लिंगाण्याचा समाचार

लिंगाण्याचा समाचार
लिंगाणा !!!
सह्याद्रीतील एक अजब रसायन. या एका शब्दाची व्याप्ती तोच जाणू शकतो ज्याने सह्याद्रीत पोटभर भटकंती केलीय आणि डोकंभर मराठ्यांच्या  इतिहासाचा अभ्यास केलाय. त्यास अधिक सांगणे न लगे. एक मानबिंदूच. प्रत्येक ट्रेकर चे स्वप्न असतंच एकदातरी लिंगाण्याच्या माथ्यावर पाय ठेवावा. तास हि माझ हि होतच परवाच ते सत्यात उतरलं... ! लिंगाण्याची  अभेद्यता पाहावी ती रायलिंग वरून व रायगडाची भव्यता पहावी ती लिंगाण्यावरून च. असा हा मोक्याच्या जागी उठवलेला गगनचुंबी अभेद्य सुळका वजा किल्ला, किल्ले लिंगाणा _/\_
TEAM ULTIMATE

_________________________________________________________________________________

हा तर झालं असं कि १७ मार्च २०१७ ला गंगटोक च्या MG रोड वर फेरफटका मारत असतानाच विषांत चा फोन आला ९ एप्रिल २०१७  रोजी देवा घाणेकर च्या नेतृत्वाखाली आग्याबॉईज मंडळ लिंगाणा करतंय आणि तुला यायला लागतंय. आता लिंगाणा ट्रेक ला नकार देण्याएवढं धाडस माझ्या अंगी नसल्याने आपसूकच कोणत्याही विचारांती होकार गेला. आणि मी ही ३ एप्रिलला महाराष्ट्रात पोहोचत होतो.

गंगटोक च्या MG  मार्गावरून 

झालं !
आलो....
४ दिवस अराम पण झाला, आणि तो दिवस उजाडला. आम्ही चौघे दोन फटफटी घेऊन मोहरीच्या दिशेने दौडू लागलो. प्रचंड ऊन, कमालीची वाहतूक कोंडी यामुळे पोहचायला वेळ लागणार होता म्हणून नसरापूर ला थांबलेलं मंडळ आमची वाट बघून चालू पडलं. आम्ही मग चिंचवड ला  संजू दादा ची धावती भेट घेऊन एक एक मस्तानी खाऊन वाऱ्यावर स्वार झालो. अपेक्षेप्रमाणे एकालदऱ्यात मावळतीला हजर झाल्याने रागडाच्या साक्षीने मनसोक्त फोटो झाले. एक्कलदारा हे एक माझ्या आवडतीतलं ठिकाण.  गुंजन मावळातून कोकणात उतरायचं प्रवेश स्वर च जणू.. पाठीमागे प्रचंडगड उर्फ तोरणा , तर दोन्ही बाजूला मोहरी केळद डोंगररांगेच्या २ बुटक्या टेकड्या, डावीकडे दूरवर मढे घाट व शेवत्या घाटाची पुढे सुटलेली नाकाडे  तर समोर वीरा  नदी व तिच्या तोंडाला असणारी अग्याची नाळ तर दूरवर स्थितप्रद्न्य असा दुर्गदुर्गेश्वर रायगड आपला अवाढव्य विस्तार पसरवून पहुडलेला. जरासे उजवीकडे सिंगापूर नाळे पलीकडे आपला लाडका लिंगाणा मान वर करून या संपूर्ण साह्य मंडळावर निरंकुश वर्चस्व राखून उभा दिसतो , तर त्यापलीकडे पुसटसा कोकणदिवा आपलं सर्वोच्च टोक संभाळत लिंगाण्याकडे कौतुकाने पाहतॊय असं भासतं. असं हे  एक्कलदारा पुराण !!

फोटो सेशन 

_________________________________________________________________________________

संधीप्रकाशात पुन्हा गाड्या सुरु झाल्या... आता काहीच वेळच मोहरीच्या दाखल होणार होतो. झालोही.
मित्र मंडळी भेटली,  गप्पाचे फॅड रंगू लागलेलं तोच विषांत ने आवाज दिला चहापान करू मग बोलू !!
झालं !! चहापानाचा कार्यक्रम जोशात आटोपला.. देवा ने तर भन्नाट सरप्राईझ दिले गेल्या गेल्याच 'विश्वस्त' हि वसंत लिमये लिखित कादंबरी एक महिन्यचा प्रवास करून आल्याबद्दल गिफ्ट दिली.. हरकून गेलो बहरून गेलो, आनंदून गेलो..

देवा घाणेकर ने दिलेलं गिफ्ट (त्याने फोटो काढल्यामुळे तो फ्रेम मध्ये नाही )

आता उघड्या आकाशाखाली मस्त गप्पांची मेहफिल रंगलेली . आमच्या मेघालयातील गमती जमती,, गुहेचे चित्त थरारक अनुभव यामध्ये पोरं चांगलीच गुंग झालेली.
सोबतच bike ride चेही अनुभव कथनाचा  झाला व जेवणाचे डब्बे काढून येथेच्छ असा ताव मारला, कारण हि तसच सुन्याभाऊने खास घरातून बनवून आणलेले पवित्र खाद्य अगदीच स्वादिष्ट आणि रुचकर होते. शाहाकारी, मांसाहारी असे दोन  गट पडले आणि १० - २० मिनिटाच्या हात घाईच्या लढाईत दिल्लीत  काँग्रेस बीजेपी चा सुफडा साफ व्हावा तसा  त्या मटण भाकरीची दाणादाण उडवली पोरांनी.
थोड्याफार चांदण्या मोजून कुंभकर्णीय थाटात सर्वजण निद्रावंत झालेले  ते निरागस चेहरे सकाळी (??) २ ला उठवले गेले. अत्यंत वेगात आन्हिक आवरून. खानेसुमारी झाली, ओळखी पाळखीचा शास्त्रमार्ग पार पडून सुरक्षा साधनेची ओळख करून झाली व हार्नेस अडकवून बोराटयाकडे रवाना झालोही.
ibn लोकमत ची टीम हि यावेळीच लिंगाणाचे शूट करायला आलेली ते लोक पुढे गेलेले नाळेच्या शेवटीच्या टप्प्यात आम्हाला ते भेटले . आता हि दगड धोंडयांची बोराटीची नाळ पार करून आम्ही लिंगाणा व रायलिंग ला विभागणाऱ्या खिंडीत आलो पहाटेचे ५ वाजलेले. निखिल आणि आलेख ने रोप फिक्स केलेलाच सर सर सर्व मावळे कातळाला भिडले, सुरवातीला काही ठिकाणी मातीचा प्रचंड घसारा व घडी चढण त्यामुळे वेग मंदावला, घसरणाऱ्या हाता पायांना सांभाळत एका सरळसोट काळाला येऊन भिडलो . प्रत्यक्ष लिंगाण्याच्या  चढाईला लागलेलो. हाच तो लिंगाणा ज्याने गेल्या २ वर्षांपासून मला हुलकावन्नी दिलेली. राजगड  ते रायगड अग्याच्या नळीने जाताना उजवीकडे लिंगाण्याचा हाच तो सुळका खुणावत होता. पुढच्या वारीत हे आव्हान पेलू असं म्हणून समजूत काढलेलीच, त्या नन्तर बोराटीच्या नाळेने  जाताना तर चक्क लिंगाण्याच्या  पायथ्यावरुन  गेलेलो त्याही नंतर एकदा रायगड ते राजगड करतानाही लिगांणा खुणावू लागलेला पण शक्य नव्हते ते.
आता मात्र मी या बहुप्रतीक्षित , अत्यन्त आवाहनात्मक अशा या किल्ल्याला गवसणी घालणार होतो. लिंगाणा करायचा तर हाती अद्ययावत सुरक्षा साधन सामग्री हवी. ३००० फूट उंचीच्या या किल्ल्याचा ९०० फूट भाग हा ९० अंशात उभा आहे त्यामुळे रोप शिवाय चढाई अशक्य. !! सह्याद्रीतील सर्वात कठीण अशी बिरुदावली मिरवणारा इतिहासातील मृत्युदंडाची शिक्षा देणारा हा कारागृहि  किल्ला.
पहाटेची चढाई 

                        सवजण जोमात होते तांबडं फुटायला आम्ही पहिल्या टप्प्यावर म्हणजेच गुहे पाशी पोहचलो इथे उजव्या बाजूला अंदाजे ४० फूट गेल्यावर एक गुहा लागते (अंतर अंदाजे आहे नाही तर काही  मंडळी टेप घेऊन उभी राहतील ) मस्त अराम करू शकतो, राहू शकतो इथे.  गुहेतून समोर सरायलिंग पठार तर डावीकडे कोकणदिवा व  थेट कुर्डुगडापर्यंतचा परिसर न्यहाळू शकतो आपण. गुहेच्या मागच्या  बाजूला जरा पुढे पिण्याच्या पाण्याची टाकी आहेत हा किल्ल्यावरील एकमेव पाण्याचा स्रोत.
अर्ध्यावर पोहचलेला चमू 

इथे जरा अराम केला सर्वजण पोचल्याची खात्री करून वरील चढाई सुरु केली. हार्नेस आणि त्याला जोडलेला सेल्फ अँकर अगदी ट्रेक संपेपर्यंत रोप पासून वेगळा राहणार नाही याची काळजी घेत climb सुरु ठेवायचा.
लिंगाणा हा किल्ला इतर किल्ल्याप्रमाणे सरळमार्गी नसून हा एक सुळका आहे, त्यामुळे तांत्रिक सुरक्षा साधने घेऊन अनुभवी लोकांच्या सोबत त्यांच्या मार्गदर्शनाखाली लिंगाणा ट्रेक करावा. इथून पुढे सरळ उभ्या कातळ भिंती चढत जावे लागणार होते त्यामुळे सर्व सुरक्षा साधने पक्की करून एक एक जण कातळ भिंतीला बिलगला.
हळू हळू एक एक अवघड टप्पे पार पाडत आम्ही ११ च्या दरम्यान माथ्यावर पोहचलो च... !!!!!
शेवटचा बॅक एन्ड सांभाळणारा लीडर आला. आता सर्वजण माथ्यावर पोहचले. आम्ही लिंगाणा किल्ल्यावर, त्या अरुंद गडमाथ्यावर एका ईच्छा पूर्तीची अनुभूती घेत आहोत. सर्व मित्रमंडळ हर्षोल्लाशीत झालेले आहे. समोर रायगड दिसतोय , काळ नदीचं खोरं, दूरवर दापोली  गाव, दूरवर कोकणपट्टा  न्याहळता येतोय. एक ग्रुप फोटो आला आणि पुन्हा शिदोऱ्या सोडल्या गेल्या.  येथेच्छ ताव मारला. 
गड माथा 
लिंगाणा समिट 

            एप्रिल चा पहिला आठवडा त्यामुळे उन्हाचा पारा  चढलेला. उन्ह वाढायच्या आधी उतरणीला लागलो. उतरण बरीचशी रॅप्पेल्लिंग करून उतरावे लागते त्यामुळे एक वेळी एक च बहाद्दर. प्रतीक्षायादीतील सदस्य उन्हाने करपू लागले. पण काय करणार ? सांगणार कोणाला ? ऐकणार कोण ? सह्याद्रीच दर्शन हवंय  तर अशा प्रसादाची तयारी ठेवावीच लागते. 

एक दोन टप्पे उतरून गुहेपाशी आलो इथे अजून एक ग्रुप रॅपलिंग करत होता त्यामुळे मोठ्ठं  वेटिंग पडलं. पोरं पहुडली . जागा मिळेल तस स्वतःला अँकर करून बसल्या जागी निद्रादेवीची आराधना करू लागले.

साहसी स्वप्ने पाहणाऱ्यांची साहसी झोप 
काहींनी गुहेत जागा मिळवली 

या फोटोत आपल्याला न्युज १८ लोकमत वृत्त समूहाच्या निवेदिका स्नेहल पाटकर दिसत आहेत. त्यांचे  थरार लिंगाण्याचा  एपिसोड साठी शूट चालू होते. त्यांचीही  भेट त्यानिमित्ताने झाली. 

आता उतरणीचा मार्ग मोकळा झालेला. सर्वजण पटापट तयार झाले.  एक एक जण दोरीवर स्वर झाला, क्षणार्धात सर्वजण पायथ्याला दाखल झाले. सर्वांच्या हातून नकळत पणे एक दिव्य पार पडले गेले होते. एक वेगळंच समाधान डोक्यात ठेऊन पटापट सर्व सुरक्षा साधने उतरवून ती एकत्र केली रोप ची कोईल केली .कॅराबिनर, डिसेंडर , झुमार. हेल्मेट्स, टेप स्लिंग्ज. हार्नेस इ साहित्य व्यवस्थित हॅवर सॅक मध्ये भरले आणि मोहरीकडे कूच केली . बोराट्याची नाळ चढण्याचा एक अतिकंटाळवाणं काम बाकी होत. २ तासात तेही झालं आणि दिवेलागणीला मोहरीच्या दाखल. आता सर्वानी गाड्या स्टार्ट केल्या धुरळा उडवीत पुण्याच्या दिशेने सर्वांजण दिशेनाशी झाली 



------------------------------------------------------------------------------------------------------------------------

यानंतर ULTIMATE HIKERS & TRAVELLERS च्या नेतृत्वाखाली काही शाळकरी मुलांना घेऊन लिंगाणा ते रायगड हा ट्रेक आपण पूर्ण केला त्याबद्दल - 


लिंगाणा म्हंटल की काळजात धडकी भरवणारा किल्ला !
माळीनगर च्या शाळेतील मुलांनी मात्र हा किल्ला करण्याचा चंग बांधला. मी त्यांना यातील धोके समजावून संगीतलेही तरीही चिमुकले मागे हटायला तयार नाहीत. मग आम्ही ठरवलं च या लहानग्यांना ही लिंगण्यावर चढवूया च.
ठरलं. लिंगाणा ते रायगड.
आमची टीम BMC सर्टीफाईड व गाढा अनुभव असणारी टीम असल्याने शिक्षकही निर्धास्त होते.
सर्व मुलाना नीट सूचना व साहित्याची ओळख करून दिली. मुलांनी याआधी माझ्यासोबत 15 ते 20 किल्ले केलेले असल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढलेला होताच.
भल्या पहाटे चढाई सूरु केली. दुपारपर्यंत लिंगाण्यावर भगवा फडकवून बोराट्याची अवघड अशी नाळ उतरून सायंकाळी रायगड पायथ्याशी मुक्काम केला.
मित्रांनो सकाळी लिंगाणा व त्याच दिवशी रायगड ला पोहचणे तेही बोराट्याच्या नाळीने 5 वि सहावीच्या पोरांना घेऊन साधी गोष्ट नव्हती.
प्रचंड शारीरिक क्षमतेची गरज होती पण या ultimate च्या शाळेत तयार झालेल्या मुलांनी याही रेंजट्रेक चे आव्हान लीलया पेललं..
त्यांच्या या साहसाचे कौतुक करून tv वर त्याची बातमी लावल्याबद्दल आणि तेही शिवजयंती दिवशी त्यामुळे आम्ही सर्व #न्युज18लोकमत चे
आपले आभारी आहोत.
बातमीचा विडिओ खाली दिला आहे.
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------

धन्यवाद 

Comments

Popular posts from this blog

।। भटकंतीची पूर्व तयारी ।।

झपाटलेला ट्रेक

शाळा- मंतरलेले दिवस