बॅच    (मागिल रांगेत डाव्या  बाजूला उजवीकडे खाली पाहणारा मी आहे )

आम्ही कितीही विनोदात ते घेतले असले तरी माहिती खूप मिळाली होती खुप उत्तरे मिळाली होती बदल झाला  होता नंतर  कंडोम कसे असतात कसे वापरतात याची प्रात्यक्षिके दिली, सेक्स म्हणजे काय प्रेम, सेक्स, आकर्षण यातील फरक हळू हळू स्पष्ट झाला. एव्हाना बरेच कळते झालेलो एक बाजूने दहावीचा अभ्यास होताच यावर परिणाम नाही पण काहींच्या अभ्यासावर मात्र खुप परिणाम दिसून आला. एका अवलियाने त्या बाहेरच्या शिक्षकांचे कंडोम चे बॉक्स पळवले मग नंतर ४ दिवस फुल्ल टाईमपास नुसता प्रात्यक्षिके घेण्यातच ! त्यात एक बकरा सापडला एकाने गुपचूप कंडोम लावून पहिला व कौतुकाने आम्हाला सांगितलं म्हटलं याची गम्मत करावी - त्याला बोललो 'चूक केलीस मोठी असं नसतं करायच.  लग्नाआधी कन्डोम लावलास तर नंतर 'हे' 'हे' त्रास होतात "हे' होणार नाही "ते" होणार नाही . घाबरला तो . त्याला बोललो उपाय एकाच गोमुत्राने धुवून पवित्र करून घे मी ऐकलंय कुठंतरी खरं असतंय. बिचारा २ तास रानोमाळ हिंडून गाई शोधून पवित्र होऊन आला.
असो,
अशा गंमती होत राहायच्या. लिहण्यासारखं खूप आहे. ;)  पण लेखन सीमा.

दहावी 'अ' २००६ बॅच
असो. रात्र अभ्यासिका झाली.सराव झाली. मुख्य परीक्षा आली, हिंगणगाव, जे कि ५ किमी दूर होते  तिकडे परीक्षा केंद्र. मुलींनी टमटम ठरवलेली प्रवासाला तर आम्ही सायकल फ्रीफेर केली. येडे फाट्यावर वडापावच्या गाड्यावर झालेली गर्दी पाहून फुकट वडापाव खाऊन गुपचूप पळ काढताना भारी मजा यायची .. !
पेपर काहींना अवघड तर काहींना सोपे गेले. माझी बेरीज ७१% वर जात होती तेव्हाच जाणवले या सर्व वातावरणाचा नकळत आपल्याला फटका बसलाय. दुर्दैवाने फक्त ६८% मिळाले जे खूपच कमी होते.
निकालानंतर ज्याचे काका, मामा, दादा बाहेर होते त्यांनी पोरांना बाहेर नेले शिकायला, काही कडेगाव, काही कराड, काही विट्याला रवाना झाले. पोरींचं  हक्काचं भरती विदयापीठ कडेगाव होतंच.. ! मी दूरवर चांदोली अभयारण्यायतील एका निवासी कॉलेज मध्ये भविष्य शोधायला जाणार होतो.
    त्या चार तासात असा सर्व पट डोळ्यासमोरून सरकून गेला. बालपण सोडून मी आता एका जबाबदार जगात प्रवेश करता झालो. आणि आयुष्यातील एक सुवर्णकाळ मनाच्या कुपीत बंद झाला तो फक्त आयुष्याच्या एखाद्या वळणावर आठवणी उगाळून चेहऱ्यावर हास्य उमटवायला.. !

आपले बालपण परत मिळू शकत नाही पण आपल्यातल्या त्या निरागस लहान मुलाला जपण्यासाठी आणि पाय कायम जमिनीवर ठेवण्यासाठी संत तुकारामांचा हा एक सुंदर अभंग ...

लहानपण देगा देवा । मुंगी साखरेचा रवा ॥१॥
ऐरावत रत्न थोर । त्यासी अंकुशाचा मार ॥२॥
महापूरे झाडे जाती । तेथे लव्हाळ वाचती ॥३॥
जया अंगी मोठेपण । तया यातना कठीण ॥४॥
तुका म्हणे बरवे जाण । व्हावे लहानाहून लहान ॥५।।
- संत तुकाराम

 _____________________________________________________________________

Lords - The revenge

                Lords - the revenge             तब्बल 2 महिने बाईक चालवून मी लंडन ला पोहचलो. 2 दिवस स्थिरस्थावर झाल्यावर मी लगेचच लॉर्ड क्रि...