Friday, 26 April 2024

Lords - The revenge

                Lords - the revenge 

           तब्बल 2 महिने बाईक चालवून मी लंडन ला पोहचलो. 2 दिवस स्थिरस्थावर झाल्यावर मी लगेचच लॉर्ड क्रिकेट मैदानाला भेट द्यायला गेलो. हेच ते लॉर्डस मैदान ज्याला क्रिकेट ची पंढरी मानले जाते. जिथून क्रिकेटचा जन्म झाला म्हणू शकतो तेच हे ऐतिहासिक लॉर्डस चे मैदान. 

लॉर्डस वर ब्लॉग लेखकाची एक छबी.

           पण याही पेक्षा माझ्या आयुष्यात लॉर्डस चे महत्व वेगळ्याच कारणासाठी होते ते म्हणजे भारतीय क्रिकेट ला अग्रेसिव करण्याची पायाभरणी करणाऱ्या एका घटनेमुळे. आपला लाडका दादा उर्फ सौरव गांगुली त्याने इंग्लंड संघाला लॉर्डस वर अस्मान दाखवलेलंच पण Englishman Flintoff च्या उन्मादी वृत्तीला त्याच्याच भाषेत टीशर्ट काढून उत्तर दिलेले, त्या लॉर्डस च्या ऐतिासिक गॅलरी ला मला भेट द्यायची होती. त्या गॅलरी मध्ये मला माझे riding jacket फिरवायचे होते आणि तिथं एक मस्त फोटो काढायचा होता मग सोबत एक मैत्रिणीला घेऊन लॉर्डस ला गेलो. 

लॉर्डस चे सुंदर मैदान


चला तर त्या मागची कहाणी पाहूया..... 

        दादाची दादागिरी ( सौरव गांगुली) 

        साल 1999 भारतीय क्रिकेट मधील एक काळा कार्यकाळ. अझहर सारखा यशस्वी कप्तान मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी सापडतो सोबतच अजुन काही स्टार खेळाडू ही दोषी आढळतात आणि मग भारतीय क्रिकेट ला एक प्रकारचं ग्रहण लागू पाहत होते. संघ बिखरला, कप्तान वर बंदी, जगभरात झालेली भारतीय क्रिकेट ची बदनामी. अशा स्थितीत नुकत्याच संघात स्थिरस्थावर होत असलेल्या दादाच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडली. सर्व अनुभवी खेळाडूंनी अंगावरील पाल झटकावी तशी कर्णधार पद झटकवलेले. आणि अशात च त्या काटेरी सिंहासनावर दादा म्हणजेच ९० किड्स वाल्यांचा लाडका खेळाडू सौरव गांगुली विराजमान झाला. खरंतर बळीचा बकरा बनवण्यासाठी दिलेल्या त्या कॅप्टन पदाचे दादाने अक्षरशः सोने केले. 

           संघाची पुनर्बांधणी केली. U19 मधील युवराज, भज्जी, झहीर, सेहवाग, कैफ अशी नवी फळी तयार केली नवख्या पोरांना घेऊन अल्पावधीत च गांगुलीने संघ जिंकू शकतो ही अशा निर्माण केली. 2001-2002 या काळात तब्बल 7 icc इव्हेंट मध्ये फायनल गाठली पण दादाच्या दुर्दैवाने म्हणा किंवा प्रेशर मध्ये भारतीय संघ नेमका कच खात असल्याने अजून तरी फायनल नावावर पडली नव्हती. Hero cup, Pepsi cup, tvs triangular series etc मध्ये जोरदार कामगिरी करून दादाने भारतीय क्रिकेट ला पुन्हा ते वैभव मिळवून दिलेलं. 


          अशातच एकदा जानेवारी 2002 मध्ये इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर आलेला. मी 6 वी मध्ये होतो नुकताच घरी BW TV आलेला त्यामुळे स्वतःच्या घरात बसून मॅच बघण्याचे स्वर्गसुख मिळणार होते. 3 कसोटी आणि 6 एकदिवसीय सामन्यांचा भरगच्च कार्यक्रम होता. गांगुलीच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका भारताने 1-0 ने जिंकली. आम्ही तेव्हा मारझोड, तोडफोड, फटकेबाजी अशा क्रिकेट ला प्राधान्य देणारे असल्याने कसोटीवर खास लक्ष नव्हते पण ODI ची मोठी उत्सुकता लागलेली. पहिला सामना भारताने जिंकला. दुसरा इंग्लंडने जिंकला मालिका बरोबरीत आलेली. 3 फेब 2002 ला वानखेडेला फायनल येईपर्यंत भारत 3-2 ने आघाडीवर होता आता फायनल मारून ब्रिटिशांना हात हलवत परत पाठवायचे असं आम्हा मित्रांनी ठरवून ही टाकलेलं. 

           3 फेब्रवारीला मुंबईच्या प्रसिद्ध अशा वानखेडेवर शेवटची अटीतटीची मॅच सुरू झाली. इंग्लिश कर्णधार नासिर हुसेन ने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा स्वीकारली इंग्लिश सलामीवीर कोणीतरी त्याने 95 धावा केल्या पण बाकी संघ भज्जी ने 5 विकेट घेऊन 255 मध्ये गुंडाळला. भज्जी 5 विकेट गांगुली 2 विकेट सचिन 2 विकेट घेऊन सामन्यावर मजबूत पकड मिळवलेली. भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला सलामीची स्पोटक जोडी (सचिन - सेहवाग) ची स्वस्तात परतली गांगुलीने धुरा सांभाळत 155-3 अशा मजबूत स्थित संघ नेऊन ठेवला. 205 वर 5 वी विकेट दादाची पडली तडाखेबंद 80 धावांची खेळी करून गांगुली विजयाची मेख ठोकून पविलयन मध्ये परतलेला, आता फक्त 50 धावा हव्या होत्या पण उरलेला संघ खेळपट्टीवर हजेरी लावून परतू लागल्यावर दादा खूप च भावनिक झालेला दिसू लागला. 

         शेवटी 12 बॉल 18 धावा. कुंबळे आणि हमांग बडानी खेळपट्टीवर उभे.49 वी ओवर आणि फक्त 7 धावा निघाल्या. आता 6 बॉल 11 आणि नासिर हुसेन ने सामना वाचवण्याची जबाबदारी अँड्रु Flintoff कडे दिली. सामना इंग्लंड कडे झुकला कारण सेट फलंदाज बदानी नॉन striker वर होता समोरील पडझड पाहण्याशिवाय त्याकडे काहीही उरले नव्हते. तरीही कुंबळे आणि बदनी यांचा केविलवाणा प्रयत्न सुरू होताच त्यात कुंबळे runout. मग श्रीनाथ ने पहिल्याच बॉल वर त्रिफळाचित होऊन ब्रिटिशांना जल्लोष करण्यास मैदान मोकळे करून दिले. कर्णधाराने टाकलेलं विश्वास सार्थ ठरल्याने Flintoff च्या उन्मदाला सीमा उरली नव्हती, भावाने टीशर्ट काढून मैदानात सैरावैरा पळत सुटला. हा तोच Flintoff ज्याने २००७ T२० WC मध्ये युवराज सिंह ची खोड काढली आणि परिणाम म्हणून युवराजचे स्टुअर्ट ब्रोड ला ६ सिक्स पडले. Flintoff चा हा उन्मादी जल्लोष सर्वानाच खटकला आमचा सौरवदादा अतिशय हळवा मैदानात बेंगोल रॉयल टायगर सारखं वर्तन असलं तरी अशा भावनिक क्षणी दादाच्या चेहऱ्यावर ते दुःख वेदना हतबलता कधी लपून राहत नव्हती. Flintoff चा तो मजूर्डेपणा बघून दादा रडवेला चेहरा करून आत पवेलियनमध्ये गेला. सामना गेला उडत आमच्या दादाच्या तोंडावर साफ साफ दिसलेलं रडू बघून आमचा बांध फुटला. खरेतर तिथं जाऊन Flintoff ला थोबाडविण्याची ईच्छा झालेली. कदाचित गांगुली ची पण तिच ईच्छा असल्याचे दिसतही होते पण कप्तान असल्याने तो काही करू शकत नव्हता आणि इकडे मी घटनास्थळापासून 350 km दूर B/W टीव्ही समोर असल्याने काही करू शकत नव्हतो. 

मालिका 3-3 अशी बरोबरीत सुटली. 2-4 दिवस बातम्यांमध्ये हार जित आणि Flintoff चे वागणे यावर लेख पडत गेले आणि सर्वजण विसरून ही गेले. पण दादाच्या काळजात खोलवर झालेला तो घाव दादा विसरला नव्हता दादा संधीची वाटच पाहत होता.



           आणि दादाला ती संधी दिसू लागली अगदी नजरेच्या टप्प्यात. NatWest series - IND - ENG - SL त्रिकोणी मालिका. जून- जुलै 2002 भारतीय संघ सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली इंग्लंडला रवाना झाला, दादाने बांधणी केलेला तसा नवखाच पण पूर्ण जोशिले पोरांनी भरलेला संघ परदेशात कमी अनुभवी असला तरी त्यांचा नेता सर्वांना लीड करण्यास खंबीर होता. संघातील काही खेळाडू तर पहिल्यांदाच परदेश दौऱ्यावर जात होते. इंग्लंड आणि भारताच्या झंझावाती खेळापुढे श्रीलंका संघ स्पर्धेतून बाहेर पडला आणि दोन तुल्यबळ संघ आता फायनल मध्ये एकमेकांना अंगावर घेणार होते. 

     स्थळ लॉर्डस क्रिकेट ग्राउंड. 

    दिनांक - 13 जुलै 2002. 

              नाणेफेक जिंकून इंग्लिश कप्तान नासिर हुसेन ने फलंदाजी घेतली झहीर ने नेहमीप्रमाणे पहिली विकेट लवकर घेतली पण तो आनंद जास्त काळ टिकला नाही कारण नासिर हुसेन आणि मार्कस या दोघांनी भारतीय गोलंदाजी ची पिसे काढत स्कोअर 227 वर नेला दोघांनी शतके ठोकली कॅप्टन नासिर हुसेन ने तर पत्रकारांना पाठीवर बोट दाखवत कुत्सितपणे जर्सी no. 3 दाखवला. कारण 3 वर फलंदाजीस उतरून नासिर चूक करतो किंवा 3 नंबर वर उतरणारा हा इंग्लिश कॅप्टन अयशस्वी आहे अशी नासिर वर English मीडिया मधून टीका होत होती. इंग्लंड 227-2 अशा मजबूत स्थितीत होता. त्यानंतर 3 री विकेट थेट 307 वर पडली तरी अखेरच्या 4 overs मध्ये फक्त 25 धावा देणे हेच भारतीय गोलंदाजी चे मोठे यश म्हणले गेले. कारण तब्बल ७ विकेट हातात असताना आणि ३०० पार स्कोअर असताना death overs मध्ये हाणामारी करत नक्कीच ५० धावा कुटता आल्या असत्या पण सरतेसमयी भारतीय गोलंदाजीला  लाईन लेंथ सापडते आणि ताळ्यावर येऊन टिच्चून मारा करत फक्त २४ बॉल्स मध्ये २५ धावा देत कौशल्य दाखवले. 

इंग्लंड ने 325 चे टार्गेट दिले. भारतीय तंबूत सन्नाटा. त्याकाळात 280-300 स्कोअर चेस करणे अशक्य मानले जाई. त्यात चोकर्स म्हणून टीम इंडिया बदनाम झालेली. lords मैदानात मॅच म्हणजे जगाचे लक्ष लागलेले, प्रचंड प्रेशर. त्यात 326 धावांचे अवढव्य लक्ष्य. जवळपास हार सर्वांनीच मानलेली. 

           दादा सेहवाग ला घेऊन मैदानात उतरला आणि तुफान सुरुवात करून देत दादा आज bat नाहीतर तलवारच घेऊन उतरला आहे की काय असा त्याचा आवेश होता. फास्टर चा मारा बोथट करत 106 वर धावसंख्या गेली आणि दादा out झाला. त्यानंतर पुन्हा तेच सर्व दिग्गज हजेरी लावून परतले 106-1 ते 146-5 अशी नाजूक परिस्थिती दिसू लागली 5 वी विकेट Tendulkar ची पडली आणि सामना पुन्हा इंग्लंडकडे फिरला. कारण इथून पुढे इंग्लिश बॉलर्स चा सामना करण्यास कोणी उरलेच नाही असा सर्वांचा समज झालेला मैदानात कैफ उतरला नवखा खेळाडू, कोणाच्याच अपेक्षा नव्हत्या नासिर हुसेन तर कैफ ला बस ड्रायव्हर म्हणून चिडवत होता. युवराज आणि कैफ यांनी सावध पवित्रा घेत धावफलक हलता ठेवला विकेट टाकणे परवडणारे नव्हते  इकडे इंग्लिश बॉलर्स ना तोंड देणे किंवा तिकडे पविलयनमध्ये दादा  आणि जॉन राईट यांना तोंड देणे दोनच पर्याय.!! दोघांनी अनपेक्षित रित्या 131 धावांची अतिशय महत्त्वपूर्ण अशी partnership केली आणि बघता बघता सामना पुन्हा इंग्लंडच्या हातून हिसकावून घेत भारतीय तंबूत आणला खरा पण लगेचच कॉलिंगवूडने युवराजला बाद केले आणि पुन्हा पारडे इंग्लंड कडे झुकले कारण हा शेवटचा फलंदाज. आता भज्जी, कुंबळे, झहीर, नेहरा हे उरलेले आणि अजुन ही तब्बल 70 धावांची गरज होती. कैफने सूत्रे हातात घेत धावसंख्या वाढवत नेली भज्जी ने 15 धावा करत कैफ ला साथ दिली. 18 बॉल 14 धावा असे समीकरण झालेलं मॅच जिंकणे अजूनही भारतासाठी अशक्य होते कारण 48 वी ओवर ला बॉल Flintoff च्या हातात. यातून सुटले तर पुन्हा 50 व्या ओवर ला Flintoff च येणार हे नक्की होत. 

             नियतीची खेळी पाहा 6 च महिन्यात तीच परिस्थिती सेम वानखेडे मॅच सारखी. सेट फलंदाज कैफ nonstiker end ला. सर्वांना धाकधूक. आणि Flintoff ने मॅच फिरवलीच.! ४८ वें षटक - 3 धावा आणि 2 विकेट भज्जी आणि कुंबळे out. आता झहीर खान आला कसाबसा शेवटचा एक बॉल खेळला. 49 व्या ओवर चा शेवटचा बॉल कैफ strike वर होता. कशीबशी एक रन काढून लास्ट ओवर मध्ये strike वर राहण्यासाठी कैफने अंधाधुंद bat फिरवली आणि bat ची कड लागून थर्ड man ला चौकार. हा चौकार कोणीही एन्जॉय नव्हता केला कारण आता strike वर झहीर खान आणि बॉल Flintoff च्या हातात. अजुन ही काय होईल कोणालाच अंदाज येत नव्हता. तब्बल 324-8 अशा धावा भारताकडून तेही लॉर्डस वर आणि इंग्लंड ला चेस करताना स्वप्नवत वाटणारी परिस्थिती निर्माण झालेली. लॉर्डस च्या गॅलरी मध्ये दादा गळ्यातील लॉकेट मुठीत पकडुन जणू जीव् मुठीत घेऊन बसलेला. पहिला बॉल डॉट. इंग्लिश फिल्डरनी अकारण जोरदार अपील करून झहीर वर दबातंत्राचा वापर करू लागले. दुसरा बॉल झहीर टोलवतो एक रन साठी धावतो, throw miss होतो दोघे पुन्हा एक रन काढतात आणि थेट पविलयन कडे धावत सुटतात. आनंदाला पारावार उरलेला नसतो, मैदानात उरलेल्या भारतीय प्रेक्षकांनी जल्लोष सुरू केला, अनपेक्षित निकाल लागलेला, सामना भारताने जिंकला. 326 असा प्रचंड मोठा स्कोअर चेस केला गेला. Flintoff पीच वर मान खाली घालून बसलेला उठलाच नव्हता. 

            तिकडे लॉर्डस च्या गॅलरी मध्ये एक वेगळेच नाट्य घडले. सर्वांना अनपेक्षित असे दृश्य - सौरव गांगली टीशर्ट काढून गोल गोल फिरवत होता. इतर नव्या खेळाडूंनीही दादा ची नक्कल करत टीशर्ट काढण्याचा प्रयत्न केला पण सचिन आणि द्रविड यांनी रोखले, पण दादाला कोण रोखणार? दादाने Flintoff ला त्याच्याच घरात जाऊन त्याच्याच भाषेत उत्तर दिले. हा लढाऊ पणा, आक्रमकपणा दादाने भारतीय संघात भरलेला. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, विंडीज यांची क्रिकेटवर असलेली मक्तेदामक्तेदारी काढत भारताची दादागिरी सुरू झालेली. आमच्यासारख्या असंख्य लहान मुलांच्या आयुष्यात सौरव गांगुलीने अनदांचे क्षण भरले त्याला सचिन- सेहवाग, युवी, झहीर, कैफ, द्रविड यांची साथ लाभत गेली. त्या काळी tv, मोबाईल, internet, कार्टून चॅनल्स असले प्रकार आमच्या आयुष्यात नसल्याने खेळ हाच एकमेव करमणुकीचे आणि आनंदाचे साधन. त्यामुळं त्या घटनेकडे खेळ म्हणून कमी आणि भानविक म्हणून आम्ही जास्त जोडले गेलेलो. 90s generation हे समजू शकते.




               त्या गॅलरीला भेट देण्यासाठी मला तब्बल २१ वर्षे लागली. पण अनंद् हा होता की मी मुंबईतून बाईक वरून इंग्लंड आणि लॉर्डस ला गेलेलो. दादा उर्फ सौरव गांगुलीने सहाच महिन्यात बदला घेतला असला तरी मला २१ वर्षे लागलेली. लॉर्डस मैदानाच्या visit दरम्यान मी क्रिकेट संबंधी अनेक गोष्टी तिथे पहिल्या. एक अतिशय बोलका हजरजबाबी गाईड त्या मैदानाची सैर घडवत होता. त्याने अतिशय माहितीपूर्ण ती सैर घडवली संपूर्ण स्टेडियम फिरून पाहिले सर्व रूम पवेलियनस पाहिले. तिथे museum मध्ये गांगुलीची ती जर्सी पहिली, 1983 ला कपिल सरांनी उंचावलेला World Cup पहिला. लॉर्डस चे ते प्रसिद्ध मीडिया सेंटर पाहिले. हाडाचा क्रिकेट प्रेमी असाल तर आयुष्यात एकदा तरी लॉर्डस सफर करावीच. Flintoff च्या एका अँक्शन ला दादाने लॉर्डस वर उत्तर दिले त्या संपूर्ण मैदान सफरीत Flintoff चे नाव एकदाही त्या गाईड च्या तोंडातून आले नाही, पण गेले २१ वर्षे दिवसातून २ वेळा त्याला सांगावं लागतं की हा इंडियन कॅप्टन सौरव गांगुलीचा टीशर्ट आहे. आणि या गॅलरी मध्ये तो ऐतिहासिक प्रसंग घडलेला. आणि तिथे कोणीही टीशर्ट काढून नये बंदी आहे. अशा प्रकारे सौरव गांगुलीने लॉर्डस गाजवलेले. 


एक अविस्मरणीय दिवस सार्थकी लावून मी सायंकाळी सुवर्णदुर्ग कॅस्टल हे आपल्या कोकणातील सुवर्णदुर्ग किल्ल्याशी संबंधित असलेल्या वस्तूकडे बाईक स्टार्ट करून निघालो. 

समाप्त: 

योगेश आलेकरी.









Monday, 20 July 2020

बदलाचे वारे

बदलाचे वारे. 

वयाच्या 19 व्या वर्षी, मी 2009 ला मुंबई ला गेलो, कॉलेज, जॉब, बिजनेस हे सर्व सेट करण्यात 10 वर्षे कशी गेली कळलं ही नाही. या काळात चार दोन महिन्यांनी मी गावी यायचो पण गडबडीत असायचं सर्व. 4 दिवसांत परत जोखड खांद्यावर घ्यायला मुंबई ला रवाना. 

आता 4 महिने गावी आहे. कोरोनामुळे सर्व जग ठप्प आहे, कोरोनाने सर्वांची वाट लावलीय. सर्वांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालंय. मी पर्यटन व्यवसायात, आमच्या फिल्ड चे तर सर्वात जास्त आणि दूरगामी नुकसान झालेलं आहे. लाखोंचं नुकसान भोगून ही कोरोनामूळे मला 4 महिने निवांत जगता आले म्हणून कोरोना ला मनाच्या एका कोपऱ्यातून थँक्स म्हणणारा मीच असेल. कोणीही ठरवून असे 4 (किंवा 5 6 ही) महिने सर्व व्याप सोडून  आयुष्यात कधीच थांबणार नव्हता. निवांतपणा अनुभवणार नव्हता. कोरोना ने सक्ती ने ते दिलंय. वाईटातून चांगले.


       
या 4 महिन्यात मी खूप निरीक्षण केले, गावाचे, गावातील लोकांचे, समाजातील बदलाचे, निसर्गाचे, त्यांच्यातील बदलाचे, पशुपक्षी यांचे. शेती चे.
तर मी आज शेती मधील बदल अनुभवलेले आणि निसर्गचक्र कसं बिघडले त्यावर केलेलं निरीक्षण लिहत आहे. 

 सर्वात मोठा बदल म्हणजे पक्षांची रोडवलेली संख्या. 
मागच्या 10 वर्षात आमच्या भागात पाण्याच्या मुबलक सोयी झाल्या, त्यामुळे शेतीत आमूलाग्र बदल झाले कोरडवाहू वाटणारा भाग आज बागायत झालेला आहे,  जमिनीचा कोपरा न कोपरा लागवडीखाली आणण्याची धडपड सुरू झाली.  उसामुळे एका एका सरीचे, फूटभर जागेचे ही महत्व वाढले. परिणामी बांधावर असणारी भली मोठी झाडे अडचण ठरू लागली. उत्पन्नात बाधा आणणारे घटक हटवू जाऊ लागले त्यात प्रामुख्याने बांधावरील बाभूळ, निंब, करंज, काटेरी झुडपे, पिंपळ, वड, चिंच, शेवरी हे झाडे मोठ्या प्रमाणात तोडली गेली. बाभूळ तर आज भागात दुर्मिळ झालीय. बाभूळ यावर एक वेगळा लेख लिहावा लागेल.
आता उत्पन्न तर वाढू लागलंय पण इतर अदृश्य नुकसान होत आहेत. उदा. झाडे तोडल्याने वादळे सरळ गावात घुसत आहेत.  पाऊस अनिश्चित झालेला आहे. पक्षी जवळपास दिसेनासे च  झालेले आहेत. 

पक्षी कमी झाल्याने पिकांवरील कीड वाढू लागली आहे, 
10 वर्षांपूर्वी नसलेल्या किडी आज पिकांवर आहेत. पक्षी हंगामी पिकावरील कीड खाऊन ती नियंत्रणात ठेवत असतात पण आज कोणत्याही पिकांवर औषध फवर्णिशिवाय पर्याय नाही.  आता जी काही पक्षी शिल्लक होते ते फवारणी केलेली किडे खाऊन मरू लागलेत. 
कोरडवाहु शेती होती तेव्हा शाळू, ज्वारी, बाजरी असली पिके असत पक्षी आपली गुजराण त्यावर करत असत. पक्ष्यांचे थवे च्या थवे शेतांत बागडताना चे दृष्य दुर्मिळ झाले. 

पूर्वी मका, बाजरी, ज्वारी यांचे कणीस घरात पडवीला, गुरांच्या गोट्यात टांगून ठेवले जात होते, पीक काढल्यानंतर पक्षांना काही काळ तरी खाद्य मिळावे हा उदात्त हेतू त्यामागे असे. आता आपण फक्त आपले पोट बघतोय इतर जीवांना कवडीमोल करून टाकले आहे. 

कोंबड्या पाळणे कमी झाले आहे, कोंबड्या सर्व उकिरड्यावर फिरुन किडे खात असतात, हुमनी या किडीने तर शेतकऱ्यांना जेरीस आणले आहे ही हुमनी कीड खतांतून जमिनीत जाते. पक्षी उकिरड्यावर दिसणारी सर्व कीड खात असत, पायांनी उकरून हुमनी खात असत आता पक्षी नाहीत, कोंबड्या नाहीत तिकडे हुमनी वाढलेली दिसून यतेय. 
सायंकाळी आम्ही शाळेतून घरी येत असताना आकाशात असंख्य पक्षी घरट्याकडे जाताना दिसत असत. आता चुकून एखादा पक्षी दिसतोय. 
मोठी झाडे तोडल्याने पक्षांना घरटी बांधण्यास जागा नाही, 
सर्वत्र खुरटी संकरित झाडे दिसतात आता. 
बैलाने शेती इतिहासजमा झाली, ट्रॅक्टर ला अडथळा नको म्हणून अजून झाडे तोडली गेली. 
रासायनिक खतांचे प्रमाण वाढले, संकरित बियाणे वाढले त्यामुळे कित्येक अपरिचित तणे शेतात दिसू लागलीयत. मग त्यावर आता तणनाशक फवारणी आली. अतिशय जहाल तणनाशके, कीटकनाशके फवारून आपण नैसर्गिकरीत्या कीड खाणारे सरडे, खार ई. सरीसृप संकटात टाकत आहोत.  
नैसर्गिकरित्या आलेली मोठं मोठी झाडे तोडली गेल्याने वांडरांनी गावावर आक्रमणे सुरू केली. वड, पिंपळ, निंब अशी झाडे तोडल्याने वनरांना खाद्य नाही. मानवास उपयुक्त नसणारी पण निसचक्रात मोलाचे योगदान देणारी ही झाडे, त्यांची फळे, फुले यावर वानर जगत असतात. आता ते खाद्याच्या शोधात गावात येतात कुंपणतील फळझाडे, फुलझाडे यावर ताव मारतात. हा एक प्रकारचा उपद्रव च आहे. 
अजून एक विषय म्हणजे जमीन वाढवण्याचा नादात भराव घातले गेले, पाण्याचे प्रवाह अरुंद केले. 
त्यामुळे पाण्याचा वेग वाढून अजून नुकसान, पूरस्थिती निर्माण होतेय.

सारख्या बऱ्याच छोट्याछोट्या गोष्टी  मागच्या 4 महिन्यात दिसून आल्या. शेतीतून उत्पन्न वाढलेच त्यात शंका नाही च पण आपल्या हातून नकळत निसर्गाचे खूप नुकसान होत आहे आणि ते टाळणे अशक्य आहे, अस मला वैयक्तिक वाटते.
आमच्या शेतीच्या बांधावरील ही खूप झाडे तोडली गेलीत यावर उपाय म्हणून मी तरी यंदा 140 नवीन झाडे लावून एक केविलवाणा प्रयत्न केला आहे. सर्वांनी असा प्रयत्न केल्यास बदल दिसू शकेल.
बाभूळ या विषयी लवकर एक पोस्ट करेल. 
तूर्तास धन्यवाद 🙏



(टीप- मी शेती विश्लेषक नाही माझ्या अल्पमतीस दिसलेली निरिक्षणे मी मांडली आहेत, काही ठिकाणी वेगळे ही असू शकेल) 


©योगेश आलेकरी

Tuesday, 24 March 2020

लिंगाण्याचा समाचार

लिंगाण्याचा समाचार
लिंगाणा !!!
सह्याद्रीतील एक अजब रसायन. या एका शब्दाची व्याप्ती तोच जाणू शकतो ज्याने सह्याद्रीत पोटभर भटकंती केलीय आणि डोकंभर मराठ्यांच्या  इतिहासाचा अभ्यास केलाय. त्यास अधिक सांगणे न लगे. एक मानबिंदूच. प्रत्येक ट्रेकर चे स्वप्न असतंच एकदातरी लिंगाण्याच्या माथ्यावर पाय ठेवावा. तास हि माझ हि होतच परवाच ते सत्यात उतरलं... ! लिंगाण्याची  अभेद्यता पाहावी ती रायलिंग वरून व रायगडाची भव्यता पहावी ती लिंगाण्यावरून च. असा हा मोक्याच्या जागी उठवलेला गगनचुंबी अभेद्य सुळका वजा किल्ला, किल्ले लिंगाणा _/\_
TEAM ULTIMATE

_________________________________________________________________________________

हा तर झालं असं कि १७ मार्च २०१७ ला गंगटोक च्या MG रोड वर फेरफटका मारत असतानाच विषांत चा फोन आला ९ एप्रिल २०१७  रोजी देवा घाणेकर च्या नेतृत्वाखाली आग्याबॉईज मंडळ लिंगाणा करतंय आणि तुला यायला लागतंय. आता लिंगाणा ट्रेक ला नकार देण्याएवढं धाडस माझ्या अंगी नसल्याने आपसूकच कोणत्याही विचारांती होकार गेला. आणि मी ही ३ एप्रिलला महाराष्ट्रात पोहोचत होतो.

गंगटोक च्या MG  मार्गावरून 

झालं !
आलो....
४ दिवस अराम पण झाला, आणि तो दिवस उजाडला. आम्ही चौघे दोन फटफटी घेऊन मोहरीच्या दिशेने दौडू लागलो. प्रचंड ऊन, कमालीची वाहतूक कोंडी यामुळे पोहचायला वेळ लागणार होता म्हणून नसरापूर ला थांबलेलं मंडळ आमची वाट बघून चालू पडलं. आम्ही मग चिंचवड ला  संजू दादा ची धावती भेट घेऊन एक एक मस्तानी खाऊन वाऱ्यावर स्वार झालो. अपेक्षेप्रमाणे एकालदऱ्यात मावळतीला हजर झाल्याने रागडाच्या साक्षीने मनसोक्त फोटो झाले. एक्कलदारा हे एक माझ्या आवडतीतलं ठिकाण.  गुंजन मावळातून कोकणात उतरायचं प्रवेश स्वर च जणू.. पाठीमागे प्रचंडगड उर्फ तोरणा , तर दोन्ही बाजूला मोहरी केळद डोंगररांगेच्या २ बुटक्या टेकड्या, डावीकडे दूरवर मढे घाट व शेवत्या घाटाची पुढे सुटलेली नाकाडे  तर समोर वीरा  नदी व तिच्या तोंडाला असणारी अग्याची नाळ तर दूरवर स्थितप्रद्न्य असा दुर्गदुर्गेश्वर रायगड आपला अवाढव्य विस्तार पसरवून पहुडलेला. जरासे उजवीकडे सिंगापूर नाळे पलीकडे आपला लाडका लिंगाणा मान वर करून या संपूर्ण साह्य मंडळावर निरंकुश वर्चस्व राखून उभा दिसतो , तर त्यापलीकडे पुसटसा कोकणदिवा आपलं सर्वोच्च टोक संभाळत लिंगाण्याकडे कौतुकाने पाहतॊय असं भासतं. असं हे  एक्कलदारा पुराण !!

फोटो सेशन 

_________________________________________________________________________________

संधीप्रकाशात पुन्हा गाड्या सुरु झाल्या... आता काहीच वेळच मोहरीच्या दाखल होणार होतो. झालोही.
मित्र मंडळी भेटली,  गप्पाचे फॅड रंगू लागलेलं तोच विषांत ने आवाज दिला चहापान करू मग बोलू !!
झालं !! चहापानाचा कार्यक्रम जोशात आटोपला.. देवा ने तर भन्नाट सरप्राईझ दिले गेल्या गेल्याच 'विश्वस्त' हि वसंत लिमये लिखित कादंबरी एक महिन्यचा प्रवास करून आल्याबद्दल गिफ्ट दिली.. हरकून गेलो बहरून गेलो, आनंदून गेलो..

देवा घाणेकर ने दिलेलं गिफ्ट (त्याने फोटो काढल्यामुळे तो फ्रेम मध्ये नाही )

आता उघड्या आकाशाखाली मस्त गप्पांची मेहफिल रंगलेली . आमच्या मेघालयातील गमती जमती,, गुहेचे चित्त थरारक अनुभव यामध्ये पोरं चांगलीच गुंग झालेली.
सोबतच bike ride चेही अनुभव कथनाचा  झाला व जेवणाचे डब्बे काढून येथेच्छ असा ताव मारला, कारण हि तसच सुन्याभाऊने खास घरातून बनवून आणलेले पवित्र खाद्य अगदीच स्वादिष्ट आणि रुचकर होते. शाहाकारी, मांसाहारी असे दोन  गट पडले आणि १० - २० मिनिटाच्या हात घाईच्या लढाईत दिल्लीत  काँग्रेस बीजेपी चा सुफडा साफ व्हावा तसा  त्या मटण भाकरीची दाणादाण उडवली पोरांनी.
थोड्याफार चांदण्या मोजून कुंभकर्णीय थाटात सर्वजण निद्रावंत झालेले  ते निरागस चेहरे सकाळी (??) २ ला उठवले गेले. अत्यंत वेगात आन्हिक आवरून. खानेसुमारी झाली, ओळखी पाळखीचा शास्त्रमार्ग पार पडून सुरक्षा साधनेची ओळख करून झाली व हार्नेस अडकवून बोराटयाकडे रवाना झालोही.
ibn लोकमत ची टीम हि यावेळीच लिंगाणाचे शूट करायला आलेली ते लोक पुढे गेलेले नाळेच्या शेवटीच्या टप्प्यात आम्हाला ते भेटले . आता हि दगड धोंडयांची बोराटीची नाळ पार करून आम्ही लिंगाणा व रायलिंग ला विभागणाऱ्या खिंडीत आलो पहाटेचे ५ वाजलेले. निखिल आणि आलेख ने रोप फिक्स केलेलाच सर सर सर्व मावळे कातळाला भिडले, सुरवातीला काही ठिकाणी मातीचा प्रचंड घसारा व घडी चढण त्यामुळे वेग मंदावला, घसरणाऱ्या हाता पायांना सांभाळत एका सरळसोट काळाला येऊन भिडलो . प्रत्यक्ष लिंगाण्याच्या  चढाईला लागलेलो. हाच तो लिंगाणा ज्याने गेल्या २ वर्षांपासून मला हुलकावन्नी दिलेली. राजगड  ते रायगड अग्याच्या नळीने जाताना उजवीकडे लिंगाण्याचा हाच तो सुळका खुणावत होता. पुढच्या वारीत हे आव्हान पेलू असं म्हणून समजूत काढलेलीच, त्या नन्तर बोराटीच्या नाळेने  जाताना तर चक्क लिंगाण्याच्या  पायथ्यावरुन  गेलेलो त्याही नंतर एकदा रायगड ते राजगड करतानाही लिगांणा खुणावू लागलेला पण शक्य नव्हते ते.
आता मात्र मी या बहुप्रतीक्षित , अत्यन्त आवाहनात्मक अशा या किल्ल्याला गवसणी घालणार होतो. लिंगाणा करायचा तर हाती अद्ययावत सुरक्षा साधन सामग्री हवी. ३००० फूट उंचीच्या या किल्ल्याचा ९०० फूट भाग हा ९० अंशात उभा आहे त्यामुळे रोप शिवाय चढाई अशक्य. !! सह्याद्रीतील सर्वात कठीण अशी बिरुदावली मिरवणारा इतिहासातील मृत्युदंडाची शिक्षा देणारा हा कारागृहि  किल्ला.
पहाटेची चढाई 

                        सवजण जोमात होते तांबडं फुटायला आम्ही पहिल्या टप्प्यावर म्हणजेच गुहे पाशी पोहचलो इथे उजव्या बाजूला अंदाजे ४० फूट गेल्यावर एक गुहा लागते (अंतर अंदाजे आहे नाही तर काही  मंडळी टेप घेऊन उभी राहतील ) मस्त अराम करू शकतो, राहू शकतो इथे.  गुहेतून समोर सरायलिंग पठार तर डावीकडे कोकणदिवा व  थेट कुर्डुगडापर्यंतचा परिसर न्यहाळू शकतो आपण. गुहेच्या मागच्या  बाजूला जरा पुढे पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत हा किल्ल्यावरील एकमेव पाण्याचा स्रोत.
अर्ध्यावर पोहचलेला चमू 

इथे जरा अराम केला सर्वजण पोचल्याची खात्री करून वरील चढाई सुरु केली. हार्नेस आणि त्याला जोडलेला सेल्फ अँकर अगदी ट्रेक संपेपर्यंत रोप पासून वेगळा राहणार नाही याची काळजी घेत climb सुरु ठेवायचा.
लिंगाणा हा किल्ला इतर किल्ल्याप्रमाणे सरळमार्गी नसून हा एक सुळका आहे, त्यामुळे तांत्रिक सुरक्षा साधने घेऊन अनुभवी लोकांच्या सोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगाणा ट्रेक करावा. इथून पुढे सरळ उभ्या कातळ भिंती चढत जावे लागणार होते त्यामुळे सर्व सुरक्षा साधने पक्की करून एक एक जण कातळ भिंतीला बिलगला.
हळू हळू एक एक अवघड टप्पे पार पाडत आम्ही ११ च्या दरम्यान माथ्यावर पोहचलो च... !!!!!
शेवटचा बॅक एन्ड सांभाळणारा लीडर आला. आता सर्वजण माथ्यावर पोहचले. आम्ही लिंगाणा किल्ल्यावर, त्या अरुंद गडमाथ्यावर एका ईच्छा पूर्तीची अनुभूती घेत आहोत. सर्व मित्रमंडळ हर्षोल्लाशीत झालेले आहे. समोर रायगड दिसतोय , काळ नदीचं खोरं, दूरवर दापोली  गाव, दूरवर कोकणपट्टा  न्याहळता येतोय. एक ग्रुप फोटो आला आणि पुन्हा शिदोऱ्या सोडल्या गेल्या.  येथेच्छ ताव मारला. 
गड माथा 
लिंगाणा समिट 

            एप्रिल चा पहिला आठवडा त्यामुळे उन्हाचा पारा  चढलेला. उन्ह वाढायच्या आधी उतरणीला लागलो. उतरण बरीचशी रॅप्पेल्लिंग करून उतरावे लागते त्यामुळे एक वेळी एक च बहाद्दर. प्रतीक्षायादीतील सदस्य उन्हाने करपू लागले. पण काय करणार ? सांगणार कोणाला ? ऐकणार कोण ? सह्याद्रीच दर्शन हवंय  तर अशा प्रसादाची तयारी ठेवावीच लागते. 

एक दोन टप्पे उतरून गुहेपाशी आलो इथे अजून एक ग्रुप रॅपलिंग करत होता त्यामुळे मोठ्ठं  वेटिंग पडलं. पोरं पहुडली . जागा मिळेल तस स्वतःला अँकर करून बसल्या जागी निद्रादेवीची आराधना करू लागले.

साहसी स्वप्ने पाहणाऱ्यांची साहसी झोप 
काहींनी गुहेत जागा मिळवली 

या फोटोत आपल्याला न्युज १८ लोकमत वृत्त समूहाच्या निवेदिका स्नेहल पाटकर दिसत आहेत. त्यांचे  थरार लिंगाण्याचा  एपिसोड साठी शूट चालू होते. त्यांचीही  भेट त्यानिमित्ताने झाली. 

आता उतरणीचा मार्ग मोकळा झालेला. सर्वजण पटापट तयार झाले.  एक एक जण दोरीवर स्वर झाला, क्षणार्धात सर्वजण पायथ्याला दाखल झाले. सर्वांच्या हातून नकळत पणे एक दिव्य पार पडले गेले होते. एक वेगळंच समाधान डोक्यात ठेऊन पटापट सर्व सुरक्षा साधने उतरवून ती एकत्र केली रोप ची कोईल केली .कॅराबिनर, डिसेंडर , झुमार. हेल्मेट्स, टेप स्लिंग्ज. हार्नेस इ साहित्य व्यवस्थित हॅवर सॅक मध्ये भरले आणि मोहरीकडे कूच केली . बोराट्याची नाळ चढण्याचा एक अतिकंटाळवाणं काम बाकी होत. २ तासात तेही झालं आणि दिवेलागणीला मोहरीच्या दाखल. आता सर्वानी गाड्या स्टार्ट केल्या धुरळा उडवीत पुण्याच्या दिशेने सर्वांजण दिशेनाशी झाली 



------------------------------------------------------------------------------------------------------------------------

यानंतर ULTIMATE HIKERS & TRAVELLERS च्या नेतृत्वाखाली काही शाळकरी मुलांना घेऊन लिंगाणा ते रायगड हा ट्रेक आपण पूर्ण केला त्याबद्दल - 


लिंगाणा म्हंटल की काळजात धडकी भरवणारा किल्ला !
माळीनगर च्या शाळेतील मुलांनी मात्र हा किल्ला करण्याचा चंग बांधला. मी त्यांना यातील धोके समजावून संगीतलेही तरीही चिमुकले मागे हटायला तयार नाहीत. मग आम्ही ठरवलं च या लहानग्यांना ही लिंगण्यावर चढवूया च.
ठरलं. लिंगाणा ते रायगड.
आमची टीम BMC सर्टीफाईड व गाढा अनुभव असणारी टीम असल्याने शिक्षकही निर्धास्त होते.
सर्व मुलाना नीट सूचना व साहित्याची ओळख करून दिली. मुलांनी याआधी माझ्यासोबत 15 ते 20 किल्ले केलेले असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढलेला होताच.
भल्या पहाटे चढाई सूरु केली. दुपारपर्यंत लिंगाण्यावर भगवा फडकवून बोराट्याची अवघड अशी नाळ उतरून सायंकाळी रायगड पायथ्याशी मुक्काम केला.
मित्रांनो सकाळी लिंगाणा व त्याच दिवशी रायगड ला पोहचणे तेही बोराट्याच्या नाळीने 5 वि सहावीच्या पोरांना घेऊन साधी गोष्ट नव्हती.
प्रचंड शारीरिक क्षमतेची गरज होती पण या ultimate च्या शाळेत तयार झालेल्या मुलांनी याही रेंजट्रेक चे आव्हान लीलया पेललं..
त्यांच्या या साहसाचे कौतुक करून tv वर त्याची बातमी लावल्याबद्दल आणि तेही शिवजयंती दिवशी त्यामुळे आम्ही सर्व #न्युज18लोकमत चे
आपले आभारी आहोत.
बातमीचा विडिओ खाली दिला आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

धन्यवाद 

🔸रात्रीचा माणिकगड🔸

 🔸रात्रीचा  माणिकगड🔸

 माणिकगड म्हटल की त्या किल्ल्यावर वळसा मारुन  जाणारी पायवाट आणि मुख्य वाटेला फुटलेल्या अनेक छोट्या छोट्या वाटा.त्यामुळे ह्या किल्ल्यावर जाताना बरोबर गावातील एखादा वाटाडया नसेल तर दिवसादेखील चढ़ाई करण तस जोखमीचच काम.

अश्या ह्या माणिकगडावर आपला  अल्टीमेट हायकर्स  ग्रुप ११ जणांना  घेऊन  रात्रीची चढ़ाई करण्यास सज्ज झाला होता.नियोजीत वेळेनुसार वाशिवली ते ठाकुरवाड़ी(आदिवाशी पाडा) हा पहिला टप्पा पार करुण आम्ही सगळे 'मधु' काकांच्या घरी जेवणाच्या वेळेत पोहचलो. अंगणामध्ये बसून गरमागरम वरणभात,वाटाणा व शेवग्याच्या शेंगांची भाजी,पापड,लोणच अस परीपूर्ण शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतला. ह्या दिवसात गडावर पिण्यायोग्य पाणी नसल्याने 'मधु' काकांच्या घरुण उद्या दुपारपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा घेवून पुढील प्रवासासाठी सज्ज मोर्चे बांधणी झाली .
    काळ्याकुट्ट अंधाराला चिरत टॉर्चच्या प्रकाशात आम्ही सगळे किल्ल्याच्या दिशेने निघालो.आमचा वाटाडया म्हणजे आमचा मित्र 'समीर पार्टे' हा लीड करत होता.आणि त्याच्या मागे आम्ही सगळे तो नेईल तिकडे निघालो होतो.तर आमचा लीडर 'योगेश' हा back support करत होता. गप्पागोष्टी करत दीड तास सपाटीवरुण चालत आम्ही सगळे 'हनुमान' मंदिराजवळ येवून पोहचलो. इथे एक पंधरा मिनिटाचा आराम  घेतला.
         आता इथून पुढे क्षमतेचा कस पाहणारा खडया चढणीचा घाटरस्ता आपल्याला चढायला लागतो . घनदाट जंगलातून जाणारी ही पायवाट क्षणाक्षणाला आपल्याला धापा टाकायला मजबूर करते. काही वेळातच  इथून घनदाट जंगल सोडून गडाच्या मुख्य दरवाज्यापाशी येवून पोहचलो कधी ते बोलण्याच्या ओघात कळलच नाही   (दरवाज्याचे फक्त अवशेष शिल्लक आहेत). आता इथे क्षणभर विश्रांती घ्यायच अस ठरल. सगळे फारच थकले होते आणि डोळ्यांवर झोप सुद्धा होती त्यामुळे सगळे शांत बसले होते. आणि अचानक अवकाशात लालबूंद चंद्रकोरेच दर्शन घडल. ते विलोभनीय दृश्य पाहून सगळ्यांचीच झोप उडाली त्या भयान शांततेत जल्लोष सुरु झाला.मागे गडसुद्धा चंद्रप्रकाशाने न्हाऊन निघाला होता. ते सगळ दृश्य कॅमेरामध्ये कैद करण्यात आणि सगळ्या आठवणी मनामध्ये साठवण्यात अर्धा तास कधी निघुन गेला कळलाच नाही. आणि मग त्या भग्न दरवाज्यातुन आम्ही गडावर प्रवेश केला. चंद्रप्रकाशात गडाचे काही अवशेष पाहत पाहत चुण्याच्या घाण्याजवळ येवून पोहचलो.येथून थोडयाच अंतरावर असलेल्या गणेश दरवाज्याच्या कमाणीतून आम्ही बालेकिल्ल्यावर पाय ठेवला.आणि एका सपाट जागेवर बैगा टाकून सुटकेचा निश्वास सोडला..
             आता सुरु झाली camping ची तयारी दोन बाजूला दोन tent लावून दोन tentच्या मध्ये उरले बाकी सगळे मोकळ्या आकाशाखाली झोपायचं अस ठरल; ठरल्याप्रमाणे सगळी तयारी झाली. आता कमी होती फक्त शेकोटीची.मग काय 'महेश,समीर,योगेश' आणि मी लाकड़ आणण्यासाठी निघालो. त्या निमित्ताने चंद्रप्रकाशात गडफेरी झाली, आणि सकाळ पर्यंत पुरतील एवढी लाकड़ सुद्धा गोळा केली. सह्याद्रीचा गार वारा अंगाला बोचत होता.त्या थंडीपासून थोड़ा बचाव म्हणून शेकोटिच नियोजन. शेकोटी  आता चांगलीच पेटली होती आणि भोवती बसून गप्पांचे फड सुद्धा रंगले होते. साथीला 'सैराट' सिनेमाची अफलातून गाणी आणि my favorite किशोर कुमार आह्ह..आणि मग हळूहळू एकएकाने पाठ टेकायला सुरुवात केली. आता उरलो फक्त आम्ही दोघे 'योगेश आणि मी' मग सुरु झाली star gazing photography. त्या अफलातून photography मध्ये एवढे रंगून गेलो की पाच कधी वाजले काही कळलेच नाही. शेवटी साखरझोप अनावर झाली; मग पहाटे पाच वाजता जाऊन tentमध्ये पाठ टेकली पडल्या पडल्या गाढ झोपी गेलो.तोच सहाच्या ठोक्याला योगेशने आम्हा सगळ्यांना उठवले. डोळे चोळत उठलो आणि tentच्या बाहेरच दृश्य पाहुन आच्छर्यचकीत झालो..

                 कड्यांमधून  कापूस पिंजल्यासारखे पांढरयाशुभ्र ढगांचे लोट वाहत होते;संपुर्ण गडावर धुक्याची चादर पसरली होती. Camera उचलून आम्ही सगळे पुन्हा गडफेरिस निघालो.आणि थोड्याच वेळात पूर्वेकडून गुलाबी रंगाच्या छटा आकाशात उमटु लागल्या मग काही क्षणातच दिनकररावांच् विलोभनिय दृश्य नजरेत पडल खाली पांढरयाशुभ्र ढगांचे थर आणि त्यावर सोनेरी किरणांसहित दिनकररावांच् आगमन.
 हळूहळू पांढऱ्याशुभ्र ढगांचे ते थर सूर्यप्रकाशाने निव्वळत गेले आणि मग त्या मागील डोंगररांग स्पष्ट दिसू लागली. एकाच जागी उभे राहून  तुंग,तिकोना,लोहगड,कोरिगड,तैलबैला,सांकशीचा किल्ला,कर्नाळा,प्रबळगड,कलावंतीन,इरशाळगड,गणेश कार्तिक सुळके आणि माथेरानच पठार हा एवढा परिसर स्वतःभोवती मारलेल्या गोल फेरीत न्हाळता आला.

 संपुर्ण गडफेरी करुण पुन्हा tent जवळ आलो बरोबर आणलेला सुखा खाऊचा नाश्ता आणि मंद आचेवर भाजलेले पापड खाऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात कली.सकाळाच् कोवळ ऊन अंगावर घेत आणि गप्पागोष्टी करत 2 तासात आपण ठाकुर वाडीत येऊन पोहचतो.


इकडे मधुकाकांच्या घरी आपल्या नाश्त्याची लगबग सुरु आहे. लगेचच मधुकाकांनी पोहयाची प्लेट आणि चहाचा कप हातामध्ये टेकवला अंगनामध्ये बसून गरमागरम पोहे आणि चहा घेऊन आम्ही भेट घेतली मधुकाकांच्या घरच्या लोकांची.सह्याद्रि म्हणजे जगण्याची उमेद..
सह्याद्रि हा माणसाला कस जगायच हे शिकवतो याच उत्तम उदाहरण मधुकाकांच्या आईच्या रुपात आपल्याला पाहायला मिळत.१०४ वर्षाच्या ह्या आजीबाई एखाद्या तरुणाला लाजवेल अश्या attitude ने घरभर वावरत होत्या

आणि सगळ्यात महत्त्वाच् त्यांची दांडगी स्मरणशक्ति  मागच्या वेळेस आपल्या ग्रुपचे काही मेंबर्स माणिकगडावर आले त्यावेळी ते आजीला भेटले आणि तिचे फ़ोटो देखील काढले तीच फ़ोटोफ्रेम आजीला ह्यावेळी सदिच्छा भेट व  आठवण भेट म्हणून दिली.

आजीने सगळ्यांना ओळखल होत सगळ्यांची विचारपुस केली हा सगळा प्रकार पाहुन आम्ही थक्क झालो. तिच्या पायाला स्पर्श करुण धन्य झालो तिने मायेने गालावरून हात फिरवला तिच्या स्पर्शाने अक्षरशा अंगावर काटा आला.।
आता वेळ झाली होती निघायची काकांचा निरोप घेऊन निघालोच तोच गावाच्या वेशीवर एक दृश्य दिसलं.
एका पाण्याच्या टाकीवर शेकडो कळश्या घेऊन बाया बापड्या जमलेल्या आश्चर्य म्हणजे रात्री ज्या लग्नाच्या वरातीचा आवाज येत होता त्याच लग्नाची नाव वधू सुद्धा पाणी भरायला आलेली अजून हळद पण गेली नव्हती. सध्यस्तिथिच ते बोलकं उदाहरण होत. दुष्काळ अगदी इथपर्यंत पोहचलाय. आज पाणी वाचवलं नाही तर उद्या आपल्याला पाण्याच्या शोधत दिवसातील महत्वाचा वेळ वाया घालवावा लागला तर नवल वाटू नये.

लेखन - समीर शिर्के 

Saturday, 21 March 2020

काश्मीर 370 आधी आणि नंतर.




काश्मीर 370 आधी आणि नंतर.

370 कधी घटनेत घातलं गेले का अस्तित्वात आलेहे एव्हाना सर्वांना माहिती झालेच असेल. 370कलम काय होते तर सोप्या भाषेत सांगायचे झाले तर भारतीय संविधानापासून अलिप्त 

ठेऊन काश्मीर ची स्वायत्तता टिकून ठेवणारे कलमभारतीय संविधानानुसार भारत सुरक्षा
दळणवळण ,आणि परराष्ट्र व्यवहार गोष्टीच काश्मीरमध्ये करू शकत होता.
आणि सोबतच काश्मीर च्या वेगळ्या घटनेला मान्यता ही 370 कलम देत होतेआणि यात मेख अशी होती की 370 कलम हटवायला जम्मू काश्मीर विधानसभेत चर्चा आणि मान्यता
 मिळाल्याशिवाय संसद हे कलम हटवू शकत नव्हते.आणि जम्मू काश्मीर विधानसभा हे कधीच होऊ देणार नाहीत्यामुळे काश्मिरी नेते अतिआत्मविश्वासात होते की मोदी 10 वेळा pm झाला तरी 370 ला स्पर्श पण करू शकत नाही.आता भाजप पूर्ण बहुमताने सत्तेत आलेले आणि
 जाहीरनाम्यातही ही गोष्ट होतीचत्यामुळे गेल्या पंचवार्षिक पासून  यावर विचारविनिमय चालू असणारच आहे कारण हे कलम हटवणे रात्री  शक्य नाही.त्यामुळे हा निर्णय आत्ता झाला असला तरी तयारी खूप आधीपासूनच असावी असं दिसतंययातील लक्षात घेतलं तर खूप
 गोष्टी उघड होत आहेत.सर्वात मोठा अडसर होता काश्मीर विधानसभात्रिशंकू झालेली
 विधानसभा सभा दुसरा कोणी जाण्याआधी स्वतः सत्तेत जाऊन मेहबुबा ला CM केलंअचानक
 सहभाग काढून घेतल्यामुळे सरकार पडलंआणि मेहबुबा मुफ्ती यांनी (PDP) कट्टर विरोधी
 भाजप शी हातमिळवणी केल्याने अब्दुल्ला (NC) आणि काँग्रेस ने PDP सोबत जाणे टाळले
आणि हेच भापज ला अपेक्षित असावेत्यामुळे आपोआप राष्ट्रपतीराजवट लागू झाली आणि
 राज्य राष्ट्रपती च्या ताब्यात गेलेआता विधानसभा विसर्जित झाली होती त्यामुळे 
विधानसभेचे सर्व अधिकार संसदेला आलेलेयादरम्यानच बऱ्याच हालचाली झाल्या असणार आणि विधेयक राष्ट्रपतीकडून मंजूरही केलं गेलं.आता अजून एक तिढा असा होता की राज्य 
तसेच ठेऊन फक्त कलम हटवणे कायदेशीररित्या किचकट आणि हिंसाचाराला खतपाणी 
घालणार ठरलं असतं.यावर उपाय म्हणून अमित शाह ने 'ना राहेगा बास ना बजेगी बासुरीया
 तत्वावर जो तोडगा काढलाय त्याला तोड नाहीराज्य  नाही तर कलम कुठं लावणार 😃

काश्मीर 370 नंतर -आता काश्मीर 2 भागात विभागले गेले पण काश्मीर आता राज्य राहील नाहीये UT मध्ये

 विभागले गेलेम्हणजे राज्य  नाही तर 35A आणि 370 ची गरज  उरत नाहीआणि दोन्ही 
सभागृहात हा ठराव 125 विरुद्ध 61 असा जिंकल्याने निर्णयाला घटनात्मक अधिष्ठान प्राप्त
 झाले.आता काश्मीर ची घटना आपसूकच बेकायदेशीर झाली त्यामुळे काश्मीर ध्वज ही 
बरखास्त झाला.त्यामुळे काश्मीर मध्ये कालपासून खऱ्या अर्थाने भारतीय संविधान लागू झाले आधी कश्मिरी जनतेला कोणत्याच घटनेचाकायद्याचा लाभ लागू होत नव्हतापण आता 
होणार आहेट्रिपल तलाक कायदा भारतात झाला असला तरी तो काश्मीर मध्ये नव्हता . 
कालपासून तेथेही लागू झाला.


आता पुढे काय होऊ शकते ते पाहू-जम्मू काश्मीर आणि लडाख केंद्रशासित झालेपण जम्मू काश्मीर ला दिल्ली सारखी

 विधानसभा असणार आहे.म्हणजे काश्मीर चे नेते काश्मीर चे प्रतिनिधित्व दिल्लीत करणार 
आहेत.लडाख मात्र पूर्ण पणे केंद्रशासित असेललडाख ची 20 वर्षांपासून ची ती मागणी होतीच.
 देशातील सर्वात मोठा जिल्हा लेह आता केंद्रशासित असेल.सोबत कारगिल जिल्हाही असेल
सव्वा लक्ष लोकसंख्या असलेल्या कारगिल जिल्ह्याच तस मत कधीच विचारत घेतलं गेले नाही.काश्मीर  भावनिक नुकसान म्हणजे आता दोन्ही खोऱ्यात सर्व सरकारी यंत्रणा बदलून भारत सरकार च्या अखत्यारीत येणार आहेत.

govt of JnK 
च्या जागी govt of India हा स्टॅम्प पाहणे काही दिवस काश्मिरी लोकांना जड जाईलपण जस जसे फायदे मिळत जातील तस तस विरोध सौम्य होईल.पण तूर्तास काही महिने वातावरण तणावपूर्ण राहणार .आणि अमित शाह यांनी काल संसदेत क्लिअर केलंय की जर येत्या काही वर्षात काश्मीर शांत झाले तर पुन्हा राज्य म्हणून दर्जा देण्यात येईलपण तेव्हा ते एक भारतीय राज्य असेल 35A, 370 असे कोणत्याही कलमाविना असेल.काल पाकिस्तान ने व्यक्त केलेली भीती रास्त  आहेजम्मू काश्मीर मध्ये हिंदू लोकसंख्या वाढू शकते.आणि हे खरेच आहे विस्थापित लोक पुन्हा 

आपल्या भागात जाणे गैर नाहीआणि त्याचा परिणाम म्हणजे जम्मू भागात मतदार संघ 
वाढवावे लागणार , आणि आपसूकच जम्मु भागातील आमदार हे हिंदू बहुसंख्य असू शकतात आणि त्या संख्याबळाच्या आधारे जम्मू काश्मीर चा मुख्यमंत्री गैरमुस्लिम होऊ शकतो ते
 काश्मीर आणि पाक ला कधीही खपणारे नाही पण राजकारणाचा भाग म्हणून त्या दिशेने 
नक्कीच पाऊले टाकली जाणारच.!

या सर्व निकालात केंद्राला आर्थिक फायदा नक्कीच आहे.तो कसा ते पाहू -सर्वात महत्त्वाचे म्हणजे काश्मीर ची राजधानी श्रीनगर आणि जम्मू या दोन आहेतश्रीनगर
 उन्हाळी राजधानी श्रीनगर आणि हिवाळी राजधानी जम्मू.दर 6 महिन्यांनी राजधानी 
हलवण्याची प्रोसेस आणि मॅनपॉवर यावर केंद्राला अवाढव्य खर्च करावा लागतो.तो वाचला.
 विशेष राज्य दर्जा मूळे दरवर्षी करोडो रुपये मदत निधी द्यावा लागायचा  बदल्यात या 
राज्याकडून काहीही उत्पन्न केंद्राला मिळत नसेआता जे के विशेष राज्य राहिले नाही
.निमलष्करी दलावर काश्मीर मध्ये अवाढव्य खर्च होत होता काश्मीर मध्ये शांतता नांदली
 तर सैन्य कपात होऊ शकते.अजून एक फायदा म्हणजे काश्मीर खोऱ्यात असणाऱ्या आपल्या 
सैन्याना jnk सरकार कडून नेहमी  परके पणाची वागणूक मिळत असेआता तिथून jnk सरकार हद्दपार झालेलं असेलत्यामुळे दगडफेकदंगा असल्या राज्य पुरस्कृत घटनांना थारा नसेल.
दहशतवाद संपला म्हणू शकत नाही पण बेमालूम पणे होणारी रसद तुटली जाणार हे नक्कीच.या

 निर्णयाचे आंतरराष्ट्रीय महत्त्व पाहू-पाहिले म्हणजे पाकिस्थान चा खूप तीळ पापड झाला आहे.पण सध्याची पाक ची स्थिती वाईट आहेपाक सरळ कोणतीही अकॅशन घेऊ शकत नाहीआणि काहीही अकॅशन नाही घेतली तर 
काश्मिरी आणि पाकिस्तानी जनतेच्या मनातील पाक ची क्रेडीबलिटी कमी होणार.दुसरी गोष्ट पाक युनो मध्ये जाऊ शकतोतिथेही पाक चे काहीही चालणार नाही याची दक्षता आधीच घेतली गेली असणार आहेकारण मागील काही काळात परदेश दौरे आणि संबंध यात बऱ्याच घडामोडी घडलेत.आता पूर्ण काश्मीर अधिकृत भारताचा भाग झाल्याने काश्मीर मधील कोणतीही सैनिकी कारवाई हा भारताचा अंतर्गत विषय होणार आणि पाक त्याबद्दल कुठेही दाद मागू शकत नाही
दुसरी गोष्ट काश्मीर च्या सीमेवर पाक ने काढलेली कुरापत ही भारत भूमीवरील अधिकृत 
आक्रमण ठरून युध्दसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि भारताकडून मोठ्या कारवाईला कोणीही रोखू शकत नाहीत्यामुळे पाक सैन्य आता औकातीत राहणार यात शंका नाही.तिसरी गोष्ट अशी की जर या निर्णयामुळे अपेक्षित शांतता प्रस्थापित झाली तर काश्मीर विषय 
पूर्ण पणे मिटला अस गृहीत धरले जाईल आणि युनो मध्ये भारताचं वजन वाढलेलं असेलत्याचा फायदा aksai चीन विषयावर चर्चा होईल आणि पाकव्याप्त काश्मीर मधून जाणाराआ चीन चा CPEC या प्रोजेक्ट वर दबाव आणण्यास भारताला मदत नक्कीच होईल.अर्थात याबद्दल 
येणारा काळ  बोलेल.अजूनही बरेच राजकीय आणि भौगोलिक विषय लिहता येतील पण ते 
अजून गुंतागुंतीचे आहेत.तूर्तास एवढेच.लेखनसींमा!!

-
योगेश आलेकरी

९७०२५२५४३५
(मी कोणताही अभ्यासक नाही काश्मीर ला येता जाता निरीक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे हा लेख लिहलाआहेअभ्यासकांना दुरुस्तीला वाव आहेस्वागत असेल)













Lords - The revenge

                Lords - the revenge             तब्बल 2 महिने बाईक चालवून मी लंडन ला पोहचलो. 2 दिवस स्थिरस्थावर झाल्यावर मी लगेचच लॉर्ड क्रि...