Tuesday, 24 March 2020

🔸रात्रीचा माणिकगड🔸

 🔸रात्रीचा  माणिकगड🔸

 माणिकगड म्हटल की त्या किल्ल्यावर वळसा मारुन  जाणारी पायवाट आणि मुख्य वाटेला फुटलेल्या अनेक छोट्या छोट्या वाटा.त्यामुळे ह्या किल्ल्यावर जाताना बरोबर गावातील एखादा वाटाडया नसेल तर दिवसादेखील चढ़ाई करण तस जोखमीचच काम.

अश्या ह्या माणिकगडावर आपला  अल्टीमेट हायकर्स  ग्रुप ११ जणांना  घेऊन  रात्रीची चढ़ाई करण्यास सज्ज झाला होता.नियोजीत वेळेनुसार वाशिवली ते ठाकुरवाड़ी(आदिवाशी पाडा) हा पहिला टप्पा पार करुण आम्ही सगळे 'मधु' काकांच्या घरी जेवणाच्या वेळेत पोहचलो. अंगणामध्ये बसून गरमागरम वरणभात,वाटाणा व शेवग्याच्या शेंगांची भाजी,पापड,लोणच अस परीपूर्ण शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेतला. ह्या दिवसात गडावर पिण्यायोग्य पाणी नसल्याने 'मधु' काकांच्या घरुण उद्या दुपारपर्यंत पुरेल एवढा पाणी साठा घेवून पुढील प्रवासासाठी सज्ज मोर्चे बांधणी झाली .
    काळ्याकुट्ट अंधाराला चिरत टॉर्चच्या प्रकाशात आम्ही सगळे किल्ल्याच्या दिशेने निघालो.आमचा वाटाडया म्हणजे आमचा मित्र 'समीर पार्टे' हा लीड करत होता.आणि त्याच्या मागे आम्ही सगळे तो नेईल तिकडे निघालो होतो.तर आमचा लीडर 'योगेश' हा back support करत होता. गप्पागोष्टी करत दीड तास सपाटीवरुण चालत आम्ही सगळे 'हनुमान' मंदिराजवळ येवून पोहचलो. इथे एक पंधरा मिनिटाचा आराम  घेतला.
         आता इथून पुढे क्षमतेचा कस पाहणारा खडया चढणीचा घाटरस्ता आपल्याला चढायला लागतो . घनदाट जंगलातून जाणारी ही पायवाट क्षणाक्षणाला आपल्याला धापा टाकायला मजबूर करते. काही वेळातच  इथून घनदाट जंगल सोडून गडाच्या मुख्य दरवाज्यापाशी येवून पोहचलो कधी ते बोलण्याच्या ओघात कळलच नाही   (दरवाज्याचे फक्त अवशेष शिल्लक आहेत). आता इथे क्षणभर विश्रांती घ्यायच अस ठरल. सगळे फारच थकले होते आणि डोळ्यांवर झोप सुद्धा होती त्यामुळे सगळे शांत बसले होते. आणि अचानक अवकाशात लालबूंद चंद्रकोरेच दर्शन घडल. ते विलोभनीय दृश्य पाहून सगळ्यांचीच झोप उडाली त्या भयान शांततेत जल्लोष सुरु झाला.मागे गडसुद्धा चंद्रप्रकाशाने न्हाऊन निघाला होता. ते सगळ दृश्य कॅमेरामध्ये कैद करण्यात आणि सगळ्या आठवणी मनामध्ये साठवण्यात अर्धा तास कधी निघुन गेला कळलाच नाही. आणि मग त्या भग्न दरवाज्यातुन आम्ही गडावर प्रवेश केला. चंद्रप्रकाशात गडाचे काही अवशेष पाहत पाहत चुण्याच्या घाण्याजवळ येवून पोहचलो.येथून थोडयाच अंतरावर असलेल्या गणेश दरवाज्याच्या कमाणीतून आम्ही बालेकिल्ल्यावर पाय ठेवला.आणि एका सपाट जागेवर बैगा टाकून सुटकेचा निश्वास सोडला..
             आता सुरु झाली camping ची तयारी दोन बाजूला दोन tent लावून दोन tentच्या मध्ये उरले बाकी सगळे मोकळ्या आकाशाखाली झोपायचं अस ठरल; ठरल्याप्रमाणे सगळी तयारी झाली. आता कमी होती फक्त शेकोटीची.मग काय 'महेश,समीर,योगेश' आणि मी लाकड़ आणण्यासाठी निघालो. त्या निमित्ताने चंद्रप्रकाशात गडफेरी झाली, आणि सकाळ पर्यंत पुरतील एवढी लाकड़ सुद्धा गोळा केली. सह्याद्रीचा गार वारा अंगाला बोचत होता.त्या थंडीपासून थोड़ा बचाव म्हणून शेकोटिच नियोजन. शेकोटी  आता चांगलीच पेटली होती आणि भोवती बसून गप्पांचे फड सुद्धा रंगले होते. साथीला 'सैराट' सिनेमाची अफलातून गाणी आणि my favorite किशोर कुमार आह्ह..आणि मग हळूहळू एकएकाने पाठ टेकायला सुरुवात केली. आता उरलो फक्त आम्ही दोघे 'योगेश आणि मी' मग सुरु झाली star gazing photography. त्या अफलातून photography मध्ये एवढे रंगून गेलो की पाच कधी वाजले काही कळलेच नाही. शेवटी साखरझोप अनावर झाली; मग पहाटे पाच वाजता जाऊन tentमध्ये पाठ टेकली पडल्या पडल्या गाढ झोपी गेलो.तोच सहाच्या ठोक्याला योगेशने आम्हा सगळ्यांना उठवले. डोळे चोळत उठलो आणि tentच्या बाहेरच दृश्य पाहुन आच्छर्यचकीत झालो..

                 कड्यांमधून  कापूस पिंजल्यासारखे पांढरयाशुभ्र ढगांचे लोट वाहत होते;संपुर्ण गडावर धुक्याची चादर पसरली होती. Camera उचलून आम्ही सगळे पुन्हा गडफेरिस निघालो.आणि थोड्याच वेळात पूर्वेकडून गुलाबी रंगाच्या छटा आकाशात उमटु लागल्या मग काही क्षणातच दिनकररावांच् विलोभनिय दृश्य नजरेत पडल खाली पांढरयाशुभ्र ढगांचे थर आणि त्यावर सोनेरी किरणांसहित दिनकररावांच् आगमन.
 हळूहळू पांढऱ्याशुभ्र ढगांचे ते थर सूर्यप्रकाशाने निव्वळत गेले आणि मग त्या मागील डोंगररांग स्पष्ट दिसू लागली. एकाच जागी उभे राहून  तुंग,तिकोना,लोहगड,कोरिगड,तैलबैला,सांकशीचा किल्ला,कर्नाळा,प्रबळगड,कलावंतीन,इरशाळगड,गणेश कार्तिक सुळके आणि माथेरानच पठार हा एवढा परिसर स्वतःभोवती मारलेल्या गोल फेरीत न्हाळता आला.

 संपुर्ण गडफेरी करुण पुन्हा tent जवळ आलो बरोबर आणलेला सुखा खाऊचा नाश्ता आणि मंद आचेवर भाजलेले पापड खाऊन परतीच्या प्रवासाला सुरुवात कली.सकाळाच् कोवळ ऊन अंगावर घेत आणि गप्पागोष्टी करत 2 तासात आपण ठाकुर वाडीत येऊन पोहचतो.


इकडे मधुकाकांच्या घरी आपल्या नाश्त्याची लगबग सुरु आहे. लगेचच मधुकाकांनी पोहयाची प्लेट आणि चहाचा कप हातामध्ये टेकवला अंगनामध्ये बसून गरमागरम पोहे आणि चहा घेऊन आम्ही भेट घेतली मधुकाकांच्या घरच्या लोकांची.सह्याद्रि म्हणजे जगण्याची उमेद..
सह्याद्रि हा माणसाला कस जगायच हे शिकवतो याच उत्तम उदाहरण मधुकाकांच्या आईच्या रुपात आपल्याला पाहायला मिळत.१०४ वर्षाच्या ह्या आजीबाई एखाद्या तरुणाला लाजवेल अश्या attitude ने घरभर वावरत होत्या

आणि सगळ्यात महत्त्वाच् त्यांची दांडगी स्मरणशक्ति  मागच्या वेळेस आपल्या ग्रुपचे काही मेंबर्स माणिकगडावर आले त्यावेळी ते आजीला भेटले आणि तिचे फ़ोटो देखील काढले तीच फ़ोटोफ्रेम आजीला ह्यावेळी सदिच्छा भेट व  आठवण भेट म्हणून दिली.

आजीने सगळ्यांना ओळखल होत सगळ्यांची विचारपुस केली हा सगळा प्रकार पाहुन आम्ही थक्क झालो. तिच्या पायाला स्पर्श करुण धन्य झालो तिने मायेने गालावरून हात फिरवला तिच्या स्पर्शाने अक्षरशा अंगावर काटा आला.।
आता वेळ झाली होती निघायची काकांचा निरोप घेऊन निघालोच तोच गावाच्या वेशीवर एक दृश्य दिसलं.
एका पाण्याच्या टाकीवर शेकडो कळश्या घेऊन बाया बापड्या जमलेल्या आश्चर्य म्हणजे रात्री ज्या लग्नाच्या वरातीचा आवाज येत होता त्याच लग्नाची नाव वधू सुद्धा पाणी भरायला आलेली अजून हळद पण गेली नव्हती. सध्यस्तिथिच ते बोलकं उदाहरण होत. दुष्काळ अगदी इथपर्यंत पोहचलाय. आज पाणी वाचवलं नाही तर उद्या आपल्याला पाण्याच्या शोधत दिवसातील महत्वाचा वेळ वाया घालवावा लागला तर नवल वाटू नये.

लेखन - समीर शिर्के 

1 comment:

Lords - The revenge

                Lords - the revenge             तब्बल 2 महिने बाईक चालवून मी लंडन ला पोहचलो. 2 दिवस स्थिरस्थावर झाल्यावर मी लगेचच लॉर्ड क्रि...