आमच्या भटकंतीमध्ये काही वाक्प्रचार सर्रास वापरले जातात, ज्यांमुळे ट्रेकला रंगत चढते. त्यातले काही जसे आठवले तसे इथे देत आहे. आपल्याला आवडतील अशी अपेक्षा आहे.
१. भा. स्टॅ. टा. वर पोचणे: नियोजित वेळेपेक्षा पोचायला अर्धा पाऊण तास उशीर होणे
२. गाडी वेळेवर सुटणे: सकाळचे विधी सुरळीत होणे.
३. सकाळी गाडीला उशीर होणे / रद्द होणे: 'गाडी वेळेवर सुटणे' च्या उलट स्थिती होणे.
४. सगळ्या बाजूंनी शिट्ट्या मारणे: गाडी रद्द झाल्यानंतरची स्थिती.
५. बुंगवणे: दुचाकी किंवा चारचाकी ७०-८० च्या वरच्या वेगाने चालवणे.
६. फोटो काढत काढत मिनिटांत वर पोचणे: फारच छोटा गड/किल्ला असणे.
७. ट्रेक ’जरा’ स्पेशल असणे: खूप अवघड ट्रेक असणे.
८. माकड होणे: अति वाईट अवस्था होणे. एखादी गोष्ट बाकीच्यांना जमूनपण आपल्याला न जमणे.
९. शाहरुख खान होणे: अवघड ठिकाणी (सहसा रॉक पॅच उतरताना) बोबडी वळणे.
१०. ड्रायक्लीन होणे / करणे: ओव्हरनाइट ट्रेक नंतर सकाळी फक्त तोंड खंगाळून तयार होणे (दुसरा पर्यायच नसतो).
११. आजारी पडणे: ऑफिसला दांडी मारणे.
१२. विकेट जाणे: लग्न ठरणे / होणे.
१३. हिट विकेट आऊट होणे: प्रेमविवाह / लव्ह मॅरेज करणे.
१४. मश्रूम ब्रेक: २ मिनिटांसाठी आडोशाला जाणे. कुत्र्याची छत्री आठवून पहा, समजेल हा वाक्प्रचार.
१५. वाघ मारायला जाणे: १५-२० मिनिटांसाठी आडोशाला जाणे. ’गाडी सुटणे’चा समानार्थी.
१६. ससा मारायला जाणे: मश्रूम ब्रेकला पर्यायी वाक्प्रचार.
१७. बायोडायव्हर्सिटीला हातभार लावणे: मश्रूम ब्रेक, गाडी सुटणे, वाघ मारायला जाणे यांसाठी एकत्रित वाक्प्रचार.
१८. टोटल ’लागणे’: खूप हाल होणे.
१९. पाय घसरणे: घसरून पडणे. पण पडता पडता सावरणे.
२०. तोंड काळे करणे: घसरून पडून आडवे होणे अथवा बुड जमिनीला टेकणे. साष्टांग नमस्कार घालणे.
(पाय घसरणे आणि तोंड काळे करणे यात एक कोटि आहे.)
२१. भैसटणे: अतिउत्साहाने किंवा खूप थकल्यामुळे वेडे चाळे करणे.
२२. पोटातल्या कावळ्यांचे हत्ती होणे: फार भूक लागणे.
२३. बातम्या खाणे: गडावर किंवा गुहेत पोचल्यावर घरुन किंवा येताना रस्त्यात घेतलेल्या वडे, पोळ्या, पराठे यांवर पेपरची शाई उमटते. पण ते तसेच खाणे.
२४. ढील देणे: जुन्या ट्रेकच्या आठवणी फारच (जरा जास्तच) रंगवून सांगणे.
२५. घरी यायला थोडासा उशीर होणे: घरी पोचायला रात्रीचे १२:०० + होणे.
२६. चटई-उशी मिळणे: बायको खूपच रागावणे (फक्त विवाहितांसाठी).
२७. रोबो होणे: ट्रेकनंतरच्या दुसऱ्या दिवशी पाय फार दुखुन वाकवता न येणे.
तुमच्याकडे आणखी खजिना असेल तर कॉमेंट्समध्ये जरूर लिहा.
[वरील मजकूर कॉपी पेस्ट केलेला आहे ]
No comments:
Post a Comment